Friday, 25 January 2019

विद्यार्थिनी उच्चशिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी सदैव प्रयत्नशील: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थिनींसाठीच्या बस पास योजनेसाठी लोकसहभागातून जमा केलेल्या सुमारे नऊ लाख रुपयांच्या निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना प्रदान करताना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.



शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थिनींच्या बस पास योजनेसाठी प्रातिनिधिक स्वरुपात महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यार्थिनींना धनादेश प्रदान करताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींसाठी बस पास योजनेच्या धनादेश प्रदान कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील. व्यासपीठावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


कोल्हापूर, दि. २५ जानेवारी: केवळ आर्थिक कारणांमुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थिनी उच्चशिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाबरोबरच शासकीय तसेच वैयक्तिक स्तरावरही सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातर्फे उच्चशिक्षण घेणाऱ्या आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थिनींसाठी बस पास योजना जाहीर करण्यात आली होती. त्या योजनेचे उद्घाटन आणि योजनेसाठी लोकसहभागातून जमविण्यात आलेला निधी विद्यापीठास प्रदान करणे तसेच त्याचे प्रातिनिधिक स्वरुपात प्राचार्य, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना वितरण असा संयुक्त समारंभ आज दुपारी शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात पार पडला. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
Chandrakantdada Patil
श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्र शासनातर्फेही मोफत बस पास योजना आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय स्तरावरुन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत असले तरीही तिला काही मर्यादा आहेत. त्यामुळे सर्वदूर विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहोचू शकत नाही. शिवाजी विद्यापीठाने मात्र आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थिनींचे उच्चशिक्षण केवळ बस पासअभावी रखडू नये आणि त्यांना त्यांची शैक्षणिक प्रगती साध्य करता यावी, चांगले करिअर करता यावे, या दृष्टीने आखलेली योजना अत्यंत चांगली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या शुल्कामधून जमा झालेल्या विद्यापीठ फंडावर त्याचा भार न टाकता लोकसहभागातून निधी उभारून त्या माध्यमातून या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे धोरण स्वीकारले, ही बाबही स्तुत्य आहे. विद्यापीठाच्या या प्रामाणिक प्रयत्नांना पाठबळ लाभावे आणि कार्यक्षेत्रातील विद्यार्थिनींचे शैक्षणिक कल्याण व्हावे, या हेतून आम्ही सुमारे ९ लाख रुपयांचा निधी जमा केला आणि तो आज विद्यापीठाकडे सुपूर्द करीत असताना अतिशय आनंद होतो आहे. यासाठी संवेदना फौंडेशन आणि रोहिणी ज्वेलर्स यांनीही मोलाचा हातभार लावला आहे. आमच्या या मदतीचा योग्य विनियोग विद्यापीठ प्रशासन निश्चितपणे करेल, याची आम्हाला खात्री आहे. यापुढील काळातही विद्यापीठाच्या अशा विद्यार्थी विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांना शासकीय तसेच व्यक्तीगत स्तरावर सदैव सहकार्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांनी विद्यापीठाप्रती दाखविलेल्या सहृदयतेचे स्वागत केले. ते म्हणाले, विद्यार्थिनींसाठी बस पास योजनेबरोबरच संलग्नित महाविद्यालयांमध्ये स्वच्छतागृह उभारण्यासाठीही लोकसहभागातून निधी उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना स्वच्छतागृहांअभावी विद्यार्थिनींची होणारी कुचंबणा व त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न विचारात घेऊन स्वच्छतागृह उभारणीची योजना आखण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारण्यात येणाऱ्या या स्वच्छतागृहांच्या एका युनिटचा खर्च एक लाख रुपये इतका आहे. प्राथमिक टप्प्यात ५० अत्यंत गरजू संलग्नित महाविद्यालये निवडून त्यांना अशी स्वच्छतागृहे तयार करून देण्याचा मानस आहे. यासाठीही दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत करावी, असे आवाहन कुलगुरूंनी केले. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम भागास कायमस्वरुपी जोडण्यासाठी सब-वे बांधणे आणि विद्यापीठाच्या संरक्षक भिंतींवर सुंदर कोल्हापूरचे दर्शन घडविण्याच्या अनुषंगाने कोल्हापूरच्या कलाकारांकरवी कला-संस्कृतीदर्शक चित्रे काढून घेण्याचा मनोदयही त्यांनी जाहीर केला.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ९ लाख रुपयांचा निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. शिंदे यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रातिनिधिक स्वरुपात काही महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यार्थिनी यांना मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते बस पास योजनेसाठी निधीचे वितरण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment