शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय परिसंवाद
![]() |
| शिवाजी विद्यापीठात अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित परिसंवादात बीजभाषण करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस. |
कोल्हापूर, दि. ५ ऑगस्ट: महाराष्ट्राचे
समाजशास्त्र खऱ्या अर्थाने समजलेले साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त ‘अण्णा भाऊ साठे आणि मानवतावाद’ या विषयावरील एकदिवसीय
परिसंवाद मानव्यशास्त्र सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी उद्घाटक व बीजभाषक
म्हणून डॉ. गवस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के होते.
डॉ. गवस म्हणाले,
महाराष्ट्राचे समाजशास्त्र हे देशातील अन्य राज्यांपेक्षा खूप वेगळे आहे. येथील
समाजांतर्गत असणारी जातीय उतरंड आणि ती निर्माण होण्यामागील कारणमीमांसा कठोरपणे
समजून घेतल्याखेरीज ते समजणार नाही. अण्णा भाऊंना हे समाजशास्त्र नेमकेपणाने
समजलेले होते. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यामध्ये जागोजागी उमटलेले दिसते. त्यातून
त्यांच्या आस्थेचा परीघ विस्तारलेला होता. शोषित वर्गाकडे नायक म्हणून पाहण्याची
त्यांची दृष्टी त्यातूनच विकसित झालेली होती. एका अर्थाने अण्णा भाऊ हे सांगणारे
नव्हे, तर रचणारे लेखक होते. त्यांच्या साहित्यकृती मिथकांचे पुनरावलोकन करणाऱ्या
आहेत.. केवळ आत्मकथनात्मक न लिहीता रचनात्मक लेखनावर त्यांनी भर दिला. हे रचलेले
सारेच त्यांचे आत्मचरित्र ठरावे. लोकसाहित्य, लोकपरंपरा या अंगाने त्यांनी लेखन
केले. त्यामुळे लोकपरंपरेच्या मूल्यांतून अण्णा भाऊंच्या साहित्याच्या मूल्यमापनाची
नवी निकष व्यवस्था निर्माण करावी लागेल. त्यासाठीच निव्वळ पर्यायी
सौंदर्यशास्त्राची मांडणी करावी लागेल. अभ्यासक, संशोधकांनी या नव्या
सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीकोनातून अण्णा भाऊंच्या साहित्याचे नव्याने संशोधन आणि
मांडणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मार्क्स आणि अण्णा भाऊ
त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ यांना एकमेकांना समांतर ठेवून वाचण्याची,
अभ्यासण्याची गरज डॉ. गवस यांनी व्यक्त केली. बाबासाहेबांनी त्यांच्या संशोधनपर
वैचारिक लेखनातून येथील व्यवस्थेचे जे सखोल चिंतन प्रकट केले, त्याच चिंतनाचे
अण्णा भाऊंनी आपल्या कल्पित व्यूहातून अधोरेखन केल्याचे दिसते. यातून वैचारिक
भूमिकेच्या बाबतीत त्यांचे बाबासाहेबांशी असणारे साम्य ढळढळीतपणे सामोरे येते, असे
त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अण्णा भाऊ साठे
यांचे नातू सचिन साठे म्हणाले, अण्णा भाऊंना काल्पनिकता कधीच भावली नाही. वास्तविकता
आणि प्रामाणिकता हे त्यांच्या समग्र साहित्याचे वैशिष्ट्य आहे.
ज्येष्ठ समीक्षक डॉ.
रणधीर शिंदे म्हणाले, अण्णा भाऊ यांच्या साहित्यामधील मानवतावादी सूत्रे ही प्रेरक
स्वरुपाची आहेत. महाराष्ट्राच्या उभारणीची सुधारणावादी दृष्टी त्यांनी आपले
साहित्य व कार्यातून दिली.
अध्यक्षीय मनोगतात
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी अण्णा भाऊ साठे यांची चरित्रपुस्तिका अध्यासनामार्फत
तयार करण्यात यावी. तसेच, त्यांच्या साहित्यावर निर्माण झालेल्या चित्रपटांचे संकलनाचे
कामही हाती घ्यावे, असे आवाहन यावेळी केले.
अध्यासनाचे समन्वयक डॉ.
अक्षय सरवदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ.
प्रभंजन माने यांनी आभार मानले.
“शोषितांचे महाकाव्य
लिहीणारा महान मानवतावादी”
अण्णा भाऊ साठे हे
शोषित, उपेक्षित, वंचितांच्या रक्त, अश्रू व घाम यांवर महाकाव्य लिहीणारे महान
मानवतावादी साहित्यिक होते, असे ज्येष्ठ विचारवंत डॉ. शरद गायकवाड म्हणाले.
उद्घाटन सत्रानंतर झालेल्या परिसंवादामध्ये ते बोलत होते. गायकवाड म्हणाले, भय,
भूक, दारिद्र्य, अज्ञान आणि गुलामी या सर्व प्रकारे शोषण करणाऱ्यांचे अण्णा भाऊ
कर्दनकाळ होते. देहूच्या तुकारामांनी सोळाव्या शतकात एक तुकाराम गाथा लिहीली, तर
कुसाबाहेरच्या या आधुनिक तुकारामाने बारा बलुतेदारांची, भटक्या-विमुक्तांची बहुजन
गाथा लिहीली. यावेळी सचिन साठे यांनी अण्णा भाऊंनी गोरगरीबांच्या बाजूने लेखन
केले, असे सांगितले. डॉ. धनाजी साठे यांनी अण्णा भाऊंचे साहित्य माणसाला दिशा
देणारे ठरले, असे सांगितले, तर डॉ. उत्तम सकट यांनी अण्णा भाऊंनी आपल्या समग्र
साहित्यामध्ये बहुजन समाजाला सामावून घेतल्याचे सांगितले.


No comments:
Post a Comment