Monday, 17 January 2022

ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे

कृतीशील, खंदे प्रबोधक नेतृत्व हरपले: कुलगुरू डॉ. शिर्के

 



सन २०१९मध्ये शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन.डी. पाटील यांना प्रदान करताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार. व्यासपीठावर तत्कालीन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, सौ. सरोज (माई) पाटील, प्राचार्य बी.ए. खोत आदी.

सन २००६मध्ये शिवाजी विद्यापीठाची सर्वोच्च मानद डी.लिट. पदवी डॉ. एन.डी. पाटील यांना प्रदान करताना तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे. सोबत (डावीकडून) तत्कालीन परीक्षा संचालक एन.व्ही. ठक्कर, दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे तथा युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे 'पद्मविभूषण' प्रा. एम.एम. शर्मा आणि कुलसचिव डॉ. एस.एन. देसाई.

ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील यांनी सन २०१९मध्ये शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य कणबरकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेले अत्यंत महत्त्वाचे भाषण. (ध्वनीचित्रफीत)

ज्येष्ठ नेते श्री. शरद पवार यांनी डॉ. एन.डी. पाटील यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना. (ध्वनीचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १७ जानेवारी: ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक अत्यंत विवेकनिष्ठ, निस्पृह विचारवंत आणि सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कणखर कृतीशीलतेने तळपणारे खंदे प्रबोधक नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या रुपाने शिवाजी विद्यापीठाचा एक महान मार्गदर्शक व हितचिंतक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शोकभावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केल्या आहेत.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पुरोगामी व्यक्तीमत्त्व घडविणाऱ्या महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाने आणि विचारांनी प्रभावित झालेल्या डॉ. एन.डी. पाटील यांनी विद्यार्थी दशेपासूनच त्या आदर्शाबरहुकूम वाटचाल केली आणि अखेरच्या श्वासापर्यंत अव्याहतपणे जपली. एन.डी. पाटील यांचे जीवन म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवी हक्क आणि राष्ट्रीय भावना या मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी निर्माण झालेली संग्रामगाथाच आहे. 

शिवाजी विद्यापीठाशीही एन.डी. पाटील सरांचे स्थापनेपूर्वीपासूनचे दृढ नाते राहिले. विद्यापीठाच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र शासनाने १९६२ मध्ये नियुक्त केलेल्या पहिल्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. १९६५ मध्ये विद्यापीठाच्या अधिसभेवर ते निवडून आले होते. विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे ते अधिष्ठाता होते. १९६५ ते १९७८ अशी तब्बल तेरा वर्षे ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचेही सदस्य होते. विविध अधिकार मंडळांच्या माध्यमातून आपली शिक्षणविषयक भूमिका वेळोवेळी प्रकट करीत शिवाजी विद्यापीठाला त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असे शैक्षणिक व समाजाभिमुख स्वरुप प्राप्त करून देण्यात मोलाचा वाटा उचलला. विद्यापीठात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. शिवाजी विद्यापीठाने सन २००६मध्ये सर्वोच्च डी.लिट. पदवी प्रदान करून त्यांच्या या योगदानाचा गौरव केला. तसेच २०१९ साली प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार देऊनही त्यांना गौरविले. त्यांचे अखेरपर्यंत विद्यापीठाशी स्नेहाचे नाते राहिले. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठ परिवार एका महान मार्गदर्शक व हितचिंतकास मुकला आहे, असेही कुलगुरूंनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Wednesday, 12 January 2022

सामाजिक वंचितता अभ्यास केंद्रास युजीसीकडून दोन कोटींचा निधी प्राप्त

 



कोल्हापूर, दि. १२ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्रास विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) यांच्याकडून २,०१,७२,४५९ रुपये (दोन कोटी एक लाख बहात्तर हजार चारशे एकोणसाठ रूपये) इतका निधी प्राप्त झाला आहे. तसे पत्र नुकतेच विद्यापीठास प्राप्त झाले आहे.

