Tuesday, 14 April 2020

शिवाजी विद्यापीठात आंबेडकर जयंती साजरी

शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन. 



कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजी विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णतः पालन करीत जयंती साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत आदी उपस्थित होते.

Friday, 10 April 2020

कोरोनाच्या साथीला मात देण्यासाठी ‘एनएसएस’ची फौज प्रशासनाच्या साथीला! : कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे




कोल्हापूर, दि. १० एप्रिल: कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या साथीला रोखण्यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेतील सुमारे २८ हजार स्वयंसेवक नागरिकांच्या सेवेसाठी आणि प्रशासनाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतीसाठी तत्पर आहेत. ही कामे करीत असताना त्यांनी नागरिकांबरोबरच स्वतःच्या आरोग्याचीही दक्षता घ्यावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले आहे.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी म्हटले आहे की, मानवनिर्मिती अगर नैसर्गिक संकटाच्या काळात शिवाजी विद्यापीठ पूर्ण क्षमतेने पुढाकार घेऊन त्या संकटावर मात करण्यासाठी  सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून काम करीत असते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहांत १००० बेडचे आयसोलेशन केंद्र तात्पुरत्या स्वरूपात सुरू केले जात आहे.
सध्याच्या संकट काळात शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या स्वयंसेवक व स्वयंसेविकांवर कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी होण्याची मोठी जबाबदारी आली आहे. या युद्धात विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक पूर्ण तयारीनिशी उतरले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य प्रभावीपणे करत आहेत, याचा आपल्याला अभिमान असल्याचेही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी नमूद केले आहे.
एन.एस.एस.चे सुमारे २८,००० स्वयंसेवक फेसबुक, व्हॉट्सअप यांसह इतर सोशल मीडियाचा वापर करत ५० लाखांहून अधिक लोकांपर्यँत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पद्धतीने पोहोचत आहेत. अगदी नागरिकांच्या कौटुंबिक अडीअडचणींची माहिती घेऊन अनेक वेळा स्वतः तर काही वेळा प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना तत्परतेने मदत करत आहेत. गरजू, फिरस्ते, गावोगावचे असहाय ज्येष्ठ नागरिक, अनाथ, दिव्यांग इत्यादी लोकांच्या मदतीला जात आहेत. लोकांना सॅनिटायझर्स, मास्क यांचे वितरण, किराणा, भाजीपाला, औषधे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आदी महत्वाची कामे NSS चे स्वयंसेवक करत आहेत. 
सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांत प्रशासनाच्या मदतीसाठी हेल्पलाईनमध्ये काम करण्यासाठी  इच्छुक स्वयंसेवकांची पालकांच्या परवानगीने नोंदणी सुरू आहे. यासाठी स्वतंत्र गुगल रजिस्ट्रेशन फॉर्म तयार केला आहे. त्याद्वारे स्वयंसेवकांनी नोंदणी करावी आणि या राष्ट्रीय आपत्तीच्या क्षणी आपला मोलाचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन कुलगुरूंनी केले आहे.
मात्र, त्याचवेळी कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रादुर्भावामुळे आपण सारेच त्रस्त आहोत. सद्यस्थिती पाहता लॉकडाऊनच्या कालावधीत सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांची व बळींची संख्या वाढतीच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य व जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले सोशल डिस्टन्सिंगसह मास्क वापरणे, साबणाने हात धुणे आदी दक्षता आपण व्यक्तीगत व कौटुंबिक स्तरावर घेणे अत्यावश्यक आहे. त्या आपण आवर्जून घ्याव्यात. स्वतःच्या आरोग्यविषयक दक्षता जबाबदारपूर्वक घेण्याचे भानही बाळगावे, असे आवाहनही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले आहे.

Tuesday, 7 April 2020

विद्यापीठात सायबर सिक्युरिटीबाबत

१० एप्रिलला ऑनलाईन कार्यशाळा




कोल्हापूर, दि. ७ एप्रिल: सध्या कोरोना विषाणू साथीवर प्रतिबंधक उपाय म्हणून पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे डिजीटल साधनांच्या द्वारे आर्थिक तसेच संवाद व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे सायबर व फिशिंग अॅटॅक होण्याचे प्रमाणही वाढले आहे. हे लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने येत्या शुक्रवारी (१० एप्रिल) सायबर सिक्युरिटीविषयक एकदिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या कार्यशाळेची ऑनलाइन नोंदणी सुरू होताच पहिल्या तासाभरातच देशभरातून सुमारे ८७ इतकी विक्रमी नावनोंदणी झाली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या सायबर सिक्युरिटी व डाटा सायन्सेस फॅकल्टी डेव्हलपमेंट केंद्राचे संचालक डॉ. आर.के. कामत यांनी दिली आहे.
डॉ. आर.के. कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोना तथा कोविड-१९ या विषाणूचा उद्रेक झाल्याने अन्य देशांप्रमाणेच भारतामध्येही गंभीर स्थिती लक्षात घेता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घरात बसून या विषाणूचा प्रतिकार करावा लागत आहे. जवळपास सर्वच आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला दिला आहे. त्यामुळे बहुतेक जणांना डिजीटल साधनांचा आधार घेऊनच काम करावे लागत आहे. त्याचप्रमाणे मोबाईल रिचार्जपासून ते विविध बिल पेमेंटपर्यंत जवळपास सर्वच आर्थिक व्यवहार ऑनलाईन करावे लागत आहेत. या व्यवहारांत जशी वाढ झाली, त्याच प्रमाणात सायबर व फिशिंग हल्ल्यांमध्येही वाढ झाल्याची प्रकरणे सामोरी येत आहेत. त्यामुळे या संदर्भात जनजागृती व योग्य सुरक्षाविषयक दक्षता कशी घ्यावी, याची विस्तृत माहिती देण्याकरिता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पंडित मदनमोहन मालवीय शिक्षक व शिक्षणविषयक राष्ट्रीय अभियानांतर्गत शिवाजी विद्यापीठात कार्यरत असलेल्या सायबर सिक्युरिटी व डाटा सायन्सेस फॅकल्टी डेव्हलपमेंट केंद्राच्या वतीने येत्या १० एप्रिल २०२० रोजी सायबर सिक्युरिटीविषयक एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी सुरू होताच सुमारे ८७ जणांनी नोंदणी केली. ‘नॅसकॉम’ मान्यताप्राप्त स्कील्स फॅक्टरी लर्निंग प्रा. लि. आणि टाटा कम्युनिकेशन्स यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेत इन्ट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी, सायबर अॅटॅक्स क्लासिफिकेशन आणि स्मार्टफोन अँड पेमेंट सिक्युरिटी या विषयांवर ख्यातनाम तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेबाबत अधिक माहितीसाठी http://sangnaksuraksha.com/ या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. कामत यांनी केले आहे.


Sunday, 5 April 2020

‘कोरोना’विषयक मानसिक समस्या निवारणासाठी

शिवाजी विद्यापीठाची विशेष समुपदेशन हेल्पलाईन



कोल्हापूर, दि. ५ एप्रिल: कोरोना विषाणूच्या साथीच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये विविध प्रकारच्या मानसिक स्वास्थ्याशी निगडित समस्या उद्भवत असल्याची बाब लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने संबंधित नागरिकांसाठी विशेष हेल्पलाईन निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेने आणि सहकार्याने सदर समुपदेशन हेल्पलाईन लवकरच कार्यान्वित करण्यात येत आहे. गरज भासल्यास प्रत्यक्ष समुपदेशनही करण्यात येणार आहे. ही माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली आहे.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूची साथ आणि त्या अनुषंगाने देशात उद्भवलेली अभूतपूर्व परिस्थिती यामुळे नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून मानसिक व्याधीची सुरवात या कालावधीमध्ये होऊ शकते. त्याचा परिणाम शारीरिक स्वास्थ्यावरही होण्याची शक्यता असते. तथापि, अशा परिस्थितीत जर प्राथमिक टप्प्यावरच योग्य व शास्त्रशुद्ध समुपदेशन मिळाले, तर व्यक्तीची सकारात्मकता वाढून त्याचा मानसिक आजारापासून बचाव करता येऊ शकेल. ही बाब लक्षात घेऊन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या एम.एस.डब्ल्यू. अधिविभागाचे प्रा. अमोल मिणचेकर  समन्वयाने नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्याकरिता फोन-इन समुपदेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे आदेश, समुपदेशनाची व्यावसायिक मूल्ये आणि प्रतिबंधात्मक दक्षता घेऊन सदर समुपदेशन करण्यात येणार आहे. सदर उपक्रमात सहभागी शिक्षक, विद्यार्थी हे जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेने गरज भासल्यास प्रत्यक्ष समुपदेशनासाठीही जातील.
सदर समुपदेशनासाठी आवश्यक अशी कार्यप्रणाली आणि मार्गदर्शक तत्त्वांचीही निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार, विद्यापीठात एमएसडब्ल्यू शिकविणारे शिक्षक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी अशी एकूण ३० जणांची टीम हेल्पलाईनद्वारे संचारबंदी कालावधीत योग्य ती दक्षता घेऊन समुपदेशन उपक्रम राबवेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सदर विद्यार्थ्यांना ओळखपत्रे दिली जातील. सदर हेल्पलाईन सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत कार्यान्वित राहील. या सर्व प्रणालीची माहिती हेल्पलाईन क्रमांकांसह विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून व समाजमाध्यमांतून उपलब्ध केली जाईल.

नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन आवश्यक: कुलगुरू डॉ. शिंदे

कोरोना विषाणूच्या साथीमुळे आणि त्या अनुषंगाने उद्भवलेल्या भीषण परिस्थितीमुळे नागरिक मोठ्या दडपणाखाली तसेच भीती, असहायता आणि निराशेच्या भावनेने ग्रस्त झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत संवाद हा अतिशय महत्त्वाचा उपाय आणि उपचार आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने आपल्या एमएसडब्ल्यू अधिविभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी उद्भवलेल्या महापूर स्थितीमध्ये सुद्धा अनेक नागरिक अशा प्रकारे नैराश्यग्रस्त झाले होते. त्यावेळीही विद्यापीठाच्या एमएसडब्ल्यू विभागाच्या शिक्षक, विद्यार्थ्यांना संबंधित नागरिकांचे समुपदेशन करून त्यांचे मानसिक पुनर्वसन करण्यात मोलाची कामगिरी यशस्वीपणे बजावली होती. यावेळीही विद्यापीठ त्याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हेल्पलाईन सुरू करीत आहे. त्याचा नागरिकांना निश्चितपणे लाभ होईल, अशी खात्री आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या कोरोनाविषयक समुपदेशनासाठी नियुक्त समुपदेशकांची नावे व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे:-

१.      प्रा. अमोल मिणचेकर  (समन्वयक) – 9822567720
२.      विनोद ठिकणे – 9552127209
३.      मोहिनी देवकर – 9145609647
४.      सागर अवलक्की – 8600736147
५.      भैय्यासाहेब नलवडे – 9970965570
६.      स्नेहल जगदाळे – 7875137503
७.      नागेश पवार – 8788323500
८.      रागिणी बालुगडे – 7420979975
९.      पृथ्वीराज शेटे – 8830829301
१०.  सिद्धांत घोरपडे – 8830982805
११.  रेणुका देशमुख – 9421690358
१२.  सुशील कांबळे – 9168181595
१३.  शुभांगी मदने – 7066082819
१४.  ऋतुजा चौत्रे – 7798146776
१५.  गणेश भाड – 9552010520
१६.  सौरव वाघमारे – 9764891097
१७.  अक्षय बुगडे – 9158505182
१८.  दिनेश माळी – 9637096912
१९.  अमित सोनवणे – 9518553826
२०.  प्रियांका बनसोडे – 9970864960
२१.  आप्पासाहेब पाटील - 7219185983
२२.  वंदना चव्हाण – 7083644644
२३.  रागिणी शेट्ये – 8830169662
२४.  जयदीप गुरव – 7522978707
२५.  शिवाली दामुगडे – 9823491722
२६.  अमोल मस्के - 8530585952

Monday, 23 March 2020

शिवाजी विद्यापीठात शहीदांना अभिवादन



कोल्हापूर, दि. २३ मार्च: शिवाजी विद्यापीठात आज शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव उपस्थित होते.

Saturday, 21 March 2020

विद्यापीठाच्या ऑनलाइन सुविधांमुळे

विद्यार्थ्यांना घरी राहूनही अभ्यास करणे शक्य




कोल्हापूर, दि. २३ मार्च: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थी, शिक्षक यांना ३१ मार्चपर्यंत वर्गामध्ये एकत्र येऊन अध्यापन प्रक्रिया थांबविण्याची सूचना केली आहे. तथापि, विद्यापीठाच्या ऑनलाईन सेवा-सुविधांमुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या अध्ययन प्रक्रिया सुरू ठेवणे शक्य झाले आहे.
शिवाजी विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत ऑनलाईन अभ्यासक्रम निर्मितीसह MOOC, MOODLE आदी ऑनलाईन उपलब्ध व्यासपीठांचा ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरवात केली. वर्गामधील नियमित अध्यापनाला ऑनलाईन अध्ययनाची जोड लाभल्याने विद्यार्थ्यांना विषय समजावून घेणे आणि त्याचा सुनियोजितरित्या अभ्यास करणे शक्य झाले आहे. सद्यस्थितीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणांसह गर्दीची ठिकाणे टाळणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने शासन आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत वर्गातील अध्यापन बंद केले आहे. अशा वेळी ऑनलाइन व्यासपीठांवरील अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सज्ज असल्याचे दिसून आले आहे. अनेक विद्यार्थी या सुविधांचा लाभ घेऊन आपल्या अभ्यासात खंड न पडू देण्याची दक्षता घेत आहेत.

MOOC, MOODLE चा वापर करण्याचे कुलगुरूंचे आवाहन
या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी असे म्हटले आहे की, शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षकांना सध्याच्या ‘वर्क फ्रॉम होम’चे आवाहन करीत असताना विद्यापीठ प्रशासनाने मूक (मासिव्ह ऑनलाइन ओपन कोर्स) आणि मूडल (मॉड्युलर ऑब्जेक्ट ओरिएंटेड डायनॅमिक लर्निंग एन्व्हायर्नमेंट) या दोन ई-लर्निंग व्यासपीठांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार ऑनलाइन मार्गदर्शन करावे, त्यासाठी आवश्यक ते प्रेझेंटेशन, नोट्स वगैरे सामग्रीची निर्मिती करावी, असे आवाहन केले आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत थेट अध्यापन करता येत नसले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची खबरदारी म्हणून ऑनलाइन व्यासपीठांचा मुबलक वापर करावा, अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या. त्यानुसार, बहुतेक शिक्षकांनी मूक, मुडलच्या आधारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापनास प्रारंभही केला, ही समाधानाची बाब आहे. तथापि, अद्यापही जे विद्यार्थी ऑनलाइन व्यासपीठांचा वापर करीत नसतील, त्यांनी सुद्धा मूक, मुडल या व्यासपीठांचा पुरेपूर वापर करून आपले शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले आहे.
या संदर्भ साहित्याबरोबरच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेल्या ‘स्वयम’ (SWAYAM) या उपक्रमाच्या लिंकही विद्यापीठाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, जेणे करून त्यांना अभ्यासाचे लिखित तसेच ऑडिओ-व्हिज्युअल्सही उपलब्ध व्हावेत. स्वयम उपक्रमाच्या https://swayam.gov.in/ या मुख्य लिंकसह ‘स्वयंप्रभा’ https://www.swayamprabha.gov.in/ या ३२ डीटीएच वाहिन्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्याखेरीज इन्फ्लिबनेटचे ‘मूक’ (http://ugcmoocs.inflibnet.ac.in/) आणि ई-पीजी पाठशाला
(http://epgp.inflibnet.ac.in/) हे अभ्यासविषयक साहित्यही एक्सेस करण्याची सुविधा विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. त्यांचा लाभ घेण्याचे आवाहनही कुलगुरूंनी केले आहे.
या प्रक्रियेमध्ये विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राने अन्य ऑनलाइन संदर्भ साहित्यही उपलब्ध केले आहे. या केंद्राच्या http://www.unishivaji.ac.in/library/ या संकेतस्थळाच्या माध्यमातून विद्यार्थी-शिक्षकांसाठी अनेक अध्ययन-अध्यापनविषयक ऑनलाइन सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ज्ञानस्रोत केंद्राने ई-बुक्स, ई-डाटाबेस आणि ई-जर्नल्स आदींचे अनेक ऑनलाईन स्रोत विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध केले आहेत. http://www.unishivaji.ac.in/library/E-Books या लिंकद्वारे सायन्स डायरेक्ट, स्प्रिंजर, केंब्रिज आदी नामांकित प्रकाशकांचे ५७८ ई-बुक्स पूर्ण टेक्स्ट स्वरुपात वाचता येतात. http://www.unishivaji.ac.in/library/E-Journals या लिंकद्वारे विविध नामांकित प्रकाशकांचे ४४ ई-जर्नल्स अभ्यासता येतात. त्याचप्रमाणे http://www.unishivaji.ac.in/library/E-Databases या लिंकवर संशोधनासाठी अत्यावश्यक अशा सायफाइंडर, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, स्कोपस, जे-गेट ससोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज, जे-गेट सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, इबिस्को डिस्कव्हरी सर्व्हिस आदी १८ ई-डाटाबेसचा अभ्यास करता येतो. याशिवाय INFED (इन्फ्लिबनेट एक्सेस मॅनेजमेंट फेडरेशन) अंतर्गत सहा नामांकित प्रकाशकांचे डाटाबेस विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा ज्ञानस्रोत केंद्राने http://www.unishivaji.ac.in/library/Resource-Centre-for-Inclusive-Education-(RCIE) या  लिंकद्वारे दूरशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे.