Monday, 8 January 2024

युद्धजन्य स्थितीत माध्यमांची शांतता प्रस्थापनेत महत्त्वाची भूमिका: श्रीराम पवार

 'पॅलेस्टाईन आणि इस्राईल संघर्ष: माध्यमांची भूमिका' विषयावर विद्यापीठात कार्यशाळा

शिवाजी विद्यापीठात मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना (डावीकडून) जगदीश गुरवदिग्विजय कुंभारडॉ. निशा पवारडॉ. प्रताप पाटीलडॉ. शिवाजी जाधवश्रीराम पवारदशरथ पारेकरडॉ. एम. पी. पाटीलवृषाली पाटील आदी.


कोल्हापूर, दि. ८ जानेवारी: युद्धजन्य परिस्थिती तसेच संघर्षाच्या काळात प्रसारमाध्यमांनी वस्तुनिष्ठ लेखन करुन समाजात शांतता प्रस्थापित होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची अपेक्षा आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार-संपादक व आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले.

मराठी पत्रकार दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात पॅलेस्टाईन आणि इस्राईल संघर्ष: माध्यमांची भूमिका या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

शिवाजी विद्यापीठाचा पत्रकारिता व जनसंज्ञापन अधिविभाग, कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय, वारणा महाविद्यालय, ऐतवडे खुर्द, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड, शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवे, कोल्हापूर प्रेस क्लब, फोटोग्राफर, व्हीडिओग्राफर अँड एडिटर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी वारणा महाविद्यालयाला नॅकचे मानांकन मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाल्याबद्दल साईसिमरन घाशी यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, माजी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. एम.पी. पाटील, पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या प्रमुख डॉ.निशा मुडे -पवार, वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रताप पाटील, मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, माहिती अधिकारी वृषाली पाटील, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर अँड एडिटर्स असोसिएशनचे जगदीश गुरव, दिग्विजय कुंभार, डॉ. श्रीहरी देशपांडे, परशराम पवार, डॉ.सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

श्रीराम पवार म्हणाले, पॅलेस्टाईन आणि इस्राईल संघर्ष खूप जुना आहे. युद्धजन्य परिस्थितीत जनमानस तयार करण्यासाठी बऱ्याचदा चुकीची माहिती प्रसिद्ध केली जाते. यातून अनेक अफवा पसरवल्या जातात. परिणामी दोन्ही देशांमधील वाद आणखी चिघळला जाऊ शकतो. युद्धजन्य परिस्थितीचे वार्तांकन करताना माध्यमांनी वस्तुनिष्ठतेवर भर देणे आवश्यक आहे. संघर्ष सुरु असणाऱ्या दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण होण्यासाठीची माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे आवश्यक आहे.

ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर म्हणाले, इस्राईल आणि पॅलेस्टाईन संघर्षाला अनेक पैलू आहेत. इस्राईलला अमेरिका सातत्याने मदत करते. अमेरिकेची अर्थव्यवस्था ज्यू उद्योगपतींच्या हातात असल्याने अमेरिकेला इस्राईलला मदत करण्याशिवाय गत्यंतर नाही. या दोन्ही देशांमध्ये संघर्ष होण्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक मुद्देही कारणीभूत आहेत. मुस्लिम, ज्यू आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्म आणि संस्कृतीशी हा संघर्ष जोडला गेला आहे. त्यामुळे हा संघर्ष लवकर मिटेल, असे वाटत नाही. मात्र यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे.

डॉ. एम.पी. पाटील म्हणाले, समाजाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून आपले व्यक्तिमत्त्व घडते. पत्रकारितेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी संवेदनशीलतेने पत्रकारिता करावी. विचार इतके सरळ आणि स्पष्ट ठेवावेत की समोरच्याचे वाईट विचार नष्ट व्हावेत.

यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, साईसिमरन घाशी यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. प्रताप पाटील यांनी स्वागत केले. डॉ. निशा पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्राजक्ता शहा यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. प्रसाद ठाकूर यांनी आभार मानले. या कार्यक्रमानंतर दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या माजी प्रमुख डॉ. अंजली निगवेकर होत्या.

 


No comments:

Post a Comment