Wednesday, 13 December 2023

विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’मध्ये विद्यार्थ्यांच्या सृजनशील जाणिवांची प्रचिती

शिवाजी विद्यापीठात आयोजित विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. मीना पोतदार, डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. प्रकाश गायकवाड आदी

शिवाजी विद्यापीठात आयोजित विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेतील प्रकल्पांची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. मीना पोतदार, डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. प्रकाश गायकवाड आदी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. प्रकाश गायकवाड आदी.


कोल्हापूर, दि. १३ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठात आज भरविण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सवामध्ये विद्यार्थी व संशोधकांमधील सृजनशीलतेबरोबरच सामाजिक जाणिवांची प्रचिती आली. सद्यस्थितीत मानवी समुदायाला भेडसावणाऱ्या व्यक्तीगत समस्यांपासून ते सामाजिक समस्यांपर्यंत आपापल्या परीने संशोधकीय मार्गाने उत्तर देण्याचा प्रयत्न या महोत्सवात दिसून आला. या स्पर्धेत सुमारे ३५० पदवी, पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले संशोधनपर प्रकल्प, पोस्टर सादर केले. विद्यार्थी विकास विभाग व भूगोल अधिविभाग यांनी या स्पर्धेचे संयोजन केले.

विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचे उद्दीष्ट बाळगून विद्यापीठ दरवर्षी आविष्कार संशोधन महोत्सव आयोजित करते. जिल्हास्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेच्या फेऱ्यांनंतर आज विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सव राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात पार पडला. सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू, डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

पदवी, पदव्युत्तर स्तरीय विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी अशा तीन स्तरांमध्ये वर्गीकृत असलेल्या या विद्यापीठस्तरीय आविष्कार महोत्सवात मानव्यशास्त्र, भाषा आणि कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा, विज्ञान, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय आणि फार्मसी या सहा श्रेणींमध्ये प्रकल्प सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे नागरिक, शेतकरी यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठीचे प्रकल्प होते. पर्यावरणीय समस्यांवर जैविक विघटनशील प्लास्टीकसारखे पर्याय सादर करणारे प्रकल्पही होते. शिवाय, तृतीयपंथीयांपासून वंचित घटकांच्या सामाजिक समावेशनासाठी, लोकांच्या मानसिक तणावावरील उपाययोजनांपर्यंतच्या प्रकल्पांचाही समावेश होता. यामधून विद्यार्थ्यांमधील सामाजिक जाणिवांची प्रचिती उपस्थितांना आली. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवरांनी फिरून सर्व प्रकल्पांची पाहणी केली आणि इतक्या मोठ्या संख्येने या संशोधन स्पर्धेत सहभाग दर्शविल्याबद्दल संशोधक विद्यार्थ्यांचे अभिनंदनही केले.

यावेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, भूगोल अधिविभागाच्या डॉ. मीना पोतदार, डॉ. जगदीश सपकाळे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. सोमनाथ पवार आदी उपस्थित होते. विविध अधिविभागांतील तसेच महाविद्यालयांतील शिक्षकांनी परीक्षक म्हणून तसेच समन्वयक म्हणूनही काम पाहिले.


Saturday, 9 December 2023

'विकसित भारत@२०४७' पोर्टलच्या उद्घाटनाचे शिवाजी विद्यापीठात थेट प्रक्षेपण




कोल्हापूर , दि. ९ डिसेंबर: 'विकसित भारत@२०४७' या पोर्टलचे उद्घाटन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाचे ११ डिसेंबर रोजी सकाळी नवी दिल्लीहून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यांचे शिवाजी विद्यापीठात ऑनलाईन सहक्षेपण करण्यात येणार आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने 'विकसित भारत @२०४७' युवकांचा आवाज हा कार्यक्रम ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित केला आहे. यावेळी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'विकसित भारत @ २०४७' या पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मा. नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम ऑनलाईन पाहण्याची व्यवस्था विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतीगृहास रामशेठ ठाकूर यांच्याकडून २५ लाख

 

शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतीगृह योजनेसाठी २५ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द करताना माजी खासदार तथा जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर. शेजारी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख.


कोल्हापूर, दि. ९ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा रायगडचे माजी खासदार व रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यापीठाच्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतीगृह योजनेसाठी २५ लाख रूपयांची देणगी दिली आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांना विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतीगृह योजनेची माहिती समजली. त्यावेळी त्यांनी २५ लाख रुपयांचा धनादेश विद्यापीठाच्या या अतिशय उपयुक्त व समाजाभिमुख योजनेसाठी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या 'महान शिवाजी' या महाग्रंथाची प्रत भेट देऊन श्री. ठाकूर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

शिवाजी विद्यापीठाने गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनींसाठी लोकसहभागातून वसतीगृह साकारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, तो स्तुत्य असल्याचे सांगून त्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा, असे वाटल्याने आपण त्यात सहभागी होत असल्याची भावना श्री. ठाकूर यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या  १९७२  च्या बॅचचे माजी विद्यार्थी असणाऱ्या रामशेठ ठाकूर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत शिक्षण घेतले.  श्री. ठाकूर यांनी  १९६८ ते १९७२ या कालावधीत रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथून १९७२ मध्ये मराठी विषयातून शिवाजी विद्यापीठाची बी.ए. पदवी प्राप्त केली आहे. एक कष्टाळू उद्योजक ते सामाजिक जाणीवांनी समृद्ध दातृत्वसंपन्न लोकनेता असा त्यांचा प्रवास  राहिला आहे. सध्या ते रयत शिक्षण संस्थेच्या  मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य म्हणून  कार्यरत आहेत. त्यांनी  १९९८  ते २००४ या कालावधीत कुलाबा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.


ठाकूर यांच्या दातृत्वाची प्रचिती: कुलगुरू डॉ. शिर्के

माजी खासदार रामशेठ ठाकूर हे शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतीगृह योजनेची माहिती समजली. लोकसहभागातून मुलींसाठी वसतीगृह साकारत असल्याचे समजताच त्यांनी विनाविलंब २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला, ही फार मोठी बाब आहे. त्यांच्या दातृत्वाबद्दल आजवर ऐकून होतो, मात्र या निमित्ताने त्याची प्रचितीच आली. त्यांचे हे दातृत्व अनेकांसाठी पथदर्शी स्वरूपाचे आहे. लोकस्मृती योजना त्यांच्यासारख्या अगणित दात्यांमुळे लवकरात लवकर साकार होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी यावेळी व्यक्त केला.


Friday, 8 December 2023

भारतीय बँका आणि डाक घरे यांचे समाजाच्या विकासामध्ये योगदान - क्षेत्रीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंग


कोल्हापूर, दि.0 डिसेंबर - भारतीय बँका आणि डाक घरे हे आर्थिक समावेशन योजनांद्वारे समाजाचा विकास करण्याची मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. त्याच बरोबर समाजाच्या विकासामध्येही यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंग यांनी आज येथे केले.


      शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहामध्ये आयोजित डॉ.प्रताप खोत आणि डॉ.केदार मारूलकर लिखित 'कोल्हापूर जिल्हयातील पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून आर्थिक समावेशन' या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून क्षेत्रीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंग बोलत होते.याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

     राजीव कुमार सिंग पुढे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आणि सर्व सामान्य लोकांना आर्थिक साक्षर करणे ही आजच्या काळाची गरज निर्माण झालेली आहे.समाजाच्या उत्कर्षासाठी विद्यापीठ आणि वित्तीय संस्था एकत्र येवून कार्य करणे आवश्यक आहे.भारतीय डाक घरांमध्ये बैंकिंग सुविधा उपलब्ध होण्यासाठी अमुलाग्र बदल घडून येत आहे.ग्राहकोपयोगी विविध सुविधांही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.डाक घरांमध्ये होवू घोतलेला हा बदल देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण आहे.

     कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले, देशाच्या विकासामध्ये डाक घरांचे मोठे योगदान आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून संशोधन प्रबंधांचे रूपांतर पुस्तक प्रकाशामध्ये होणे ही बाब समाज हिताच्यादृष्टीने विद्यापीठासाठी भूषणावह आहे.कोल्हापूर जिल्हयामध्ये शहरी आणि ग्रामीण दूर्गम भागांमध्ये पोहचलेल्या डाक घरांची संख्या जवळपास 563 इतकी आहे आणि त्यामध्ये सेवा देणारे एक हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.ग्रामीण आणि दूर्गमभागामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचून संदेशवहन, पत्रव्यवहार आणि अर्थ पुरवठा करणारी ही एक सामाजिक अर्थ वाहिनीच आहे.आवर्ती ठेव, बचत खाते, टाईम डिपॉझीट, मासिक उत्पन्न बचत योजना, ज्येष्ठ नागरीक बचत योजना, पीपीएफ, किसान विकास पत्र, सुकन्या समृध्दी योजना, पीएलआय, ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स प्रामुख्याने या योजनांचा समावेश डाक घरांमार्फत पुरविण्यात येत असलेल्या योजनामध्ये होतो. पत्रव्यवहार, ऑनलाईन बैंकींग, पैसे हस्तांतरण, स्टॅम्प, मोबाईल बैंकींग, बिझनेस सर्व्हीसेस, क्युआर कार्ड, रिटेल सर्व्हीसेस, सोशल सिक्युरीटी स्किम, कोअर बैंकींग, आधार एनेबल पेमेंट सिस्टीम, आधार अपडेशन, डोअर स्टेप सर्व्हीसेस या सेवांद्वारे सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये डाक घरे अग्रेसर झालेली आहेत.डाक घर सेवक हे वित्तीय सल्लागार म्हणूनही कामे पहातात. ज्या ठिकाणी बैंकांना पोहचण्यामध्ये काही मर्यादा येतात त्या ठिकाणी हमखास डाक घरे कार्यरत आहेत.त्यामुळे डाक घरांना नाविण्यपूर्ण योजनांमार्फत सेवासुविधा पूरविणे शक्त होत आहे.अद्यापही, काही प्रमाणात सामान्य जनतेपर्यंत विविध योजना पोहचण्यासाठी डाक घरांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे त्यासाठी हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल, अशी अशा आहे.

     यावेळी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील आणि वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.पुस्तकाचे लेखक डॉ.प्रताप खोत हे विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण रूरल डेव्हल्पमेंट (एमबीए प्रोग्राम) येथे सहा.प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

    डॉ.प्रताप खोत यांचे मार्गदर्शक आणि पुस्तकाचे लेखक डॉ.केदार मारूलकर यांनी प्रस्तावना केली.डॉ.प्रताप खोत यांनी आभार मानले.

   ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.जे.एफ.पाटील हे डॉ.मारूलकरांचे मार्गदर्शक होते. डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच डॉ.मारूलकर यांनी पीएचडीचे शोध प्रबंध सादर करून त्याचे पुस्तक प्रकाशित केले होते. आज, (दि ०७ डिसेंबर) डॉ.पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण दिवशीच डॉ.प्रताप खोत यांनी डॉ.मारूलकरांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या पीएचडी शोध प्रबंधाचे पुस्तक प्रकाशन करण्यात आले.

     यावेळी बैंक ऑफ इंडिया चेअरचे समन्वयक डॉ.राजन पडवळ, डॉ.दिपा इंगवले, डॉ.कविता वड्राळे, डॉ. संतोष सुतार, डॉ. वैशाली भोसले, डॉ. अमोल कांबळे, डॉ. तेजपाल मोहारेकर, डॉ. तेजस्वीनी मोहारेकर, डॉ. शोभा चाळके, डॉ. पल्लवी कोडक यांचेसह विविध अधिविभागांचे शिक्षक उपस्थित होते.

-----

 

शिवाजी विद्यापीठात संत जगनाडे महाराजांची जयंती

 


कोल्हापूर, दि. ८ डिसेंबर: संत संताजी जगनाडे यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली.

संत तुकाराम महाराज यांचे शिष्य असलेले आणि त्यांचे टाळकरी व लेखनिक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेल्या संत संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेस आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय येवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.