Sunday, 24 August 2025

'लोकल टू ग्लोबल' शिवाजी विद्यापीठ

 ('दै. लोकमत'च्या कोल्हापूर आवृत्तीच्या वर्धापन दिनानिमित्त 'ब्रँड कोल्हापूर' ही विशेष पुरवणी रविवार, दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली. या पुरवणीमध्ये 'ब्रँड शिवाजी विद्यापीठ' या अनुषंगाने विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी लिहीलेला लेख आमच्या ब्लॉगवाचकांसाठी दै. लोकमतच्या सौजन्याने पुनर्प्रकाशित करीत आहोत.)







 

ब्रँड हा शब्द खरे तर व्यावसायिक अगर औद्योगिक अशा नफा मिळवणाऱ्या कंपनी, संस्था यांच्यासाठी वापरण्यात येत असतो. तथापि, शिवाजी विद्यापीठासारख्या सार्वजनिक अकृषी विद्यापीठासाठी ब्रँड हा शब्द योजत असताना शिवाजी विद्यापीठाने मागील साठहून अधिक वर्षांच्या वाटचालीत आपली नाममुद्रा जागतिक स्तरावर प्रस्थापित करण्यापर्यंतचा जो प्रवास केलेला आहे, तो कारणीभूत आहे, असे म्हणावे लागेल. प्रत्यक्षात शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजतागायतची ही वाटचाल तशी सुलभ अथवा सुकर नव्हती. शिवाजी विद्यापीठ १८  नोव्हेंबर १९६२ रोजी स्थापन झाले. या स्थापनेची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू असताना या प्रयत्नांचे त्या काळात स्वागत झाले होते, असे मात्र नव्हते. उलट, कोल्हापुरात आणखी एक खानावळ निघाली,’ अशा शब्दांमध्ये तथाकथित प्रस्थापित अभिजन वर्गाकडून या विद्यापीठाच्या स्थापनेची संभावना केली गेली. मात्र, या विद्यापीठाच्या स्थापनेमागील उदात्त भावाला तडा न जाऊ देता कोणाविषयीही मनी किल्मिष न बाळगता ते स्थापन करण्यात आले आणि विद्यापीठाने आपल्या हीरकमहोत्सवी वाटचालीमध्ये दक्षिण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि सीमावर्ती उत्तर कर्नाटकामध्ये आपली एक स्वतंत्र नाममुद्रा अत्यंत प्रभावीपणे प्रस्थापित केली. महाराष्ट्रातील एक आघाडीचे विद्यापीठ म्हणून आपले स्थान वेळोवेळी अधोरेखित केले. त्याही पुढे जाऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला.

आपल्या पुढील पिढ्यांसाठी उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपल्या कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ होणार, या एकाच भावनेतून शिवाजी विद्यापीठाचा मुख्य परिसर विकसित करण्यासाठी सुमारे एक हजार एकर जमीन येथील कष्टकरी, शेतकरी बांधवांनी दिली. हे दातृत्व सत्पात्री ठरले. कोल्हापूरच्या मातीत शिक्षणाचे महत्त्व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे खऱ्या अर्थाने रुजलेले होते. कोल्हापूरच्या या मातीला स्वतःचा एक स्वतंत्र पोत, दरवळ, अभिमान आणि संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये समावेशकता आहे. कोल्हापूर ही वगळणारी नव्हे; तर, सामावून घेणारी भूमी आहे. येथील रांगडेपण हे खुल्या दिलाचे आहे. येथील मातीच्या कणाकणातून आणि माणसाच्या रोमारोमांतून हा दिलदारपणा वाहतो आहे. त्यामुळेच या भूमीमध्ये अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कला-क्रीडाविषयक चळवळींचा आणि उपक्रमांचा उद्गम झाल्याचे दिसते. कोल्हापूरच्या या भूमीने महाराष्ट्रालाच नव्हे; तर, देशाला सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन प्रदान केला. देशाच्या सामाजिक इतिहासाच्या आशय बदलावर सर्वाधिक मोठा प्रभाव हा कोल्हापूरच्या भूमीने टाकलेला आहे आणि त्याचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये दलित, वंचित आणि बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा प्रवाहित करण्याचे महत्कार्य केले. विद्यार्थी वसतिगृहांची चळवळ ही कोल्हापूरच्या शैक्षणिक चळवळीची एक महत्त्वाची देणगी म्हणून उभी राहिली. महाराजांनी मोठ्या द्रष्टेपणाने आरक्षणाचा निर्णय घेऊन सामाजिक न्याय प्रस्थापनेच्या चळवळीला मोठे पाठबळ दिले. महाराजांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक चळवळीचा वारसा आपल्यासोबत प्रवाहित केला आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा प्रवाह भारतीय संविधानाच्या माध्यमातून पुढे अधिक समग्रपणाने या देशाला प्रदान केला. ही या त्रयीची देशाला फार मोलाची देणगी आहे. स्वाभाविकपणे अनेक महत्त्वाचे समाजसुधारक, क्रांतीकारक, कलावंत, विचारवंत, कार्यकर्ते आणि विद्वान यांची या भूमीने देणगी दिली. ग्रामीण तोंडवळा असला तरी एक प्रकारची सुसंस्कृतता येथील चराचरात वसलेली आहे. या सुसंस्कृत भावामधूनच कोल्हापूरमधील शैक्षणिक चळवळ वृद्धिंगत करण्याच्या कामी येथील प्रत्येक व्यक्तीचा हातभार लागलेला आहे आणि शिवाजी विद्यापीठ हे त्याचे महत्त्वाचे प्रतीक आहे.

छत्रपती राजाराम महाराज आणि राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी शिवाजी विद्यापीठाचे स्वप्न पाहिले, विद्यापीठाचे स्वरूप कसे असावे, याचा आराखडा तयार केला. तथापि अल्पायुष्य लाभल्यामुळे या दोन्ही व्यक्तीमत्त्वांना शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाल्याचे पाहता आले नाही. मात्र कोल्हापूरकरांनी या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी अखंडित प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, सी. रा. तावडे आदींनी पाठबळ दिले आणि शिवाजी विद्यापीठ अस्तित्वात आले. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी या विद्यापीठाला त्याचा वैशिष्ट्यपूर्ण भौतिक आणि शैक्षणिक आकार देण्याची महत्त्वाची कामगिरी केली. त्यांना कुलसचिव डॉ. उषा इथापे यांची जोमदार साथ लाभली. विद्यापीठाचा परिसर, त्याची आखणी व बांधणी या कामी डॉ. पवार करीत असणाऱ्या प्रयत्नांना कोल्हापूरवासीयांची मोठी साथ लाभली. विद्यापीठात काम करणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी, शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सकाळ आणि संध्याकाळचा वेळ तसेच सुट्टीचा वेळ येथील इमारतींच्या बांधकामासाठी दिला. त्यात कोणीही अजिबात कमीपणा मानला नाही. रुपया-रुपयाची तिकिटे काढून ती देणगी विद्यापीठाला देण्यात आली. विद्यापीठाच्या प्रांगणामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी परिसरातील साखर कारखान्यांच्या शेतकरी सभासदांनी रुपया-रुपयाची मदत केली. अशा लोकवर्गणीचा वारसा या विद्यापीठाला आहे. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घामाचा आणि श्रमाचा वारसा लाभल्यामुळे शिवाजी विद्यापीठ हे या श्रमिकांच्या मुलांच्या भवितव्य घडवणुकीचे एक ज्ञानमंदिर ठरले आहे. या मुलांमधून शिक्षक ते कुलगुरू, कामगार ते आमदार-खासदार, कर्मचारी ते कंपनीचालक, प्रयोगशाळा सहायक ते जगद्विख्यात संशोधक अशा सर्वच पातळ्यांवर योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी देणगी या विद्यापीठाने श्रमिकांच्या घराघरांतून देशाला आणि जगाला दिली आहे. त्यामध्ये डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यापासून ते विद्यमान कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यापर्यंत प्रत्येक कुलगुरूंनी शिवाजी विद्यापीठाची शैक्षणिक व संशोधकीय वाटचाल ही अधिकाधिक कालसुसंगत होत राहील, याची डोळ्यांत तेल घालून दक्षता घेतली.

सन १९६२ मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि सिसंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत मिळून अवघी ३४ संलग्नित महाविद्यालये, पाच पदव्युत्तर अधिविभाग आणि १४,००० विद्यार्थी अशा पद्धतीने सुरुवात झालेल्या या विद्यापीठामध्ये आज कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये ३४ पदव्युत्तर अधिविभाग, २९७ महाविद्यालये आणि अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या ६२ वर्षांत या विद्यापीठातून सुमारे १६ लाख विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पदवी प्राप्त केलेल्या आहेत. देशाच्या राष्ट्रपतींपासून ते विविध क्षेत्रांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना या विद्यापीठाने डी.लिट. ही आपली मानद पदवी सन्मानपूर्वक प्रदान केली आहे आणि या व्यक्तींनीही तितक्याच आदरपूर्वक या पदवीचा स्वीकार केला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील विविध औद्योगिक वसाहतींच्या विविध कारखान्यांतून, कंपन्यांतून याच विद्यापीठाचे विद्यार्थी काम करत आहेत. त्याचप्रमाणे अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका अशा सर्वच खंडातील विविध देशांमधील जगद्विख्यात कंपन्या, वित्तीय संस्था, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे यांमधूनही शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी प्रभावी कामगिरी बजावताना दिसत आहेत. शिवाजी विद्यापीठाने केवळ देशातीलच विद्यार्थी घडविले आहेत, असे नव्हे; तर, परदेशांतील विद्यार्थी सुद्धा अलीकडील काळात शिवाजी विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यास प्राधान्य देत आहेत. या देशांमध्ये अमेरिका, युरोपमधील विद्यार्थी नसतील कदाचित; मात्र, आफ्रिका, मध्यपूर्वेसह आशियातील विविध देशांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित, उपेक्षित अशा वर्गातून येणारे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठात उच्चशिक्षण घेऊन मायदेशी परतून उत्तम योगदान देत आहेत. यामध्ये पीएचडी धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे, हे विशेष. म्हणजे केवळ स्थानिक वंचितांचाच नव्हे; तर, जागतिक स्तरावर वंचित असणाऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा शिवाजी विद्यापीठ आधार देण्याचे आणि शिक्षणाच्या प्रवाहात त्यांचे सम्मीलन करण्याचे कार्य करीत आहे, हे खऱ्या अर्थाने शिवाजी विद्यापीठाचे लोकल टू ग्लोबल देणे आहे.

नॅकच्या ++’ विद्यापीठ अनुदान आयोगाकडून कॅटेगरी-1’ हा दर्जा प्राप्त करणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले. ब्रिक्स देशांसाठीच्या जागतिक क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगपासून टाइम्स रँकिंगपर्यंत विविध क्रमवारीमध्ये शिवाजी विद्यापीठ सातत्याने झळकत आहे आणि त्यामधील त्याची कामगिरी वर्षागणिक वृद्धिंगत होत आहे. स्टँनफर्ड युनिव्हर्सिटीच्या जागतिक आघाडीच्या दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये शिवाजी विद्यापीठातील १४ शास्त्रज्ञांचा समावेश आहे. तर जागतिक ए. डी. सायंटिफिक इंडेक्समध्ये विद्यापीठातील ९६ संशोधकांचा समावेश आहे. अशा पद्धतीने अवघ्या साठ वर्षांच्या कालावधीत विद्यापीठाने जागतिक संशोधन क्षेत्रामध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटविलेला आहे. आकडेवारीच्या स्वरूपात सांगावयाचे झाल्यास विद्यापीठाच्या संशोधकांनी आजवर दहा हजारांहून अधिक शोधनिबंध जागतिक व राष्ट्रीय शोधपत्रिकांतून प्रसिद्ध केले आहेत. या शोधनिबंधांना दोन लाखांच्या घरात सायटेशन प्राप्त झालेले आहेत. विद्यापीठाचा एच इंडेक्स १३८ आहे. विद्यापीठाच्या इनक्युबॅशन सेंटरमध्ये साठहून अधिक प्रकल्पांवर काम करण्यात आले असून त्या माध्यमातून वीस स्टार्टअप कंपन्या सुरू झालेल्या आहेत. विद्यापीठातील संशोधकांनी ५० हून अधिक पेटंट मिळवली आहेत. तर, तितकेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आघाडीच्या संस्थांसमवेत सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. मटेरियल सायन्स आणि जैवतंत्रज्ञान या विषयांमध्ये शिवाजी विद्यापीठ देशातील आघाडीच्या दहा संस्थांमधील एक आहेच; त्यापलीकडे ग्रीन केमिस्ट्री, नॅनो टेक्नॉलॉजी, व्हीएलएसआय डिझाईन, बायोरिमेडिएशन, बायोडायव्हर्सिटी, बायो प्रोस्पेक्टींग, सिम्युलेशन अँड मॉडेलिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा मायनिंग, एनर्जी टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स, न्यूट्रस्युटिकल फूड्स, जिओ-इन्फॉर्मेटिक्स, ई-कॉमर्स इत्यादी विषयांमध्येही विद्यापीठाने मोठी आघाडी घेतलेली आहे. एसयुके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन या सेक्शन-८ कंपनीच्या माध्यमातून विद्यापीठ स्थानिक प्रज्ञावंतांना त्यांचे प्रकल्प उभारण्यासाठी लॅब टू लँड पद्धतीने मदत करीत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्येही शिवाजी विद्यापीठ अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने वाटचाल करीत आहे. संलग्नित महाविद्यालयांना पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रोत्साहन देऊन त्यांचे सक्षमीकरण करीत असतानाच विद्यापीठाने पदवी स्तरावरील अनेक वेगळे आणि महत्त्वाचे अभ्यासक्रम सुरू करण्यासही प्राधान्य दिले आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग, फिल्म मेकिंग, स्पोर्ट्स, बीकॉम (बीएफएसआय) अशा अनेक अभिनव अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे. आणखीही काही नव्या अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. ऑनलाईन व दूरशिक्षणाच्या माध्यमातूनही हजारो गरजूंपर्यंत शिक्षण पोहोचविण्यातही विद्यापीठ यशस्वी झाले आहे. ऑनलाईन एमबीएसारखा आधुनिक अभ्यासक्रमही याद्वारे अत्यंत माफक शुल्कात उपलब्ध करण्यात आला आहे.

आधुनिक अभ्यासक्रम आणि संशोधन उपक्रम प्रकल्प राबवत असताना शिवाजी विद्यापीठाने समाजाभिमुखतेची कास कोठेही सोडलेली नाही. १९६८पासून विद्यापीठ कमवा आणि शिका ही योजना राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आपली कारकीर्द घडविली आहे, घडवित आहेत. येथील विद्यार्थ्यांनी अगदी कुलगुरूपदापर्यंत सुद्धा मजल मारलेली आहे. आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मागेल त्याला काम ही योजना सुद्धा विद्यापीठ राबवित आहे. दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. शिवाजी विद्यापीठाची कल्याण निधी योजना ही राष्ट्रीय पातळीवर गौरविली गेली आहे. या योजनेचा विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना अल्प वर्गणीमध्ये मोठा लाभ मिळालेला आहे. शिवाजी विद्यापीठ हे कर्नाटकशी लगत आहे. त्यामुळे सीमाभागातील अनेक मराठी भाषिक विद्यार्थी शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेत असतात. या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने अनेक सवलत योजना राबविल्या आहेत. त्याचा या विद्यार्थ्यांना निश्चितपणाने लाभ होतो. अग्रणी महाविद्यालय योजना ही सुद्धा अतिशय यशस्वीपणे राबवणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील एकमेव आहे. विद्यापीठाचे वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन या योजना राष्ट्रीय स्तरावर वाखाणल्या गेल्या आहेत.

