Friday, 1 January 2021

डॉ. ठकार, डॉ. झारी यांच्या संदर्भग्रंथाचे प्रकाशन

मनुष्यबळ विकासाच्या क्षेत्रात नितीमूल्यांचे महत्त्व असाधारण: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

 शिवाजी विद्यापीठात डॉ. एच.एम. ठकार व डॉ. ताहीर झारी लिखित संदर्भग्रंथाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, अॅड. व्ही.एन. पाटील यांच्यासमवेत लेखकद्वयी व अन्य शिक्षक.


कोल्हापूर, दि. १ जानेवारी: मनुष्यबळ विकासाच्या क्षेत्रात नैतिक मूल्यांचा संकोच झाल्यास त्याचे दूरगामी दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण होते. म्हणून या संदर्भात नितीमूल्यांचे असाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्या एमबीए युनिटचे डॉ. एच.एम. ठकार आणि देशभक्त रत्नाप्पा कुंभार वाणिज्य महाविद्यालयातील डॉ. ताहीर झारी यांनी लिहीलेल्या एथिकल परस्पेक्टीव्ह्ज ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या पुस्तकाचे प्रकाशन आज कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, आपल्या देशातील लोकसंख्येकडे आपण भार म्हणून न पाहता आपली मनुष्यबळाची ताकद म्हणून पाहिले आणि त्या दृष्टीने या मनुष्यबळाचा विकास केला, तिचा योग्य तऱ्हेने विनियोग केला, तर निश्चितपणाने आपल्या देशाचे चित्र पालटेल. उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये या मनुष्यबळाचा उत्तम वापर करता येईल. या मनुष्यबळ विकास क्षेत्रात प्रामाणिकपणा, समर्पण वृत्ती आणि नैतिक मूल्यांच्या जोपासनेलाही तितकेच मोठे महत्त्व आहे. त्यांचा संकोच झाल्यास मनुष्यबळावर त्याचा विपरित परिणाम होतोच, पण, उद्योग-व्यवसायांवरही त्याचे दुष्परिणाम होऊ लागतात. याचा देशाच्या भवितव्याशी थेट संबंध असल्याने असा संकोच होणे कोणालाच परवडणारे नाही, याची जाणीव करून देणारा उत्तम संदर्भग्रंथ डॉ. ठकार व डॉ. झारी यांनी निर्माण केला आहे. शोधप्रबंधाचे हे एक उत्तम ग्रंथरुप त्यांनी साकार केले आहे.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, हा संदर्भग्रंथ एमबीएच्या विद्यार्थ्यांसह उद्योग-व्यवसायांत कार्यरत प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे. विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकांनी एकत्र येऊन अशा प्रकारचा उपक्रम हाती घेणे, यालाही वेगळे महत्त्व आहे. जगातील विविध राष्ट्रे वेगवेगळ्या बाबतीत आघाडीवर आहेत. भारत मनुष्यबळाच्या बाबतीत आघाडीवर आहे. त्याचा सकारात्मक लाभ आपण घ्यायला हवा, असे सूचित करणारा हा ग्रंथ आहे.

यावेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव व ज्येष्ठ विधिज्ञ व्ही.एन. पाटील यांनीही शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. डॉ. एच.एम. ठकार यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. डॉ. झारी यांनी आभार मानले. यावेळी गणित अधिविभाग प्रमुख डॉ. सरिता ठकार, डॉ. केदार मारुलकर, डॉ. दीपा इंगवले, डॉ. अनुप मुळे आदी उपस्थित होते.

1 comment: