शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना विभागीय सहनिबंधक अरूण काकडे. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना विभागीय सहनिबंधक अरूण काकडे. मंचावर (डावीकडून) डॉ. राजन पडवळ, डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व संजय परमणे. |
कोल्हापूर, दि. १८ जानेवारी: सहकार क्षेत्राचे जाळे व्यापक असून या क्षेत्राला कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी आवश्यकता आहे. या क्षेत्रामध्ये बहुस्तरीय संधींची उपलब्धता असून त्यांचा लाभ घेण्यासाठी युवा पिढीने सज्ज व्हावे, असे आवाहन सहकारी संस्था कोल्हापूर विभागाचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार कक्ष, बँक ऑफ इंडिया चेअर आणि गुरूवर्य
लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सहकार क्षेत्रातील रोजगाराच्या
संधी’ या विषयावर आयोजित
कार्यशाळेत विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ.
प्रमोद पाटील होते.
अरुण काकडे म्हणाले, सहकार क्षेत्र म्हटले की प्रामुख्याने प्राथमिक
शेतीपतपुरवठा संस्था नजरेसमोर येतात, पण त्यापलिकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,
सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, सामुदायिक शेती संस्था, सहकारी साखर कारखाने, दुग्ध
व पशुसंवर्धन संस्था, मच्छीमार संस्था, पणन, शेतीमाल, ग्राहक संस्था, यंत्रमाग व
सूतगिरण्या, सहकारी औद्योगिक वसाहती, गृहनिर्माण संस्था यांसह इतरही अनेक प्रकारचे
सहकारी उद्योग आहेत. केवळ महाराष्ट्राचा विचार केल्यास दोन शिखर संस्थांसह राज्यात
एकूण २ लाख २२ हजार ७३८ सहकारी संस्था आहेत. त्यापैकी कोल्हापूर, सांगली, सातारा
या कोल्हापूर विभागामध्येच उपरोक्त सर्वच प्रकारच्या १४,६७८ सहकारी संस्था आहेत. या
सर्व संस्थांमध्ये चांगल्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अनेक संस्थांमध्ये मुख्य
कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक आदी पदांसाठी पात्र उमेदवार मिळत नसल्याने वयाने
ज्येष्ठ व्यक्तींची केवळ अनुभव लक्षात घेऊन नियुक्ती केल्याचीही उदाहरणे आहेत.
यावरुन या क्षेत्रातील अमर्याद संधींची शक्यता लक्षात यावी. केवळ नोकरीच नव्हे, तर
अभिनव स्टार्टअप, उद्योग व स्वयंरोजगार तसेच सोसायटी स्थापनेच्या शक्यताही या
संधींमध्ये आहेत. मात्र, त्या संधी प्राप्त करण्यासाठी आत्मविश्वासाबरोबरच
कामावरील श्रद्धा आणि कठोर परिश्रम यांची मात्र तयारी असायला हवी, असेही त्यांनी
सांगितले. सहकार क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी शासन स्तरावरूनही अनेक
उपयुक्त योजना व सवलती देण्यात येतात. त्यांचा लाभ घेऊन यशस्वी होणे शक्य
असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, सहकाराच्या
क्षेत्रात अमाप संधी असल्या तरी विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या स्तरावर काम
करायचे आहे, याचा निर्णय व्यक्तीगत पातळीवर घेणे गरजेचे आहे. आपापली क्षमता आणि
बुद्धिमत्ता यांचा मेळ घातल्यानंतरच आपल्याला कोणती संधी मिळणार याचे निर्धारण
शक्य आहे. वरिष्ठ स्तरावरील पदे हवी असतील, तर त्यासाठी आवश्यक बुद्धिमत्ता आणि परमोच्च
कष्ट करण्याची तयारीही असायला हवी. लक्ष्य निर्धारित करून आतापासूनच
विद्यार्थ्यांनी वाटचाल सुरू करणे हितावह असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन
यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. राजन पडवळ
यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी मंचावर अधिसभा सदस्य संजय परमणे
उपस्थित होते. कार्यक्रमास विविध अधिविभागांचे रोजगार कक्ष समन्वयक, शिक्षक तसेच वाणिज्य
व व्यवस्थापन, एमबीए आणि अर्थशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी
लक्षणीय उपस्थिती दर्शविली.
No comments:
Post a Comment