Wednesday, 23 January 2019

शेतीच्या कंपनीकरणाची गरज: सुधाकर जाधव


ज्येष्ठ पत्रकार सुधाकर जाधव यांच्या 'शेतकरी स्वातंत्र्याची रणनीती' या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. प्रकाश पवार. सोबत डॉ. माया देशपांडे, कृषी पत्रकार व प्रकाशक रावसाहेब पुजारी आणि आलोक जत्राटकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात मार्गदर्शन करताना सुधाकर जाधव. व्यासपीठावर डॉ. प्रकाश पवार.

कोल्हापूर, दि. २३ जानेवारी: शेतकऱ्यांसमोरील समस्या संपविण्यासाठी त्यांचा जमिनीवरील मालकी हक्क कायम ठेवून शेतीचे कंपनीकरण करण्याची गरज आज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन पांढरकवडा (यवतमाळ) येथील ज्येष्ठ पत्रकार तथा कृषी विचारवंत सुधाकर जाधव यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित समकालीन शेतीचे प्रश्न आणि युवक या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी स्कूलचे संचालक डॉ. प्रकाश पवार आणि ज्येष्ठ कृषी पत्रकार रावसाहेब पुजारी प्रमुख उपस्थित होते.
Sudhakar Jadhav
सुधाकर जाधव म्हणाले, शेतजमिनीचे तुकडे आणि वाटण्या हा भारतीय शेतीसमोरचा मोठा प्रश्न आहे. शेती हा जणू अल्प भूधारक शेतकऱ्यांचा मेळावाच बनला आहे. अल्पभूधारकांना कोणी कर्ज देत नाही, ही त्यातली आणखी एक मोठी समस्या आहे. या समस्येवर कंपनीकरणाचा तोडगा उपयुक्त ठरेल. सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी एकत्र करून त्या एका कंपनीच्या छताखाली आणल्या पाहिजेत. संसाधनांचा वापरही एकत्रितच करावा. त्यांच्या जमिनीच्या प्रमाणात त्यांना शेअर द्यावेत आणि नफ्यात लाभांश द्यावा. शेतकऱ्यांना तेथे आठ तास रोजगार द्यावा. त्यांचा मेहनताना द्यावा. अशा प्रकारे काम केल्यास कोरडवाहू शेतकऱ्यांनाही ओलिताचे लाभ मिळतील. या दृष्टीने आता शेतीचा विचार करण्याची गरज आहे.
तरुणांशी निगडित शेतीच्या समस्या सांगताना श्री. जाधव म्हणाले, आज कोणी तरुण शेती करण्यास तयार होत नाही आणि शेती करणाऱ्या मुलाला अगदी शेतकरी सुद्धा आपली मुलगी द्यायला तयार होत नाही, या दोन्ही अत्यंत गंभीर समस्यांनी आपली शेती आणि तरुण शेतकरी ग्रासला आहे. इतर रोजगार, धंदा नसला तरीही आजया तरुण शेती करण्यास तयार होत नाही. उलट शेतीतून आपली सुटका कधी होईल, याचाच विचार आणि प्रयत्न सुरू असतात. आज शेतीला मजूर मिळत नाहीत. अशा परिस्थितीत आपल्या शेतीचे करायचे काय, हा मोठा प्रश्न आहे. कोणीही शेतीचा गांभिर्याने विचार करीत नाही आणि त्यामुळे शेतीचा प्रश्न सुटणे अवघड आहे. राज्यकर्त्यांसाठी, शेतीचा प्रश्न हा शेतमाल हमीभावाचा आणि शेतीवरील कर्जापुरताच मर्यादित आहे. शेतकरी संघटनांची आंदोलनेही तेवढ्यापुरतीच मर्यादित आहेत. त्यामुळे शेतीचे प्रश्न वर्षानुवर्षे त्याच चक्रव्यूहाच्या गर्तेत आहेत. शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी संस्थात्मक, कायमस्वरुपी व्यवस्था निर्माण होत नाही कारण तरुण या प्रश्नांबद्दल विचार करीत नाही. तरुणांना आणि त्यांच्या संघटनांना शेतीचे प्रश्न आपल्या प्राधान्यक्रमावर घ्यावेसे वाटत नाही, हे चिंताजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आज शेतीत अभावाची स्थिती नसली तरी शेतकरी सुखी नाही, हे सत्य आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या अतिरिक्त लोकसंख्येला शेतीतून बाहेर काढणे आणि त्याचवेळी शेतीत नियोजनपूर्वक रोजगार निर्मिती करणे या दोन्ही गोष्टींची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाल्याचेही जाधव यांनी सांगितले. श्री. जाधव यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या विविध शंकांचे समाधानही केले.
यावेळी सुधाकर जाधव यांनी लिहीलेल्या शेतकरी स्वातंत्र्याची रणनीती या तेजस प्रकाशनाच्या पुस्तकाचे डॉ. प्रकाश पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कविता वड्राळे यांनी परिचय करून दिला, तर डॉ. संतोष सुतार यांनी आभार मानले. यावेळी डॉ. माया देशपांडे, डॉ. ओमप्रकाश कलमे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment