Friday, 18 January 2019

उत्कृष्ट संशोधनासाठी संयुक्त प्रकल्पांची गरज: डॉ. पी.पी. वडगावकर

शिवाजी विद्यापीठाने पुणे येथील सीएसआयआर-एनसीएल या संस्थेशी संशोधनविषयक सामंजस्य करार केला. या प्रसंगी कराराच्या प्रतींचे हस्तांतरण करताना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि एनसीएलचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पी.पी. वडगावकर. सोबत (डावीकडून) डॉ. अकल्पिता अरविंदेकर, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. पी.एस. पाटील आणि डॉ. जे.एस. बागी.


शिवाजी विद्यापीठाचा सीएसआयआर-एनसीएलशी संशोधनविषयक सामंजस्य करार

कोल्हापूर, दि. १८ जानेवारी: प्रयोगशाळेत संशोधकाने एकट्याने संशोधन करण्याचे दिवस आता मागे पडले असून उत्कृष्ट संशोधन कार्यासाठी विविध संस्थांनी संयुक्त प्रकल्प हाती घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठ आणि सीएसआयआर-एनसीएल यांच्या दरम्यानचा सामंजस्य करार दोन्ही संस्थांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पी.पी. वडगावकर यांनी आज येथे व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठ आणि सीएसआयआर-एनसीएल यांच्यात आज संशोधनविषयक सहकार्याचा सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. वडगावकर म्हणाले, उत्कृष्ट संशोधनासाठी संयुक्त प्रकल्प हाती घेणे आज आवश्यक झाले आहे. त्यासाठी संशोधन संस्थांनी, तेथील संशोधकांनी एकत्र येऊन एकमेकांशी चांगला परिचय करून घेतला पाहिजे. आपापल्या संशोधन क्षेत्राची माहिती एकमेकांना दिली पाहिजे. त्यातून संशोधनाच्या नवनव्या संधी सामोऱ्या येतील. यामध्ये आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्पांचेही महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केवळ पायाभूत सुविधाच नव्हेत, तर मानवी स्नेहबंधही अशा संयुक्त प्रकल्पांमधून वाढीस लागतात, हे अशा करारांचे महत्त्वाचे फलित असते, हे दुर्लक्षून चालणार नाही.

यावेळी डॉ. वडगावकर यांनी आपणही शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे १९७९च्या बॅचचे विद्यार्थी असल्याचा अभिमानपूर्वक उल्लेख केला. एनसीएलच्या प्रगतीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांचे, संशोधकांचे योगदान लाभले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, या सामंजस्य करारामुळे संशोधन, संयुक्त प्रकल्प, प्रयोगशाळा सहकार्य या बाबींविषयी एनसीएलबरोबर संवाद आणि साहचर्य वाढेलच, पण त्याचबरोबर आपल्या संशोधनाचे पेटंट मिळविण्याच्या कामी एनसीएलच्या अनुभवी संशोधकांचे मार्गदर्शन विद्यापीठाच्या संशोधकांना लाभेल. त्याचप्रमाणे संशोधनाचे तंत्रज्ञानात रुपांतरण आणि औद्योगिक साहचर्य वृद्धी या दृष्टीनेही त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी, तर एनसीएलच्या वतीने डॉ. वडगावकर यांनी स्वाक्षरी केल्या. या वेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. अकल्पिता अरविंदेकर, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment