Friday 5 January 2024

माणसांच्या स्मृतींचे विस्थापन भयावह: कृष्णात खोत

 शिवाजी विद्यापीठात लेखक आपल्या भेटीला कार्यक्रमास मोठा प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलताना साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक कृष्णात खोत. मंचावर (डावीकडून) डॉ. माया पंडित, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि डॉ. तृप्ती करेकट्टी.


शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. माया पंडित.


अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के


कोल्हापूर, दि. ५ जानेवारी: माणसांचे विस्थापन हा आजच्या जगण्यातला महत्त्वाचा प्रश्न आहेच, पण माणसाच्या स्मृतींचे जाणीवपूर्वक करण्यात येत असलेले विस्थापन भयावह आहे. हे रोखणे आजघडीला फार महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक कृष्णात खोत यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागाच्या वतीने लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात श्री. खोत यांच्यासह रिंगाण या पुरस्कारप्राप्त साहित्यकृतीच्या इंग्रजी अनुवादक डॉ. माया पंडित यांच्यासमवेत संवाद आयोजित करण्यात आला. वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. या कार्यक्रमास साहित्य रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमात रिंगाणच्या अनुषंगाने बोलताना श्री. खोत म्हणाले, माणूस स्वेच्छा आणि सक्ती या दोन प्रकारांनी विस्थापन स्वीकारतो. स्वेच्छा विस्थापनामध्ये तो त्याला अभिप्रेत प्रगतीच्या अनुषंगाने बदल स्वीकारतो आणि पुढे जातो. त्यामध्ये वेदना आहेत, पण त्यांसह आपण ते विस्थापन मान्य करतो. सक्तीच्या विस्थापनामध्ये आपली मान्यता नसतानाही भाषा, चव, वेशभूषा असा सारा परिवेशच बदलून जातो आणि त्यामुळे असह्य वेदना वाट्याला येते. या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. भौतिक, भौगोलिक विस्थापन गरज किंवा सक्ती म्हणून मान्यही करता येईल, पण सध्या माणसांच्या स्मृतींचे विस्थापन करण्यात येत आहे, ते रोखण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्याचप्रमाणे आपल्यासमवेत सहजीवन जगणाऱ्या जीवांना गृहित धरणे सुद्धा अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेला प्रश्न विचारण्याची जबाबदारी लेखकाची आहे, त्याचप्रमाणे शांततेचा आवाज दीर्घ करीत नेण्याची जबाबदारीही त्याने स्वीकारायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी डॉ. माया पंडित म्हणाल्या, मूळ साहित्यकृतीशी तादात्म्यतेखेरीज अनुवाद साधणे अशक्य असते. कृष्णात खोत यांनी विस्थापितांच्या परवडीचे केलेले चित्रण विदारक आणि अस्वस्थ करणारे आहे. त्यांचे जगणे आपल्यातून प्रवाहित होऊ द्यायला हवे. त्यांच्या दुःखाशी तादात्म्यता अत्यावश्यक आहे अन्यथा विनाश अटळ आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कृष्णात खोत हे संवेदनशील लेखक आहेत. माणसांचं, त्यांच्या जगण्याचं वर्षानुवर्षांचं निरीक्षण आणि अनुभव यांच्या संचितातून त्यांच्या साहित्यकृती जन्मल्या आहेत. विस्थापितांसोबत राहून, त्यांच्या वेदना जाणून घेऊन केलेले हे लेखन आहे. त्यांचे लेखन हे एक प्रकारचे समाज संशोधनच आहे. त्याचा समग्र अर्क रिंगाणमध्ये उतरला आहे. या पुस्तकाला आता साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याने अनेक भाषांत त्याचे अनुवाद होतील; मात्र, या कादंबरीचे मोल ओळखून पुरस्कारापूर्वीच तिचा अनुवाद केल्याबद्दल डॉ. माया पंडित या देखील अभिनंदनास पात्र आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते श्री. खोत यांचा साहित्य अकादमी पुरस्कार घोषित झाल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने शाल व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. अनुवादक डॉ. पंडित यांचाही सत्कार कुलगुरूंच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी केले. मेघा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. चंद्रकांत लंगरे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास वनस्पतीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. राजाराम गुरव, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. रणधीर कांबळे, डॉ. रघुनाथ कडाकणे, डॉ. प्रभंजन माने, विलास सोयम, प्रा. शांताराम कांबळे, डॉ. सुनिल पाटील, डॉ. गोमटेश पाटील यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment