कोल्हापूर, दि.
६ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या श्री शहाजी
छत्रपती महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रातील विद्यार्थिनी ऐश्वर्या नामदेव बल्लाळ यांची
महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक (Canal Inspector) पदावर नियुक्ती झाली
आहे. त्याबद्दल विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी यांच्या हस्ते
त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
ऐश्वर्या बल्लाळ
यांनी एम.ए. (इतिहास) पदव्युत्तर शिक्षण दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या माध्यमातून
पूर्ण केले आहे. अभ्यासक्रमादरम्यान त्यांनी राज्य पात्रता परीक्षा (SET) तसेच राष्ट्रीय पात्रता
परीक्षा (NET) उत्तीर्ण केली असून JRF (Junior
Research Fellowship) प्राप्त केली आहे.
सध्या त्या शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागात डॉ. अवनीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
"१८८५ ते १९८४ पर्यंतचा संविधानात्मक विकास आणि महिला" या विषयावर पीएच.डी.
संशोधन करत आहेत.
या आधीही त्यांची
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी तसेच महसूल सहायक
या पदांवर निवड झाली आहे. सध्या त्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे पाटबंधारे विभागात
कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
यावेळी ऐश्वर्या
बल्लाळ म्हणाल्या, "बी.एस्सी. संख्याशास्त्र विषयातून पदवी घेतल्यानंतर मी शिक्षण थांबवले
होते. परंतु स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासादरम्यान हे लक्षात आले की, दूरशिक्षणाच्या माध्यमातून अपूर्ण शिक्षण
पूर्ण करता येते आणि स्पर्धा परीक्षेस उपयुक्त असणारे विषयही निवडता येतात. म्हणून
मी इतिहास विषयातून एम.ए. पूर्ण केले आणि याच शिक्षणामुळे मला SET, NET आणि स्पर्धा परीक्षांमध्ये
यश मिळवता आले. या यशात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचा मोलाचा वाटा आहे."
डॉ. मेघा गुळवणी
म्हणाल्या, "दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र हे केवळ शिक्षणाचे माध्यम नाही, तर शिक्षणात खंड पडलेल्यांना मुख्य प्रवाहात
पुन्हा आणून त्यांना कौशल्याधारित शिक्षण, मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध
करून देणारे प्रभावी साधन आहे. श्रीमती बल्लाळ यांचा यशस्वी प्रवास हे त्याचे उत्तम
उदाहरण आहे."
कार्यक्रमास केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील, गणित अधिविभाग प्रमुख डॉ. मच्छिंद्र गोफणे,
उपकुलसचिव व्ही.बी. शिंदे, सहायक कुलसचिव दिलीप मोहाडीकर, समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर, सहायक प्राध्यापक डॉ. मुफिद मुजावर, डॉ. नितीन रणदिवे, डॉ. सुशांत माने, विशाल
हिलगे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment