Tuesday, 19 August 2025

शिवाजी विद्यापीठाचे काळसेकर काव्य पुरस्कार

अरूणचंद्र गवळी, फेलिक्स डिसोजा यांना जाहीर

कवी अरूणचंद्र गवळी

कवी फेलिक्स डिसोजा


कोल्हापूर, दि. १९ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रख्यात कवी सतीश काळसेकर आणि ऋत्विज काळसेकर यांच्या वाङ्‌मयीन कार्याच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणारे सन २०२५ साठीचे काव्य पुरस्कार सुप्रसिद्ध कवी अरुणचंद्र गवळी आणि कवी फेलिक्स डिसोजा यांना जाहीर करण्यात आले आहेत.

विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठीतील लक्षणीय कवीच्या एकंदर काव्यलेखन कामगिरीसाठी दिला जाणारा 'सतीश काळसेकर काव्य पुरस्कार' अरुणचंद्र गवळी यांना जाहीर झाला आहे. एकवीस हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अरुणचंद्र गवळी हे मराठीतील एक महत्त्वाचे कवी आहेत. त्यांच्या 'अरुणचंद्र गवळीच्या कविता' या संग्रहातून मौलिक स्वरूपाची काव्यविषयक जाणिव प्रकट झाली आहे. मराठीतील मान्यवर नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या असून त्यांच्या कवितेतून ठळक असे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय भान व्यक्त झाले आहे.

नव्या पिढीतील आश्वासक काव्यलेखनासाठी दिला जाणारा 'ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार २०२५ कवी फेलिक्स डिसोजा (वसई) यांना देण्यात येणार आहे. दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. फेलिक्स डिसोजा यांनी नोंदीनांदीआणि आरशात ऐकू येणारं प्रेमया संग्रहातून अतिशय लक्षणीय स्वरूपाचे काव्यलेखन केलेले आहे.

सतीश काळसेकर यांच्या कुटुंबियाकडून देण्यात येणाऱ्या देणगीमधून शिवाजी विद्यापीठाच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात. यंदा पुरस्काराचे चौथे वर्ष असून यापूर्वी ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके, नारायण कुलकर्णी कवठेकर आणि अनुराधा पाटील यांना सतीश काळसेकर काव्य पुरस्काराने तसेच दिशा पिंकी शेख, वर्जेश सोळंकी व वीरधवल परब यांना 'ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शिवाजी विद्यापीठाच्या वतीने हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment