Friday, 22 August 2025

विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी नागेशकर चषकाचे न्यू कॉलेज सातव्यांदा मानकरी

शिवाजी विद्यापीठाचे क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील आणि त्यांचे क्रीडापटू व सहकारी. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाचे क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर द्वितिय क्रमांकाचे पारितोषिक कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के. शानेदिवाण आणि त्यांचे क्रीडापटू व सहकारी. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाचे क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयाचे डॉ. अनिल कुराडे आणि त्यांचे क्रीडापटू व सहकारी. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवर.

(शिवाजी विद्यापीठ मेघनाथ नागेशकर पारितोषिक प्रदान समारंभाची लघुचित्रफीत)





कोल्हापूर, दि. २२ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या ग्रामीण भागातून आलेले क्रीडापटू अतिशय कष्ट आणि संघर्षातून आपली कारकीर्द घडवित आहेत. त्यांच्यामुळेच विद्यापीठाचा लौकिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वाढत आहे, असे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२३-२४ साठीच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर पुरस्कारांचे वितरण आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर येथील दि न्यू कॉलेजने सर्वाधिक १०५२ गुण प्राप्त करीत सलग सातव्या वर्षी प्रथम क्रमांकाचा क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर फिरता चषक, कायमस्वरुपी चषक, प्रमाणपत्र आणि रोख रु. ५० हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठात आणि संलग्नित महाविद्यालयांत प्रवेशित होणारे बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनी परिसरातील खेडापाड्यांतून येतात. क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडविण्यासाठी अव्याहत कष्ट करतात. त्यांना विविध स्पर्धांमध्ये मिळणारे यश हे त्यांच्या कष्ट, संघर्षाचे फलित आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांच्या पाठिंब्याचा गौरव सुद्धा आहे. या विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा प्रदान करण्यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील आहे.

यावेळी कोल्हापूर येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने ६३४ गुण प्राप्त करीत द्वितिय क्रमांकाचा चषक, प्रमाणपत्र आणि रोख २५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. तर, गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालय साहित्य, वाणिज्य आणि डी.एस. कदम विज्ञान महाविद्यालयाने ५२४ गुणांसह तृतीय क्रमांकाचा चषक, प्रमाणपत्र आणि रोख १५ हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. आर.के. शानेदिवाण आणि डॉ. अनिल कुराडे यांनी अनुक्रमे तिन्ही क्रमांकाच्या पारितोषिकांचा स्वीकार केला. या तिघांनीही यावेळी आपले कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले.

विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एन.डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर किरण पाटील यांनी आभार मानले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. ज्योती जाधव, मानवविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राहुल मगदूम, अमर सासणे, सुचय खोपडे, डॉ. धनंजय पाटील यांच्यासह पारितोषिक विजेत्या महाविद्यालयांतील क्रीडापटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदापासून पारितोषिकाच्या व्याप्तीत वाढ

गतवर्षीपर्यंत क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर पारितोषिक हे केवळ एकाच महाविद्यालयाला देण्यात येत असे. त्यामध्ये फिरता चषक आणि प्रमाणपत्र यांचा समावेश असे. त्यामुळे अन्य महाविद्यालयांना त्यांच्या प्रगतीविषयी काही कल्पना येत नसे. या संदर्भात अनेक महाविद्यालयांकडून विचारणा होत असे. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाच्या अधिकार मंडळांसमोर मांडण्यात आली. त्यानुसार व्यवस्थापन परिषदेने या विषयाचा साद्यंत आढावा घेऊन पारितोषिकाची व्याप्ती या वर्षापासून वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, प्रथम तीन महाविद्यालयांना गुणांकनानुसार पारितोषिके देण्याचे ठरले. फिरत्या चषकासोबतच कायमस्वरुपी चषक, प्रमाणपत्र आणि अनुक्रमे ५० हजार, २५ हजार आणि १५ हजार रुपये रोख पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज पारितोषिक वितरण करण्यात येत असल्याची माहितीही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी यावेळी दिली.


No comments:

Post a Comment