विद्यापीठ हे आपल्या सर्व घटकांशी नित्य जोडलेले आहे. या सहसंबंधाची, नात्याची प्रचिती देणारे अनेक प्रसंग सांगता येतील. वानगी दाखल सांगावयाचे झाल्यास विद्यापीठाचे माजी कर्मचारी पंडित मारुलकर आणि त्यांच्या पत्नी रजनी यांनी त्यांची कन्या अस्मिता मारुलकर हिच्या स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठाला ३५ लाख रुपयांची देणगी दिली. या देणगीमधून विद्यापीठाच्या प्रांगणात अस्मिता यांच्या नावे संशोधक विद्यार्थिनींसाठी अतिशय दर्जेदार वसतिगृह साकारले आहे. अशाच प्रकारे शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाचे माजी प्रमुख अॅड. राम पणदूरकर आणि त्यांच्या पत्नी हेमकिरण यांनी विद्यापीठाला त्यांची मुलगी अॅड. रूपाली पणदूरकर यांच्या स्मरणार्थ साठ लाख रुपयांची देणगी दिली. या देणगीमधून कमवा आणि शिका विद्यार्थिनींच्या वसतिगृहाच्या आवारात दुमजली प्रशस्त अभ्यासिकेची उभारणी करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाकडे अशा देणगीदारांचा खूप मोठा ओघ आहे. या देणगीमधून विद्यापीठात विविध विषयांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येतात. अनेकांच्या देणगीमधून मान्यवरांच्या नावे व्याख्यानमालाही दरवर्षी आयोजित करण्यात येतात. शिवाजी विद्यापीठामध्ये आज शिक्षण घेत असणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण हे ५० टक्क्यांहून अधिक आहे. या विद्यार्थिनींसाठी विद्यापीठ परिसरात वसतिगृहे उपलब्ध असली, तरी त्यांच्या वाढत्या संख्येमुळे विद्यार्थिनी वसतिगृहांची संख्या वाढविणेही क्रमप्राप्त आहे. ही बाब लक्षात आल्याने विद्यापीठाने गतवर्षी लोकस्मृति विद्यार्थिनी वसतिगृहाची संकल्पना मांडली. लोकांनी आपल्या नातेवाईक अथवा सुहृदांच्या नावे विद्यापीठास देणगी द्यावी, त्या देणगीमधून या वसतिगृहामध्ये विद्यार्थिनींसाठी निवासी कक्ष उभारण्यात येतील आणि त्या कक्षाला त्या संबंधित व्यक्तीचे नाव देण्यात येईल, अशी ही संकल्पना आहे. महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमासाठी अवघ्या काही दिवसांत लाखो रुपयांचा निधी विद्यापीठास प्राप्त झाला. त्यामधून विद्यापीठात आज लोकस्मृति वसतिगृहाचा तळमजला पूर्ण झाला असून वरील मजल्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. अशा पद्धतीने लोकाभिमुख वाटचाल करीत शिवाजी विद्यापीठाने एक ब्रँड होण्यापर्यंतचा आपला प्रवास केला आहे. ही नाममुद्रा या परिसरातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाच्या मनात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हृदयावर कोरलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक या भागातून जर शिवाजी विद्यापीठ वजा केले, तर जे १६ लाख विद्यार्थी गेल्या साठ वर्षांत शिक्षणाच्या प्रवाहात दाखल झाले, त्यांच्या हातून जे काही सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे योगदान प्राप्त झाले, ते घडले नसते. शेतीच्या बांधापासून ते जगातल्या आघाडीच्या कंपन्यांपर्यंत लोकल ते ग्लोबल नागरिकांच्या गरजा भागविण्यासाठी अथक योगदान देत असलेल्या हरेक ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. हेच शिवाजी विद्यापीठ या नाममुद्रेचे जागतिक समुदायासाठीचे योगदान आहे. ही समाजाभिमुखता, लोकाभिमुखता हाच ब्रँड शिवाजी विद्यापीठ आहे, जो ब्रँडिंगवर एक पैही खर्च न करता निर्माण झालेला आहे.


No comments:

Post a Comment