कोल्हापूर, दि. २० ऑगस्ट: ‘होळकरशाहीतील कोरीव लेख’ हा ग्रंथ म्हणजे बहुविद्याशाखीय अभ्यास व संशोधनाचे आदर्श उदाहरण आहे, असे
कौतुकोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी
होळकर अध्यासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती
महोत्सव वर्षानिमित्त अध्यासन ग्रंथमालेतील तिसरे पुष्प ‘होळकरशाहीतील कोरीव लेख’ या डॉ. नीलेश केदारी
शेळके लिखित ग्रंथाचे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ.
प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले,
डॉ. शेळके यांनी या ग्रंथासाठी मोठी भ्रमंती केल्याचे लक्षात येते. आधी शिलालेख
आणि ताम्रपटांची माहिती मिळविणे, त्यानुसार ठिकठिकाणी प्रवास करून संबंधित दुर्मिळ लेखांचा
शोध घेऊन त्याची पाहणी करणे, त्याचे अध्ययन, संशोधन करून योग्य अन्वयार्थ लावणे
आणि त्यानंतर त्याचा संकलनात समावेश करणे हे मराठीसह मोडी, हिंदी, इतिहास,
पुराभिलेख इत्यादी विषयांमधील मौलिक कार्य आहे. खऱ्या अर्थाने ही राष्ट्रीय
शैक्षणिक धोरणाला अभिप्रेत भारतीय ज्ञानाची निर्मिती आणि प्रसार आहे. या ग्रंथात
काशी येथील मल्हारराव होळकर, खंडेराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकर या तिघांच्याही नावाचा
समावेश असलेला शिलालेख आहे, त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिराच्या
पूर्व दरवाजावरही होळकरांचा शिलालेख आहे. काशी व दक्षिण काशी येथील या दोन्ही
शिलालेखांच्या प्रतिकृती तयार करून माहितीसह विद्यापीठाच्या संग्रहालयामध्ये
प्रदर्शित करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे अध्यासनाने भारतीय ज्ञान व्यवस्थेच्या
अनुषंगाने अधिक संशोधन करण्यासाठी प्रकल्प प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन त्यांनी
केले.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद
पाटील म्हणाले, डॉ. शेळके यांनी सदर ग्रंथनिर्मितीसाठी घेतलेले परिश्रम पानोपानी
जाणवतात. त्यांनी अस्तंगत होत चाललेल्या शिलालेखांचा अभ्यास करून त्यांचे
दस्तावेजीकरण करण्याचे मोठे काम केले असून खऱ्या अर्थाने दगडांना बोलके केले आहे.
मराठी अधिविभागाचे
प्रमुख डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, डॉ. शेळके यांनी अपारंपरिक संशोधनाची वाट चोखाळली
आहे. मंदिरे, विविध ऐतिहासिक वास्तू येथील लेखांकडे पर्यटनापेक्षा अभ्यास व संशोधन
म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांतील मानवी संस्कृती विकसनाच्या
खाणाखुणांचा अभ्यास करीत असताना होळकर कालखंडाचे भौगोलिक व सांस्कृतिक मापन
त्यांनी केले आहे. तत्कालीन मानवाचे कल्पविश्व सामोरे आणले आहे.
‘मातोश्री’ अहिल्यादेवी होळकर
इतिहास अधिविभाग प्रमुख
डॉ. अवनीश पाटील म्हणाले, कोरीव लेखांतून होळकर घराण्याने केलेल्या कार्याची
कल्पना येतेच, शिवाय, त्यांचा अन्वयार्थ, दस्तावेजीकरण यामधून त्या इतिहासाला ठोस
पाठबळ लाभते. अहिल्यादेवी होळकर यांना त्या काळात ‘मातोश्री’ हे संबोधन वापरले जात असे, हा एक नवा
संदर्भही सामोरा आणण्याचे काम या संशोधनाद्वारे डॉ. शेळके यांनी केले आहे.
यावेळी अध्यासनाचे
समन्वयक डॉ. मच्छिंद्र गोफणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. लेखक डॉ. शेळके
यांनी मनोगत व्यक्त केले. दत्ता घुटूगडे यांनी आभार मानले. यावेळी बबन रानगे
यांच्यासह डॉ. नीलांबरी जगताप, वैभव जानकर, अमर माने आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment