शिवाजी विद्यापीठात स्कूल कनेक्ट अभियानाच्या अनुषंगाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. |
कोल्हापूर, दि. १६
जानेवारी: राष्ट्रीय शैक्षणिक
धोरण-२०२० च्या अंमलबजावणीमुळे होणाऱ्या विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक बदलांबाबत
विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने स्कूल कनेक्ट (एन.ई.पी. कनेक्ट) संपर्क अभियान शिवाजी
विद्यापीठ परिक्षेत्रात यशस्वी करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के यांनी केले.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील महाविद्यालयांमधील स्थूल नोंदणी प्रमाण (ग्रॉस
एन्रॉलमेंट रेशो-GER) वाढविण्यासाठी व राज्यात
राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० यामुळे होणाऱ्या शैक्षणिक
बदलांबाबत व त्यांच्या सकारात्मक परिणामांची माहिती देण्यासाठी स्कूल कनेक्ट (एनईपी
कनेक्ट) संपर्क अभियान सर्व अकृषी विद्यापीठ स्तरावर १५ ते ३१ जानेवारी २०२४ या
कालावधीत राबविण्याबाबत कळविले आहे. त्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत
गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने संलग्नित महाविद्यालयांच्या समन्वयकांसाठी आज स्कूल
कनेक्ट अभियानविषयक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्या कार्यशाळेत
अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, पुढील शैक्षणिक वर्षापासून अकृषि विद्यापीठांशी संलग्नित
सर्व महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पदवी अभ्यासक्रमांच्या
प्रथम वर्षासाठी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी होणार आहे. उच्च
शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि आमूलाग्र व्यापक बदल होत असतांना, त्याविषयीची जनजागृती
आणि सातत्यपूर्ण समुपदेशनाची नितांत गरज आहे. या बदलांचा सर्वाधिक परिणाम शैक्षणिक
वर्ष २०२३-२४ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांतून इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या
विद्यार्थ्यांवर होणार आहे. त्या अनुषंगाने, विद्यार्थीकेंद्री शिक्षण धोरणाची
मूलभूत तत्त्वे परिणामकारकरित्या प्रत्यक्षात आणावयाची असतील तर, ती या वर्षीच्या बारावीच्या
विद्यार्थ्यांपर्यंत योग्य रितीने पोहचणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र
शासनाने स्कूल कनेक्ट अभियान हाती घेतले आहे. ते यशस्वी करणे ही शैक्षणिक
क्षेत्रातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयांतील
प्रथम वर्षाच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात प्रवेश नोंदणी होऊन जागा रिक्त
राहत आहेत. बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी विविध
अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून दूर जात आहेत. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची
संधी उपलब्ध करुन देताना विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या
ऑनलाईन अभ्यासक्रमांबाबतची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवून स्थूल नोंदणी प्रमाण (GER) वाढविणेही आवश्यक आहे.
त्या दृष्टीनेही हे अभियान व्यापक आणि सकारात्मकतेने राबविणे आवश्यक असल्याचेही
त्यांनी सांगितले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, नूतन
शैक्षणिक धोरणामध्ये पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या तुलनेत आमूलाग्र बदल करण्यात
आलेले आहेत. ते विद्यार्थ्यांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत वेळेत पोहोचविणे
गरजेचे आहे. विद्यापीठ प्रशासन महाविद्यालयीन समन्वयकांना पॉवरपॉईंट सादरीकरण तयार
करून देत आहे. तथापि, त्यातील विषयांच्या अनुषंगाने स्वतंत्र विचार करून,
स्वयंअध्ययन करून त्याचे आकलन विद्यार्थ्यांसमोर मांडावे. त्यातून उद्भवणाऱ्या
साऱ्या शंका व प्रश्न एकत्रित करून त्यातील सर्वसाधारण प्रश्न एकत्र करून त्यांची
समाधानकारक उत्तरे देऊन त्यांची एक ‘एफएक्यू’ बँक तयार करून सर्वांना देऊ या. अशा रितीने संपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी
प्रयत्न करावा.
यावेळी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.
महादेव देशमुख यांनी उपस्थितांना स्कूल कनेक्ट (एनईपी कनेक्ट) अभियानाच्या
अनुषंगाने सविस्तर सादरीकरण दिले. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता
डॉ. सरिता ठकार आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण
महाजन यांनी या अभियानाची उत्तम पद्धतीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने
महत्त्वपूर्ण सूचना केल्या. उपकुलसचिव डॉ. उत्तम सकट यांनी या कार्यक्रमाचे संचालन
केले. मान्यवरांनी उपस्थितांच्या शंकांचे समाधानही केले. कार्यशाळेस विविध महाविद्यालयांचे
आयक्यूएसी, एबीसी आणि एनईपी समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment