प्रा. अविनाश सप्रे |
गणेश विसपुते |
बाळासाहेब आळवेकर |
प्रा. अरुण चव्हाण |
प्रा. श्रीकृष्ण कालगावकर यांचे टिपण वाचताना सुश्मिता खुटाळे |
कोल्हापूर, दि. २० जानेवारी:
मराठी कवितेच्या प्रांतामध्ये अरुण कोलटकर यांचे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ
आहे. त्यांच्या कवितेवर दुर्बोधतेचे आरोपण करण्याऐवजी ती समजून घेण्याचा, समजावून
सांगण्याचा प्रयत्न करण्याची आज खरी गरज आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात
आयोजित ‘स्मरण अरुण कोलटकरांचे’ या चर्चासत्रात उमटला.
शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती
मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या होत असलेल्या मराठी भाषा संवर्धन
पंधरवड्याअंतर्गत आज हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. चर्चासत्रात प्रा. अविनाश
सप्रे (सांगली), गणेश विसपुते (पुणे), प्रा. अरुण चव्हाण (सांगली), बाळासाहेब
आळवेकर (कोल्हापूर) हे सहभागी झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
होते.
प्रा. अविनाश सप्रे यावेळी म्हणाले, अरुण कोलटकरांच्या कवितेमध्ये परंपरा आणि
नवता यांचा परस्परसंबंध आढळतो. आधुनिक मराठी कवितेचे स्वरुप समजावून घेण्याच्या
दृष्टीने कोलटकरांच्या कवितेचे महत्त्व कालातीत आहे. कवितेचे ‘कविता’पण नेमके कशात दडलेले आहे, हे समजावून घ्यावयाचे, तर
कोलटकरांच्या कवितेला पर्याय नाही. कवितेच्या प्रांतात साचलेले निकृष्टपण दूर
करण्यासाठी सुद्धा कोलटकरांच्या कवितेचा मापदंड लावणे गरजेचे आहे. दिलीप चित्रे,
अरुण कोलटकर हे दोघे आजच्या नवकवींसमोर आदर्श म्हणून उभे आहेत, ही खूप महत्त्वाची
बाब आहे.
चित्रकार, कवी, समीक्षक गणेश विसपुते म्हणाले, कोलटकरांच्या साहित्याविषयी
मराठी साहित्यिक क्षेत्रातच खरे तर मोठी अनास्था आहे. त्यांची कविता विस्मित
करणारी, दीपवून टाकणारी आहे. मानवी जगण्यातली विसंगती आणि भोवतालातली असंगती
टिपण्याचे काम त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून केले आहे.
कोल्हापुरात कोलटकर यांचे सहाध्यायी असलेले प्रा. अरुण चव्हाण म्हणाले, कोलटकर
लहानपणापासूनच मनस्वी व अंतर्मुख स्वभावाचे होते. जीवन आणि त्याचे महत्त्व समजून
घेण्यासाठी हा माणूस महाराष्ट्रभर पायी फिरला. मुंबईच्या रस्त्यावरील कलाकाराचे
कौतुक करण्यासाठी पैसे नव्हते, तर अंगावरील शर्ट त्याला भेट देऊन तसाच आनंदाने घरी
जाणारा हा अवलिया होता. त्यांना समजून घ्यायला आपण अद्यापही कमी पडतो आहोत, हे
खेदजनक आहे.
कोलटकरांचे मित्र बाळासाहेब आळवेकर म्हणाले, कोलटकर हे साहित्य आणि समाज यांचा
संगम साधणारे कृतीशील कवी होते. कोल्हापूर महानगरपालिकेकडून त्यांच्या स्मरणार्थ
सभागृह उभारण्यात येत आहे. ते कोल्हापुरातील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून
पुढे यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अरुण कोलटकरांचे मेहुणे प्रा. श्रीकृष्ण कालगावकर हे प्रत्यक्ष उपस्थित राहू
शकले नाहीत. सुश्मिता खुटाळे यांनी त्यांच्या लेखी टिपणाचे वाचन केले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, मराठी अधिविभागाने भाषा
संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अरुण कोलटकरांसह अनेक नव्या जुन्या प्रभावी साहित्यिक,
कवींचा परिचय नव्या पिढीला घडवून आणला आहे. काही चांगल्या पुस्तकांचे प्रकाशन केले
आहे. नव्या पिढीला प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वांशी, साहित्यिकांशी जोडण्याची ही
प्रक्रिया निरंतर चालू राहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी
कुलगुरूंनी कोलटकरांच्या ‘वामांगी’ या सुप्रसिद्ध कवितेचे वाचनही
केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक
केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमास इतिहास अधिविभाग
प्रमुख डॉ. अवनिश पाटील, डॉ. प्रकाश पवार, डॉ. रघुनाथ कडाकणे, डॉ. नीलांबरी जगताप,
उदय कुलकर्णी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
फार छान मांडणी.
ReplyDeleteफाेटाेग्राफी चांगली वापरली.
धन्यवाद सर
धन्यवाद सर..!
Deleteफारच छान वृत्तांत मांडणी
ReplyDeleteधन्यवाद
Deleteएकूण सर्व कार्यक्रमांची पुस्तिका प्रकाशित झाली तर हे सर्व अमूल्य विचार सर्वांपर्यंत पोहोचतील
ReplyDeleteखूप चांगली सूचना. स्वागत.
Deleteअतिशय सुंदर कार्यक्रम आणि छान वृत्तांकन. अभिनंदन
ReplyDeleteधन्यवाद सर!
Delete