![]() |
| शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाच्या विस्तार इमारतीमध्ये फीत सोडवून प्रवेश करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सचिन पन्हाळकर आदी. |
भूगोल
अधिविभागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिओइन्फॉर्मेटिक्स अभ्यासक्रमांसाठी
जागेची आवश्यकता लक्षात घेऊन गतवर्षी ऑक्टोबरमध्ये नूतन विस्तार इमारतीच्या कामास
प्रारंभ करण्यात आला. एक वर्ष पूर्ण होण्याच्या आत इमारतीचे उद्घाटन करण्यात आले
आहे. ४०७७ चौरस फूट (३७८.९६ चौ. मीटर) इतके तळमजल्याचे बांधकाम झाले आहे. जेनेसिस
डिझाईनर्स प्रा. लि. हे आर्किटेक्ट आहेत.
आज कुलगुरू
डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते कोनशिला अनावरण नियोजित होते. तथापि,
जिओइन्फॉर्मेटिक्स विषयाच्या सायली यादव आणि निकिता जाधव या विद्यार्थिनींना बोलावून
कुलगुरूंनी त्यांच्या हस्ते कोनशिला अनावरण केले. त्यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के आणि
प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी इमारतीमध्ये फीत सोडवून प्रवेश केला. यावेळी सिव्हील
कंत्राटदार उदय घोरपडे, अनिरुद्ध घोरपडे आणि विद्युत ठेकेदार श्रीकांत गुजर यांचा
कुलगुरूंच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यापीठाच्या भूगोल
अधिविभागामध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांच्या बरोबरीने सन २००८ पासून
जिओ-इन्फॉर्मेटिक्स या विषयामध्ये पीजी-डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू आहे. सन २०२२
पासून वाढती मागणी लक्षात घेऊन एम.एस्सी.- जिओइन्फॉर्मेटिक्स हा अभ्यासक्रमही सुरू
करण्यात आला. शासनाची सर्व धोरणे आता जिओइन्फॉर्मेटिक्सशी निगडित आखली जाऊ लागली
आहेत. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्प, महापूर व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, नगर
विकास व भूमापन, भूमी अभिलेख, महसूल इत्यादी अनेक शासकीय क्षेत्रांमध्ये याचा वापर
वाढला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्यांना
रोजगार संधीही मुबलक उपलब्ध होत आहेत. उपरोक्त दोन्ही अभ्यासक्रमांना मिळून ७०
विद्यार्थी प्रवेशित आहेत. भूगोल अधिविभागाच्या मूळ इमारतीमध्ये त्यांचे वर्ग आणि
प्रयोगशाळा यासाठी जागेची कमतरता भासत असल्यामुळे नव्या विस्तार इमारतीची उभारणी
करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये वर्गखोल्यांबरोबरच थ्री-डी व्हिज्युअलायझेशन,
ड्रोन टेक्नॉलॉजी यांसह जिओइन्फॉर्मेटिक्सशी निगडित प्रयोगशाळाही असणार आहेत. येथे
विविध क्षेत्रांतील शासकीय अधिकाऱ्यांसाठी आवश्यकतेनुसार व मागणीनुसार प्रशिक्षण
कार्यक्रम राबविण्याचाही विद्यापीठाचा मानस आहे.
यावेळी कुलसचिव डॉ.
विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व
लेखाधिकारी डॉ. सुहासिनी जाधव, डॉ. गिरीष कुलकर्णी, उपकुलसचिव रणजीत यादव, भूगोल
अधिविभाग प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. संभाजी शिंदे, डॉ. धनश्री शिंदे, डॉ. मीना
पोतदार, डॉ. विद्या चौगुले, डॉ. प्रशांत पाटील, विद्युत अभियंता अमित कांबळे, विजय
पोवार, शिवकुमार ध्याडे, वैभव आरडेकर, जी.बी. मस्ती यांच्यासह भूगोल अधिविभागातील
शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी
उपस्थित होते.


No comments:
Post a Comment