Wednesday, 16 January 2019

शिक्षणाच्या चळवळीचे फुले दाम्पत्यच उद्गाते - प्राचार्य टी.एस.पाटील



कोल्हापूर, दि.16 जानेवारी - महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची चळवळ निर्माण झाली.समाज परिवर्तन कार्यामध्ये त्यांचे अमूल्य योगदान होते, असे प्रतिपादन प्राचार्य टी.एस.पाटील यांनी केले.

  शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागामार्फत कै.पी.बी.साळुंखे व्याख्यानमालेअंतर्गत 'महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आजच्या संदर्भात प्रस्तुतता' या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये प्राचार्य टी.एस.पाटील प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.मानव्यशास्त्र सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ.भारती पाटील होत्या.यावेळी श्री.सुभाष साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य टी.एस.पाटील पुढे म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाला वैचारिक धन दिले.नव समाज निर्माण होण्यासाठी आहोरात्र कार्यरत राहिले.  आपल्या देशामध्ये कृषीवल संस्कृतीत स्त्री ही समाजप्रमुख होती.  सामान्य शेतकरी, कष्टकरी यांच्यावर होत असलेल्या अन्यायास ते सातत्याने विरोध करीत होते.  त्यांनी त्यांच्या कार्यातून भारतातील सामान्य वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होण्यास प्रवृत्त केले.महात्मा फुले शिकत असताना इंग्रज या देशातून कसे हद्दपार होतील यासाठी विचारमग्न असायचे.शिवाजी महाराजांची समाधी पहिल्यांदा महात्मा फुलेंनी शोधून काढली.आपल्या देशातील लोकांना गुलामगिरीतून जोपर्यंत मुक्त केले जाणार नाही तो पर्यंत आपल्या देशातील कुठल्याही प्रकारच्या स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होणार नाही हे त्यांनी जाणले होते.त्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे यासाठी ते कायम प्रयत्नशील होते.या माध्यमातूनच त्यांनी पहिल्यांदा स्त्रियांसाठी शाळा सुरू केली.ते स्वत: काही विषय शिकवत होते.पुढे अतिशय परिश्रमपूर्वक शिक्षण देवून सावित्रीबार्‌इंना शिक्षक म्हणून तयार केले.1852-53 मध्ये मुक्ता साळवे या आठ, नऊ वर्षांच्या मुलीने लिहिलेले निबंध आजही विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे, अशा प्रकारचे शिक्षण सावित्रीबार्‌इंनी दिले होते.महात्मा ज्योतिबा फुलेंनी वंचितांसाठी शाळा काढली हे क्रांतीकारी कार्य होते म्हणून त्यावेळेस इंग्रज सरकारने त्यांचा सत्कार केला होता.त्यावेळी ते पंचवीस वर्षांचे होते.अनाथ बालकांचा सांभाळ ते करीत होते.यासाठी त्यांना घरच्या प्रचंड रोषास सामोरे जावे लागले होते.आपल्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून त्यांनी सत्य शोधक समाजाची स्थापना केली.जातीधार्मातील भेदाभेद त्यांनी कधीही मान्य केले नाही.ते मानवतावादी होते.स्वत: काम करून आपल्या सामाजिक कार्यासाठी पैसे मिळवत होते.

अध्यक्षीय मनोगतामध्ये अधिष्ठाता डॉ.भारती पाटील म्हणाल्या,महात्मा फुलेंनी मांडलेली परंपरा प्रामुख्याने विवेकाधिष्ठीत परंपरा आहे.डोळे झाकून नाही तर डोळे उघडे ठेवून कार्य करणारी महान परंपरा आहे.सावित्रीबाई फुलेंचे अद्वितीय जीवन कार्य होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातील कै.पी.बी.साळुंखे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे श्री.यशोधन बोकील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. यावेळी विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थींनी, सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
-----


No comments:

Post a Comment