Tuesday, 2 January 2024

नवनिर्मितीक्षम युवा पिढीची देशाला गरज: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

 विद्यापीठात महा-६० कॉर्नेल अॅक्सिलरेटर प्रोग्रामला मोठा प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'महा-६० कॉर्नेल अॅक्सिलरेटर प्रोग्राम'च्या उद्घाटन समारंभात बोलताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. 

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'महा-६० कॉर्नेल अॅक्सिलरेटर प्रोग्राम'च्या उद्घाटन समारंभात बोलताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. मंचावर (डावीकडून) राजकुमार सिंग, अशोक जॉन, अजयकुमार पाटील, डॉ. महादेव देशमुख, डॉ. शिवलिंगप्पा सपली.

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'महा-६० कॉर्नेल अॅक्सिलरेटर प्रोग्राम'ला मोठ्या संख्येने उपस्थित असणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला, शिक्षक व नागरिक.

(शिवाजी विद्यापीठात आयोजित 'महा-६० कॉर्नेल अॅक्सिलरेटर प्रोग्राम'चा लघु-व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. २ जानेवारी: नवनिर्मितीक्षम आणि अभिनव संकल्पनासमृद्ध युवा पिढीची आज देशाला गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग, कॉर्नेल युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क (अमेरिका) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभाग सभागृहात शासनाच्या महा-६० कॉर्नेल एक्सिलरेटर प्रोग्रामअंतर्गत एकदिवसीय महा-६० डिस्ट्रिक्ट आऊटरिच उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह स्टार्टअपविषयी जिज्ञासू नागरिकांचा, इच्छुक व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. यात महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, कॉर्नेल विद्यापीठ हे जागतिक अग्रमानांकित ५० विद्यापीठांपैकी एक असून त्यासमवेत सामंजस्य करार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील युवा वर्गासाठी कौशल्य विकासाची आणि आपल्या स्टार्टअप संकल्पना फुलविण्याची महत्त्वाची संधी उपलब्ध केली आहे. या संधीचा विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी पुढे यायला हवे. भारतीय शिक्षण प्रणाली ही अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये अधिक जखडलेली आहे. त्या तुलनेत परदेशी विद्यापीठांत संशोधन आणि विकास यांच्या जोडीला कन्सल्टन्सी ही फार महत्त्वाची भूमिका बजावते. परदेशातील जवळपास प्रत्येक प्राध्यापकाला या मार्गानेच आपल्यातील विषय प्रभुत्व सिद्ध करावे लागते. आपल्याकडे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेसारख्या मोजक्या संस्था त्या पद्धतीचे काम करतात. या पार्श्वभूमीवर, कॉर्नेल विद्यापीठाच्या सहकार्याने हाती घेण्यात आलेला महा-६० कॉर्नेल एक्सिलरेटर प्रोग्राम फार महत्त्वाचा आहे. त्यामध्ये युवा वर्गाने स्पर्धात्मक पद्धतीने सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या मनातील अभिनव संकल्पना कागदावर उतरवून पुढे त्याचे यशस्वी स्टार्टअपमध्ये रुपांतर करण्याची ही संधी आहे. त्यामुळे कार्यशाळेतील सर्व मार्गदर्शकांचा उपस्थितांनी मनापासून लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी विद्यापीठाच्या नवोन्मेष केंद्राचे संचालक तथा मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी विद्यापीठाची सेक्शन-८ कंपनी, विद्यापीठ-उद्योग संवाद कक्ष आदींच्या माध्यमातून स्टार्टअप हब निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महासंचालक अजयकुमार पाटील यांनी महा-६० एक्सिलरेशन प्रोग्रामविषयी उपस्थितांना अवगत केले. यावेळी मंचावर तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. शिवलिंगप्पा सपली, एक्स.ई.डी. कंपनीचे संचालक अशोक जॉन, सिडबीचे सहाय्यक महाव्यवस्थापक राजकुमार सिंग उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत दिवसभरात विविध सत्रांत राजकुमार सिंग, अशोक जॉन यांच्यासह आर एन् टी रोबोटिक्सचे विश्वजीत खाडे, प्रतीक पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे उपसंचालक अनमोल कोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


No comments:

Post a Comment