Sunday, 30 July 2023

गतिमान व दर्जेदार नमुना विश्लेषणात शिवाजी विद्यापीठ अग्रेसर

 आय-स्टेमच्या पोर्टलवर संशोधकांकडून सर्वाधिक नोंदणी

 

शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसी सैफ-डीएसटी केंद्रामधील एक्स.आर.डी. उपकरण

टीजीए-डीटीए-डीएससी

एफ.टी.आय.आर.

कोल्हापूर, दि. ३० जुलै: अल्प कालावधीत गतिमान व दर्जेदार संशोधकीय नमुना विश्लेषण करून देण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रातील तीन अत्याधुनिक उपकरणांना देशभरातील संशोधकांची पसंती लाभत असून या उपकरणांसाठी भारत सरकारतर्फे विकसित पंतप्रधानांच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांच्या इंडियन सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग फॅसिलिटीज मॅप (आय-स्टेम) या पोर्टलवर सर्वाधिक नोंदणी प्राप्त झाली आहे. आय-स्टेमच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. ही माहिती विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्राच्या सैफ-डीएसटीचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी दिली.

डॉ. सोनकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्यासह विविध वैज्ञानिक विभागांमार्फत देशातील विविध संस्थांना अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे देण्यात येतात. या उपकरणांवरील पृथक्करणासाठीआय-स्टेमचे (बंगळुरू) पोर्टल निरीक्षण व नोंदणी सुविधा प्रदान करते. या पोर्टलवर देशभरातील २२७७ संस्थांची २५,८८१ शास्त्रीय उपकरणे नोंद आहेत. या नोंदणीमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातून १७२ संस्थांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचाही समावेश आहे. पोर्टलवरील माहितीनुसार, भारतात संशोधकीय नमुना विश्लेषणासाठी आठ उपकरणे सर्वाधिक वापरली जातात. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठातील मध्यवर्ती सुविधा केंद्रातील (सीएफसी) सोफिस्टिकेटेड अॅनालिटिकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी (सैफ-डीएसटी) केंद्रातील एक्स रे पॉवर डिफ्रॅक्शन (एक्सआरडी), फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर (एफटीआयआर), थर्मोग्रॅव्हिमेट्रिक अॅनालायझर- डिफ्रन्शियल थर्मल अॅनालिसिस -डिफ्रन्शियल स्कॅनिंग कॅलोरीमीटर (टीजीए-डीटीए-डीएससी) या तीन उपकरणांची सर्वाधिक मागणी असणारी व सेवा प्रदान करणारी उपकरणे म्हणून नोंद झाली आहेत. विश्लेषणात्मक पृथ:क्करणासाठी देशभरातील संशोधक आय-स्टेम पोर्टलच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठातील सैफ-सीएफसी-डीएसटी विभागांमध्ये नमुना पृथक्करणासाठी मोठ्या संख्येने पाठवू लागले आहेत. येथील नमुना विश्लेषणही अतिशय गतिमान, दर्जेदार व अचूक असल्याचा अभिप्रायही पोर्टलवर नोंदविण्यात आला आहे. ही शिवाजी विद्यापीठासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.

विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्राच्या सातत्यपूर्ण संचालनासाठी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी व अधिकार मंडळांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत असल्यामुळेच हे यश मिळविणे शक्य झाल्याची भावना डॉ. सोनकवडे यांनी व्यक्त केली.

 १२५१ नमुन्यांची विश्लेषणासाठी नोंदणी

विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रात एकूण १४ आधुनिक शास्त्रीय विश्लेषक उपकरणे आहेत. आय-स्टेमकडून प्रत्येक उपकरणाला कोड देण्यात आलेले आहेत. त्यामुळे संशोधकांना सॅम्पल पृथक्करणासाठी पोर्टलवर जाऊन बुकिंग करणे सुलभ होते. शिवाजी विद्यापीठाच्या सैफ-डीएसटीकडील एक्सआरडी, एफटीआयआर आणि टीजीए-डीटीए-डीएससी या तीन उपकरणांसाठी अतिशय कमी वेळेमध्ये सर्वाधिक बुकिंग नोंद झाले आहेत. येथे नमुन्यांचे पृथक्करणही अतिशय कमी वेळेमध्ये करून देण्यात येते. त्यामुळे येथील बुकिंगमध्ये सातत्य दिसून आले आहे. येथील एक्सआरडी (कोड- २७३४६१३) साठी ७२६ सॅम्पलचे, एफटीआयआरसाठी (कोड- २७३४६२५) ३१९ सॅम्पलचे तर टीजीए-डीटीए-डीएससी  (कोड- २७३४६२४) साठी २०६ सॅम्पलचे असे एकूण १२५१ सॅम्पलच्या पृथक्करणासाठी बुकिंग झाले आहे. या बुकिंगची सविस्तर माहिती आय-स्टेम पोर्टलवर नोंद आहे.

या तीन उपकरणांमधून कोणते विश्लेषण होते?

शिवाजी विद्यापीठाच्या सैफ-सीएफसी-डीएसटी केंद्रामधील जी तीन उपकरणे विश्लेषणासाठी सर्वाधिक मागणी असणारी आहेत, ती पुढीलप्रमाणे विश्लेषणासाठी वापरली जातात. एक्सआरडी उपकरणाद्वारे संशोधकांनी बनवलेल्या रासायनिक पदार्थांमधील अणूंची रचना, त्यांचा आकार, प्रकार हे गुणधर्म अभ्यासले जातात. एफटीआयआर उपकरण पदार्थाच्या रासायनिक गुणधर्मातील घटक (Functional group) कोणता आहे, हे शोधून काढण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. हे सदर उपकरण अतिशय उपयोगाचे आहे. टीजीए-डीटीए-डीएससी हे उपकरण पदार्थावर कमी अधिक प्रमाणात होणारा उष्णतेचा परिणाम आणि तत्सम गुणधर्मांच्या अनुषंगाने माहिती विश्लेषित करण्याच्या कामी उपयुक्त ठरते.

विश्लेषणाद्वारे विद्यापीठास दोन वर्षांत सुमारे ३३ लाखांचे शुल्क

विद्यापीठाच्या सैफ-सीएफसी-डीएसटी केंद्रातील विविध १४ उपकरणांद्वारे करण्यात आलेल्या विश्लेषणातून सन २०२१-२२ आणि सन २०२२-२३ या दोन आर्थिक वर्षांमध्ये अनुक्रमे रुपये १०,३३,७०० आणि रुपये २३,२८,४६९ असे एकूण ३३ लाख ६२ हजार १६९ रुपयांचे शुल्क प्राप्त झाले आहे.

यातील एक्सआरडी उपकरणासाठी प्रति नमुना १५० रुपये शुल्क आकारले जाते. या उपकरणाद्वारे सन २०२१-२२मध्ये २ लाख ६६ हजार ६५० आणि २०२२-२३मध्ये ३ लाख ३१ हजार ९०० रुपये शुल्क मिळाले. एफटीआयआर उपकरणासाठी प्रति नमुना २०० रुपये शुल्क आहे. त्यातून सन २०२१-२२मध्ये २ लाख २६ हजार ४०० रुपये आणि सन २०२२-२३मध्ये २ लाख १० हजार ५०० रुपये शुल्क मिळाले. टीजीए-डीटीए-डीएससी उपकरणासाठी प्रति नमुना ५०० रुपये शुल्क आकारले जाते. यातून सन २०२१-२२ मध्ये १ लाख ३३ हजार ४०० रुपये आणि सन २०२२-२३मध्ये ३ लाख ७६ हजार ५०० रुपये शुल्क प्राप्त झाले.

 

तत्परता व पारदर्शकता यामुळेच विद्यापीठाला पसंती: प्र-कुलगुरू डॉ. पाटील

शिवाजी विद्यापीठाच्या सैफ-सीएफसी-डीएसटी केंद्रामध्ये उपलब्ध असणारी अद्ययावत उपकरणे, त्यांची सुस्थिती आणि अत्यंत तत्पर व जाणकार विश्लेषकांद्वारे मिळणारी अखंडित सेवा हे शिवाजी विद्यापीठाच्या केंद्राचे वैशिष्ट्य आहे. येथे आलेल्या सॅम्पलचे गतिमान पद्धतीने पृथक्करण करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच आय-स्टेम पोर्टलवरही सॅम्पल बुकिंगची तत्परता, पृथक्करणाच्या बाबतीतली पारदर्शकता व विश्वासार्हता या बाबींमुळेच आय-स्टेम पोर्टलद्वारे देशभरातून उच्चांकी सॅम्पलचे बुकिंग या केंद्राला लाभत आहे, अशी प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली.

