Tuesday, 9 January 2024

राज्य सांस्कृतिक पुरस्कारामुळे हरहुन्नरी कलावंताचा सन्मान

 शिवशाहीर राजू राऊत यांचे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडून अभिनंदन

शिवशाहीर राजू राऊत यांचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिवाजी विद्यापीठातर्फे ग्रंथभेट देऊन अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर व सौ. राऊत.


कोल्हापूर, दि. ९ जानेवारी: शिवशाहीर राजू राऊत यांना महाराष्ट्र शासनाकडून शाहिरीसाठीचा सांस्कृतिक पुरस्कार जाहीर होणे ही एका हरहुन्नरी आणि विनम्र कलावंताचा सन्मान असून समस्त कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काढले.

येथील सुप्रसिद्ध शिवशाहीर पुरूषोत्तम ऊर्फ राजेंद्र कृष्णाजी राऊत यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा शाहिरी क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार नुकताच जाहीर झाला. त्या निमित्ताने कुलगुरू डॉ. शिर्के यांनी काल (दि. ८ जानेवारी) त्यांची त्यांच्या शिव-छाया निवासस्थानी भेट घेतली. शिवाजी विद्यापीठ परिवारातर्फे शाहू चरित्र ग्रंथ भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.

शाहीर राऊत यांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले की, राजू राऊत हे केवळ शाहीर नाहीत, तर चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, दुर्मिळ वारशांचे संग्राहक आणि अभ्यासक अशा  कलागुणांनी समृद्ध असे त्यांचे व्यक्तीमत्त्व आहे. कोल्हापूरच्या शाहिरी परंपरेचा तर हा सन्मान आहेच, पण त्याचबरोबर हरहुन्नरी, अष्टपैलू कलावंतांची खाण असलेल्या करवीरभूमीचाही गौरव आहे. त्याचा विद्यापीठ परिवारासह समस्त करवीरवासियांना अभिमान आहे. या पुढेही त्यांच्या हातून अशीच सेवा घडत राहावी. त्यासाठी त्यांना दीर्घायुरारोग्य लाभावे, अशा शुभकामनाही कुलगुरूंनी व्यक्त केल्या.

सुमारे तासभराच्या या भेटीमध्ये शाहीर राऊत यांनी त्यांच्या कलात्मक प्रयोगशीलतेचे काही भारावून टाकणारे नमुने सादर केले. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह राऊत परिवारातील सदस्यही उपस्थित होते.

No comments:

Post a Comment