कोल्हापूर, दि.25 ऑगस्ट - क्रांतिअग्रणी कॉमरेड जी.डी.बापू लाड हे सत्ता, संपती, प्रतिष्ठा याच्या पलीकडे जावून मातृभूमीसाठी झगडणारे थोर स्वातंत्र्यसेनानी होते. आपला देश, आपली माणसे आणि एक समाजवादी स्वप्न घेवून ते जगत होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत उत्तम कांबळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागामार्फत भारतीय स्वातंत्र्यलढयातील थोर स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक क्रांतिअग्रणी जी.डी.(बापू) लाड यांच्या नावे अध्यासन सुरू करण्यात आले.त्याच्या शुभारंभ प्रसंगी 'भारतीय स्वातंत्र्य लढा आणि जी.डी.बापू लाड' या विषयावर ते बोलत होते.राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील होते, तर आमदार अरूणअण्णा लाड प्रमुख उपस्थित होते.
ज्येष्ठ विचारवंत कांबळे पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील सगळयात अधिक क्रांतीकारक पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या काठावर जन्माला आलेले आहेत. जे-जे नवनिर्माणाचे क्षेत्र होते त्या ठिकाणी बापूनीं कामे केलेली आहेत, हे खूप महत्वाचे आहे. त्यांच्या कामांवर त्यांच्या शत्रुनेही टिका केलेली नव्हती.तेवढे निकोप कामे त्यांनी केलेली आहेत.1857 ला बंड झाले आणि स्वातंत्र्य चळवळ चालू झाली.1930 पर्यंत स्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणणारा वर्ग होता.त्यानंतर, स्वातंत्र्य कोणाला पाहिजे यावर चर्चा करणारा वर्ग निर्माण झाला.महात्मा गांधीजींचे देशाच्या स्वातंत्र्य लढयामध्ये मोठे योगदान होते.प्रत्येकाला रोजी रोटी देणारे, सुखाने आणि शांततेत जगायला देणारे स्वातंत्र्य अपेक्षित होते.राजकीय स्वातंत्र्य पाहिजे म्हणारा गट 1920 नंतर क्षीण झाला होता.स्वातंत्र्य प्रथम की सामाजिक सुधारणा प्रथम पाहिजे यावर आणि स्वातंत्र्याचे विभाजन कसे होणार यावर प्रचंड चर्चा झाली.आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य नसेल तर राजकीय स्वातंत्र्याला अर्थ शून्य असेल असा विचारही पुढे आला.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेत जाणार एक गट तयार झाला आणि दुसरा गट देशाचे नवनिर्माण कसे करावे. तसेच, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक गुलामगिरी नष्ट कशी करता येईल, हे पाहणाऱ्या गटामध्ये कॉमरेड बापू होते.बापूंसारख्या माणसांची आज खऱ्या अर्थान गरज आहे.कोण-कोणत्या क्षेत्रामध्ये असा माणूस काम करतो, समाजाला आणि देशाला याचा काय उपयोग होतो याचा विचार केला पाहिजे.सहकार, शिक्षण, सामाजिक सुधारणा, अन्याय अत्याचार विरूध्द लढा त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अंदोलनामध्ये त्यांनी प्रवेश केला.सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रगती करणारे माणसे निर्माण करावयाची आहेत हे कॉमरेड बापूंनी ओळखले होते. महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे-जेवढे विद्यापीठे आहेत तेवढया सगळया विद्यापीठांनी आपल्या आजू-बाजूच्या परिघात घडलेला इतिहास अभ्यासाच्या रूपाने आपल्या विद्यार्थ्यांसमोर आणावा.युजीसीचे नियम पाळूनसुध्दा आपण आपले स्थानिक इतिहास समाजापुढे आणू शकतो.इतिहासाचा अर्थ सम्यकपणे सांगण्याचा अर्थ या अध्यासन केंद्राचा असेल.तुम्ही जसा इतिहास चालवता तसा इतिहास चालतो.आपण तो इतिहास चालऊ जो कॉमरेड बापूंनी तयार केलेला आहे.बापूंनी साहित्य, कलावंतांसाठी पुरस्कार चालू केले. त्यांच्या कार्याचा सगळा लेखाजोका मराठी साहित्यामध्ये येत नाही, याचा निश्चित विचार व्हावा.
आमदार अरूणअण्णा लाड मनोगतामध्ये बोलताना म्हणाले, क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.(बापू) लाड यांनी केले कार्य, चळवळ समाजापर्यंत पोहचले पाहिजे. त्यांच्या लढयातील वस्तुनिष्ठ इतिहास समाजापुढे आणावा, हा प्रमुख उद्देश अध्यासन केंद्राचा आहे.समाज हेच त्यांचे कुटुंब होते.स्वातंत्र्य लढयामध्ये त्यांनी स्वत:ला झोकून दिले.अन्याय, अत्याचार आणि दृष्टप्रवृत्तींच्या विरोधात ते नेहमी आक्रमक होते.
अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना डॉ.प्रमोद पाटील म्हणाले, क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.(बापू) लाड यांच्या कार्याचे क्षितीज खूप विस्तीर्ण आहे.ते समजवून घेण्यासाठी निश्चितपणे संशोधन झाले पाहिजे.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे, श्रीमती सरोज (माई) पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
क्रांतिअग्रणी जी.डी.(बापू) लाड अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.डॉ.नंदकुमार मोरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सृत्रसंचालन केले तर डॉ.नवनाथ गुंड यांनी आभार मानले.
यावेळी सरपंच किरण लाड, लाड कुटुंबीय, व्यैंकाप्पा भोसले, डॉ.अशोक चौसाळकर, डॉ. भारती पाटील, माया पंडीत नारकर, विश्वनाथ माळी, डॉ.जी.पी.माळी, माजी कुलसचिव डॉ.डी.व्ही.मुळे, शरद नावरे, प्राचार्य टी.एस.पाटील, पी.पी.कुंभार, आर.बी.पाटील, दीनकर पाटील, आर.जी.कुलकर्णी यांचेसह विद्यापीठातील शिक्षक, संशोधक विद्यार्थी, आणि कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथून आलेले शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
-----



No comments:
Post a Comment