आधुनिक उपकरणांचा लाभ संशोधनासाठी सर्वदूर होणे महत्त्वाचे: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रामधील सैफ-डीएसटी येथे अत्याधुनिक स्वरुपाची १४ उपकरणे आहेत. अतिशय महत्त्वाच्या संशोधकीय पृथक्करणासाठी ती वापरली जातात. विद्यापीठातील संशोधकांना तर ती उपलब्ध आहेतच, शिवाय, आय-स्टेमच्या माध्यमातून देशभरातील संशोधकांनाही त्यांच्या संशोधनाच्या विश्लेषणासाठी या उपकरणांचा लाभ होतो आहे आणि त्यासाठी सर्वाधिक मागणी नोंदविली जात आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. केंद्रप्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यासाठी अभिनंदनास पात्र आहेत, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.

Saturday, 29 July 2023

विद्यापीठात राष्ट्रीय धोरण सप्ताह पोस्टर स्पर्धेत फर्नांडिस, रंजन विजेते

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत आयोजित पोस्टर प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे. सोबत (डावीकडून) डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. प्रतिभा पाटणकर, डॉ. धनंजय सुतार, डॉ. अविनाश भाले आदी.
 
शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत आयोजित पोस्टर प्रदर्शनाची पाहणी करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत आयोजित पोस्टर प्रदर्शनाची पाहणी करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे.



कोल्हापूर, दि. २९ जुलै: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जनजागृती सप्ताहांतर्गत येथील शिवाजी विद्यापीठात काल (दि. २८) आयोजित पोस्टर प्रदर्शन व स्पर्धेमध्ये मर्सी फर्नांडिस व पुण्यश्री रंजन यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.

शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रामध्ये शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या वतीने अधिविभागांतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत (एनईपी २०२० विक @ एसयूके) पोस्टर प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिभा पाटणकर, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार, सामाजिक समावेशन केंद्राचे डॉ. अविनाश भाले आणि समन्वयक डॉ. विद्यानंद खंडागळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अतिशय अभ्यासपूर्ण पोस्टर्सचे सादरीकरण केले. चार वर्षांचा पदवी कार्यक्रम, बहुप्रवेश-बहुनिर्गमन पद्धती, राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क, अॅकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स, ग्रॉस एनरोलमेंट रेशो, भारतीय ज्ञान प्रणाली, कार्यस्थळावर प्रशिक्षण (इंटर्नशिप/ अप्रेंटिसशिप), सामुदायिक सहभाग, कौशल्य विकास, नवसुधारणा तसेच मुक्त व ऑनलाईन शिक्षण आदी महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. कुलसचिव डॉ. शिंदे यांनी सर्व पोस्टरची पाहणी करून विद्यार्थ्यांशी त्याविषयी चर्चा केली आणि त्यांचे कौतुक केले. दिवसभरात कॅम्पसवरील विद्यार्थ्यांनीही प्रदर्शनास भेट देऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी जाणून घेण्यात रस दाखविला.

सायंकाळी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये मर्सी फर्नांडिस व पुण्यश्री रंजन यांनी प्रथम, बन्सी होवाळ व ऐश्वर्या कदम यांनी द्वितिय आणि अभिजीत गाताडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. डॉ. पाटणकर, डॉ. खंडागळे आदींच्या उपस्थितीत विजेत्यांना प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

 

Friday, 28 July 2023

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत शिवाजी विद्यापीठात पथनाट्य

 



कोल्हापूर, दि. २८ जुलै: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थ्यांमध्ये प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने आज शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटच्या सामाजिक कार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०ला यंदा तीन वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने २४ ते २९ जुलै दरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठात या निमित्ताने पोस्टर, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, रिल्स स्पर्धांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत आज विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या धोरणाच्या विविध पैलूंवर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी प्रिया देशमुख,  उपकुलसचिव गजानन पळसे, डॉ. उत्तम सकट, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ.नितीन माळी, एमएसडब्ल्यू विभागाचे समन्वयक डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. उमेश गडेकर, डॉ. गजानन साळुंखे, चेतन गळगे, डॉ.तानाजी घागरे, मृणालिनी जगताप, डॉ. प्रताप खोत उपस्थित होते. ओमकार संकपाळ, गायत्री चव्हाण, कोमल गरड, वासवी पोतदार, सायली शहापूरकर, शिवानी माने, विद्या करचले, शुभांगी भोसले या विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले. यासाठी डॉ. उर्मिला दशवंत आणि डॉ. मुनीर मुजावर यांनी विशेष परिश्रम घेतले. यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवाजी विद्यापीठात यंदापासून एम. ए. योगशास्त्र अभ्यासक्रम

 

(प्रतिकात्मक छायाचित्र)


(एम.ए. योगशास्त्र अभ्यासक्रमाविषयी माहिती देताना डॉ. रामचंद्र पवार)
 

कोल्हापूर, दि. २८ जुलै: योगशास्त्राचे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या योगप्रेमी, जिज्ञासूंसह योग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठातर्फे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून एम. . (योगशास्त्र) हा द्वैवार्षिक पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती विद्यापीठाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ रामचंद्र पवार यांनी आज येथे दिली.

विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार अधिविभागामार्फत योगशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रस्तावाला अधिकार मंडळांची मान्यता प्राप्त झाली आहे. योग क्षेत्रामध्ये व्यावसायिक कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदवीनंतर लगेचच हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. शिवाजी विद्यापीठात प्रथमच अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ कॅम्पसमध्ये उपलब्ध केला जात आहे.

अभ्यासक्रमात काय?

एम.ए. योगशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात शरीरशास्त्र, शरीर क्रिया विज्ञान, विविध प्राचीन आणि आधुनिक योग ग्रंथातील हठयोग, शास्त्रीय योग, निसर्गोपचार, आयुर्वेदाचे सिद्धांत, योग तत्त्वज्ञान, पूरक चिकित्सा पद्धती, मानसशास्त्र, व्यक्तिमत्व विकास, इत्यादी गोष्टींसह सर्वसमावेशक अभ्यासक्रम आहे.

यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. मेघा गुळवणी आणि डॉ. सरिता ठकार यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले.

संधी कुठे?

या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या पदवीधरांना पुढे युजीसी नेट, पीएचडी करून सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक होता येते. याशिवाय सरकारी हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी योग प्रशिक्षक, योग चिकित्सक इत्यादी संधी आहेत. अनेक नामांकित खाजगी हॉस्पिटल्समध्ये सुद्धा योगथेरपिस्ट म्हणून संधी आहेत. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, योग संस्था, हॉटेल्स, स्पा, जिम (व्यायाम शाळा) या ठिकाणीही रोजगाराच्या संधी आहेत.

भारत सरकारने योग आणि तत्सम भारतीय चिकित्सा पद्धतींच्या प्रचार-प्रसारासाठी आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे. अनेक ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालये, विद्यापीठे या ठिकाणी योगविषयक शिक्षण आणि संशोधनाचे कार्य सुरू आहे. सरकारी आस्थापना, विविध मंत्रालयीन विभाग येथेही उच्चशिक्षित योगशिक्षकांची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी स्थानिक स्तरावर योगशास्त्राचे उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे आणि त्यातून योग क्षेत्रातील विविध रोजगारांसाठी मनुष्यबळाची निर्मिती व्हावी, या हेतूने विद्यापीठाने योगशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. या पदवीनंतर सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक, योगचिकित्सक अशा विविध रोजगार संधी उपलब्ध होतील. स्वयंरोजगारासाठी सुद्धा हे शिक्षण महत्त्वाचे ठरेल.

योग क्षेत्रात अनेक नवनवीन योग संस्था विकसित होत आहेत. तेथेही योग प्रशिक्षकांची मागणी वाढली आहे. तरुणाई हा व्यवसाय म्हणून स्वीकारून स्वतःला तयार करीत आहे. विविध देशांमध्ये भारतीय योग प्रशिक्षकांची मागणी वाढत आहे. जगात नोकरी-रोजगाराची नवीन बाजारपेठ योगामुळे तयार झाली आहे. या सगळ्यात भारतीय लोकांना प्राधान्याने मागणी आहे. युनेस्कोनेही भारतातील योगाभ्यासाला मानवी संस्कृतीचा अमर वारसा, म्हणून मान्यता दिली आहे. जागतिक संस्था, शाळा, महाविद्यालय योग प्रशिक्षणाचा भाग होत आहेत. भारतातही अनेक राज्यांनी शालेय, महाविद्यालयीन योगाभ्यासाला शैक्षणिक उपक्रमाचा अविभाज्य घटक बनविले आहे.

योगाचे महत्त्व:

सध्याच्या स्थितीमध्ये योगमध्ये अनेक वैश्विक, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय समस्यांवर उत्तर दडलेले आहे. योगाच्या बाजारपेठेचे आकारमान लक्षात घेण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येईल की, योग क्षेत्रामध्ये नवनवीन रोजगाराच्या अनेक संधी असून त्यामध्ये वेगाने वाढ होत आहे. “हिल इन इंडियाआणि हिल बाय इंडियाया दोन्ही उपक्रमांमध्ये योग केंद्रस्थानी आहे. अशावेळी योग फक्त व्यक्तीच्या जीवनातच नाही, तर राष्ट्रीय आणि वैश्विक स्तरावर परिवर्तन घडवून आणण्यासाठी सक्षम आहे.

भारतात योग क्षेत्रामधील वाढती बाजारपेठ

भारतात योगाविषयी किरकोळ तंदुरुस्ती सेवा बाजार २.६ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा आहे. योग क्षेत्राची एकूण बाजारपेठ ८० अब्ज डॉलर्सची आहे. योग क्षेत्राशी संबंधित उपकरणांची बाजारपेठ कोविड-१९ दरम्यान १५४ टक्क्यांनी वाढली. परदेशातील विद्यापीठांमध्ये सुद्धा योग विभाग आणि योग संबंधित पदवीचे शिक्षण दिले जात आहे. गेल्या काही वर्षापासून योग शाळा, योग थेरपी सेंटर यामध्ये वाढ होत आहे. सन २०२२ ते २०३० दरम्यान ५.८ टक्के वार्षिक वाढीचा अंदाज आहे(स्रोत - https://www.grandviewresearch.com)

जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार

 


कोल्हापूर, दि. २८ जुलै: चीनमधील चेंगडू येथे होणाऱ्या जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या पाच क्रीडापटूंचा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना स्पर्धेतील यशस्वितेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

चीनमधील चेंगडू येथे होणाऱ्या जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या पाच क्रीडापटूंची भारतीय विश्वविद्यालय संघा निवड झाली आहे. विद्यापीठाच्या इतिहासात जागतिक स्पर्धेसाठी पाच खेळाडूची एकाच वेळी निवड होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. त्याबददल सदर क्रीडापटूंचा सत्कार आणि शुभेच्छा प्रदान कार्यक्रम शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू ओंकार कुंभार (नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स इचलकरंजी, ८०० मी. धावणे), सिध्दांत पुजारी (आजरा महाविद्यालय, आजरा, ३००० मी. स्टीपल चेस), 3. सुदेष्णा शिवणकर (यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, सातारा, १०० मी. धावणे व बाय १०० मी. रिले), रेश्मा केवटे (डी. पी. भोसले महाविद्यालय, कोरेगाव, हाफ मॅरेथॉन) आणि राणी मुचंडी (डी. पी. भोसले महाविद्यालय, कोरेगाव, हाफ मॅरेथॉन) यांचा समावेश होता. तसेच, रिया नितीन पाटील हिने दक्षिण कोरिया येथे झालेल्या एशियन अंडर-२० अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप बाय १०० रिले स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबददल तिचाही कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, डॉ. डी.बी. बिरनाळे, डॉ. नंजय पाटील, श्रीमती स्मिता कुंभार, अभिषेक मस्कर उपस्थित होते.