Wednesday 3 January 2024

साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल

कुलगुरूंकडून कृष्णात खोत यांचा गौरव

 

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक कृष्णात खोत यांचा ग्रंथभेट व अभिनंदनाचे पत्र देऊन गौरव करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत डॉ. नंदकुमार मोरे व सौ. खोत.


कोल्हापूर, दि. ३ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून आणि कोल्हापूरचे सुपुत्र म्हणून आपणास मिळालेल्या यशाचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक कृष्णात खोत यांचा गौरव केला.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी काल (दि. २) सायंकाळी श्री. खोत यांच्या फुलेवाडी येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे ग्रंथभेट आणि अभिनंदनाचे पत्र प्रदान करून अभिनंदन केले. त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले. कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला नुकताच नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी तासभरापेक्षा अधिक काळ श्री. खोत यांच्याशी रिंगाणसह त्यांच्या अन्य साहित्यकृतींच्या अनुषंगानेही चर्चा केली. निसर्ग आणि मानव यांच्यातील सहसंबंधांची जागा जर स्पर्धेने किंवा युद्धाने घेतली, तर त्या युद्धात मानव कधीही जिंकू शकणार नाही. त्याचप्रमाणे पाळीव जनावरांमध्ये जर पुन्हा वन्य होण्याच्या शक्यता आजही असतील, तर माणसातील जनावर सुद्धा कधीही हिंस्त्र होण्यासाठी आसुसलेले राहील, याचीही शक्यता दाट आहे, याचे सूचनच रिंगाणमधून अत्यंत प्रत्ययकारितेने केले आहे. ते आपल्यातल्या माणूसपणाला आवाहन करणारे आहे, असे यावेळी कुलगुरू म्हणाले.

त्याचप्रमाणे श्री. खोत यांना दिलेल्या अभिनंदन पत्रात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी म्हटले आहे की, आपण 'गावठाण' कादंबरीपासून वाचकांना सुपरिचित आहात. प्रतिष्ठित मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली ही कादंबरी शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही समाविष्ट होती. पुढे आपल्या 'रौंदाळा', 'झडझिंबड' अशा कादंबऱ्या प्रसिद्ध होत राहिल्या. त्यानंतर 'रिंगा' कादंबरी आपल्या लेखनप्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. या कादंबरीत कृषिसंस्कृतीतील पेच चित्रित करण्याबरोबर निसर्ग आणि माणसातील अदिम संघर्ष तसेच त्यांचा सहसंबंध अतिशय कलात्मक पद्धतीने चित्रित केला आहे. धरणप्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावाचे हृद्य चित्र अतिशय प्रत्ययकारकतेने आपण सर्वांसमोर आणले आहे. ही कलाकृती मराठी साहित्यातील ठळक अशी कलाकृती असून या कादंबरीच्या निमित्ताने झालेला आपला सन्मान विशेष कौतुकास्पद आहे.

यावेळी श्री. खोत यांनीही आपल्या कृतज्ञ भावना व्यक्त केल्या तसेच कुलगुरू डॉ. शिर्के यांना आपले पुस्तक भेट दिले. यावेळी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment