Monday 4 January 2021

‘इपीडब्लू’च्या टॉप फाईव्ह संशोधकात

डॉ. ज्ञानदेव तळुले यांचा समावेश

 

कोल्हापूर, दि. ४ जानेवारी: इकॉनॉमिक अ‍ॅन्ड पॉलिटिकल विकली (इपीडब्लू) या प्रख्यात नियतकालिकाच्या गतवर्षीच्या पहिल्या पाच सर्वोत्कृष्ट संशोधक लेखकांच्या यादीत शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव तळुले यांचा समावेश झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांसंदर्भातील प्रा. तळुले यांच्या शोधनिबंधासाठी त्यांचा टॉप फाईव्हमध्ये गौरव करण्यात आला.

प्रा. तळुले यांनी २००१ ते जुलै २०१८ या अठरा वर्षांच्या कालखंडातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची माहिती संकलित केली आहे. १५१९ आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सर्वेक्षण केल्यानंतर हाती आलेल्या माहितीचे विश्लेषण करून त्या आधारावर त्यांनी विस्तृत शोधनिबंध तयार केला. यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्‍त यांच्याशी त्यांनी चर्चा केली. शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा त्यांनी या माहितीच्या अधारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर काय उपाययोजना करता येतील, याची मांडणीही त्यांनी या शोधनिबंधात केली आहे. पंजाब, कर्नाटक आणि केरळमध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यास त्या त्या सरकारला यश आले आहे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मात्र त्या होत आहेत. याच्या मुळाशी असलेल्या विविध कारणांचा परामर्श प्रा. तळुले यांनी घेतला आहे. त्यांचे हे संशोधन इकॉनॉमिक अ‍ॅन्ड पोलिटिकल विकलीमध्ये प्रकाशित झाले. हाच शोधनिबंध सन २०१९-२०२० मधील सर्वोत्तम पाचमधील एक ठरला आहे.

No comments:

Post a Comment