भारतामध्ये सामाजिक वंचितता व समावेशन याबाबतचा अभ्यास सुरू व्हावा या दृष्टीने अकराव्या व बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये याबाबत आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार मनुष्यबळ विकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली व विद्यापीठ अनुदान आयोग यांनी देशभरामध्ये सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्रांची (Center for Study of Social Exclusion and Inclusive Policy) निर्मिती केली आहे. संपूर्ण भारतात पहिल्या टप्प्यात एकूण १३ अभ्यास केंद्राना विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजूरी दिली होती. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठातील केंद्राचा समावेश आहे. महाराष्ट्रात विद्यापीठीय स्तरावर कार्यरत असलेले ते एकमेव अभ्यास केंद्र आहे.

अभ्यास केंद्राने स्थापनेपासून आजपर्यंत समाजातील वंचित, दलित आदिवासी, भटक्या-विमुक्त जमाती, मुस्लिम, ख्रिश्चन, स्त्रिया, देवदासी, वाघ्या-मुरळी, अपंग शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अल्पसंख्याक, अंधश्रध्दा निर्मूलन इत्यादी महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर शैक्षणिक, संशोधनपर उपक्रम राबविले आहेत. त्याचबरोबरच सामाजिक वंचितता व समावेशक धोरण विषयात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही सुरू केला आहे. या अभ्यास केंद्रासाठीचा सन २०१२पासूनचा निधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रलंबित होता. त्यानुसार सन २०१२-१३ ते सन २०१८-१९ कालावधीसाठीचा संपूर्ण निधी युजीसीकडून प्रदान करण्यात येत असल्याचे पत्र विद्यापीठ प्रशासनास प्राप्त झाले आहे.

केंद्राचे संचालक डॉ. जगन कराडे यांनी अभ्यास केंद्राचा प्रलंबित निधी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला. सदर निधीमुळे अभ्यास केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांस आणि वंचित घटकांच्या संदर्भातील संशोधन कार्यास गती मिळेल, असा विश्वास डॉ. कराडे यांनी व्यक्त केला.


राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना

शिवाजी विद्यापीठात अभिवादन

 



कोल्हापूर, दि. १२ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात आज राजमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज सकाळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी अभिवादन कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेऊन आदरांजली वाहिली. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, रसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. जी.एस. गोकावी, आयक्यूएसीचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. जी.एस. कुलकर्णी यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. कोविड-१९विषयक नियमावलीचे पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Tuesday, 11 January 2022

राष्ट्रीय युवा दिन विशेष लेख-२:

तरुणांसाठी स्वामी विवेकानंद...


 

(बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि त्या निमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने विशेष लेख...)

आम्हा मुलांना मोबाईल म्हणजे जीव की प्राण आहे. ती आता काळाची गरजही बनली आहे. पण याच मोबाईलने आमची एकाग्रता एवढी बोथट बनवली आहे की पुस्तकाचं एक पान वाचतानाही जीवावर येते. मोबाइलला बनवलंच असं आहे की, तो सतत मन विचलित करत राहतो. पण जेव्हा विवेकानंदांकडे पाहतो तेव्हा समजते, ते तर दिवसात मोठमोठाले खंड वाचून संपवत असत. यासाठी एकाग्र मन, ब्रह्मचर्याचे पालन आणि वर्षानुवर्षांची साधना किंवा प्रयत्न कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या तीन गोष्टी विद्यार्थी वयात सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. 

ज्ञानेश्वरीत म्हटलंय, "म्हणोन जाणतेन गुरू भजिजे| तेणे कृतकार्य होईजे।" ज्याला जाणण्याची इच्छा आहे, त्याला गुरुच्या सोबतीने कार्यात यशस्वी होता येते. विवेकानंदही तरुण असतानाच त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी गुरूच्या शोधात निघाले होते. रामकृष्ण परमहंस यांच्या रूपाने ते भेटले देखील. पण आजच्या युवकांना मुळातच प्रश्न पडतात का? आज-काल बरेचसे ध्येयहीन युवक निरर्थक गोष्टींमध्ये अडकून पडल्याचे दिसते. गुरूंची भेट देखील ऑनलाइन झाली आहे. या ऑनलाईन सहवासातून मुलांच्या कितपत प्रश्नांची उत्तरे मिळतात

हरिदास देसाई यांना १८९२ला  लिहिलेल्या पत्रातून विवेकानंदांनी म्हटलं आहे की, "सिद्धांतांवर विश्वास ठेवू नका कारण ते तुम्हाला पिढ्यानपिढ्या सुपूर्द केले गेले आहेत; कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका कारण ते अनेक लोक आंधळेपणे पाळतात; काही वृद्ध ऋषी विधान करतात म्हणून विश्वास ठेवू नका; तुमच्याकडे असलेल्या सत्यांवर विश्वास ठेवू नका. सवयीने संलग्न व्हा; केवळ तुमच्या शिक्षकांच्या आणि वडीलधाऱ्यांच्या अधिकारावर विश्वास ठेवू नका. विचारपूर्वक विश्लेषण करा आणि जेव्हा निकाल तर्काशी सहमत असेल आणि सर्वांच्या भल्यासाठी अनुकूल असेल तेव्हा ते स्वीकारा आणि त्याप्रमाणे जगा." (खंड ४, व्याख्याने आणि प्रवचने, द क्लेम्स ऑफ रिलिजन) यातून विवेकानंदांचा विज्ञानवादी आणि तर्कवादी दृष्टिकोन आपल्याला समजतो. हल्ली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ज्ञानवंत होत असलेल्या युवकांनी याचा विचार करणे गरजेचे आहे. विविध राजकीय आणि धार्मिक विखारी प्रचाराला तो बळी पडतो आहे. यातूनच १८-२१ वर्षांची मुले कट्टरपंथाकडे वळत असल्याचे बुली ॲपसारख्या घटनांमधून समोर येते आहे. 

स्वामी विवेकानंदांनी आदर्श युवक कसा असावा, याबद्दल सांगितले आहे. आजच्या युवकांनी विवेकानंदांकडून प्रेरणा घेऊन त्यांना अभिप्रेत आदर्श युवक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

-    प्रथमेश पाटील

(लेखक शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन अधिविभागाचे विद्यार्थी आहेत.)


राष्ट्रीय युवा दिन विशेष लेख-१:

युवकांचे प्रेरणास्थान: स्वामी विवेकानंद



(बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि त्या निमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने विशेष लेख...)

आपण जागतिक इतिहासाची पाने उलगडून पाहिली तर आपल्याला हे स्पष्टपणे जाणवेल की युवक हेच इतिहासाच्या केंद्रस्थानी आहेत. इतिहासातील लढाया, योद्ध्यांचे पराक्रम, संघर्ष, स्वातंत्र्यपूर्व काळात झालेले उठाव या सर्वांमध्ये युवकांची भूमिका अग्रेसर आहे. मग युवकच का इतिहास घडवू शकतात? युवकांना असे कोणते स्वातंत्र्य आहे? युवकांकडे अशी कोणती शक्ती आहे? असे प्रश्न जेव्हा एखाद्या व्यक्तीला पडतात, तेव्हा त्यांना  स्वामी विवेकानंद यांच्यायुवक कसा असावा?यातील प्रत्येक शब्दामधून या प्रश्नांची उत्तरे मिळतात. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारी हा दिवसराष्ट्रीय युवा दिनम्हणून  साजरा केला जातो. हा दिवस भारतातील अशा युवकांसाठी आहे, जे युवक देशाला समृद्ध आणि प्रगतशील बनवण्यासाठी प्रयत्नशील असतात. राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंदांच्या अनमोल विचारातून आजच्या युवकांनी कोणती मूल्ये आत्मसात केली पाहिजेत, हे जाणून घेऊ या.

नरेंद्र ते स्वामी विवेकानंद हा जीवनप्रवास निश्चितच संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी आहे. कलकत्ता येथे १२ जानेवारी १८६३ साली जन्मलेल्या नरेंद्रचे- शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी झालेल्या धर्म परिषदेमधीलअमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो...या उद्गारांसाठी - स्वामी विवेकानंद म्हणून झालेल्या प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटापर्यंतचे जीवन ही एक तपस्याच आहे. स्वामी विवेकानंद हे बुद्धिमान तर होतेच परंतु प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या पातळीवर कसून बघण्याची त्यांची सवय होती. बालपणी नरेंद्रच्या मनात असंख्य प्रश्नांचे वादळ उठलेले असायचे आणि हे वादळ तेव्हा शमले, जेव्हा त्यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली. गुरु आणि शिष्याच्या ज्ञानमय नात्याचा आणि स्वामी विवेकानंदांच्या आत्मसाक्षात्काराच्या प्रवासाला येथूनच सुरुवात झाली. स्वामी विवेकानंदांना हे माहित होते कि सभोवतालची परिस्थिती बदलायचे सामर्थ्य युवकांमध्येच आहे. म्हणूनच त्यांनी तरुणांना मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर  देशसेवा आणि धर्मजागृती अशा कार्यांमध्ये युवकांना सहभागी करून घेतले. समाजातील आजच्या युवकांची परिस्थिती पाहता त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आणि त्यांच्या जीवन चरित्राचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवणे गरजेचे आहे. 

मोबाईलच्या दुनियेत अडकलेला आजचा युवक, ज्याला सोशल मिडिया आणि त्यातून मिळणारी प्रसिद्धी, झगमगाटी जीवनशैली या पलीकडचे जीवन  दिसत नाही. आजच्या युवकांकडे बौद्धिक क्षमता प्रचंड आहे; पण त्या क्षमतेला योग्य दिशा देताना युवक दिसत नाहीत. त्यांच्या सभोवताली निर्माण झालेले कृत्रिम जग हेच त्यांच्या जीवनाचे अस्तित्व आहे, अशी धारणा आजच्या युवकांची बनली आहे. आजच्या युवकांना समाजात घडणाऱ्या भीषण घटना आणि स्वामी विवेकानंदांच्या  मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करायला हवा, म्हणूनच युवक दिनाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंदांचे काही विचार आत्मसात करू या.

        स्वामी विवेकानंद युवकांना म्हणतात, “उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका,म्हणजेच आजच्या काळाचा विचार करायला गेलो तर युवकांनी सर्वप्रथम ध्येय निश्चित केले पाहिजे. ते ध्येय स्थिर असायला हवे, तरच युवक योग्य दिशेने प्रवास करू शकतील. ध्येयप्राप्तीच्या प्रवासामध्ये असंख्य बाधा येतील, म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात, ते पूर्ण होईपर्यंत थांबू नका. आजच्या मन भरकटवणाऱ्या जगात हा विचार सर्वात मौल्यवान आहे. कारण एक उचित ध्येयच त्या व्यक्तीला महान बनवू शकते.

        आजच्या युवकाला एकाच वेळी सर्व गोष्टी करायच्या आहेत. आजच त्याला यशस्वी व्हायचे आहे. त्याला एकाचवेळी क्रिकेटर बनायचे आहे, अभिनेता बनायचे आहे, अधिकारी बनायचे आहे आणि असे बरेच काही करायचे आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याला करायच्या आहेत पण होत तर काहीच नाहीत, अशी परिस्थिती आहे. यासाठी स्वामी विवेकानंद म्हणतात,एका वेळी एक गोष्ट करा आणि ती करत असताना इतर गोष्टी वगळून आपले सर्व अस्तित्त्व त्या गोष्टीत ओतून द्या,असे केले तरच आपण यशस्वी होऊ शकतो. 

        स्वामी विवेकानंद म्हणतात, "प्रत्येक काम या टप्प्यांतून जावे लागते- उपहास, विरोध आणि नंतर स्विकृती. जे लोक आपल्या वेळेच्या पुढचा विचार करतात त्यांच्याबद्दल असा गैरसमज होणे निश्चित आहे." जेव्हा आजच्या घडीला आपण एखादे नवीन कार्य, नवीन ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करू लागतो, त्यावेळी समाजातील काही लोकांकडून आपली चेष्टा केली जाते, तर काही लोक आपल्या ध्येयाला आणि नियोजित कार्यालाच विरोध करू लागतात. त्या क्षणी खचून न जाता आपले ध्येय आणि कार्यात खंड पडू न देता ते करत राहणे हाच एक मार्ग आहे. कारण ज्यावेळी या ध्येयाची प्राप्ती होईल त्यावेळी हा समाज त्याचा स्वीकार केल्याखेरीज राहात नाही.

        आजकालची सर्वात महत्त्वाची समस्या जी आजच्या युवकांमध्ये निदर्शनास आली आहे, ती म्हणजे युवकांमध्ये असणारा आत्मविश्वासाचा अभाव. आजचे युवक इतरांपेक्षा स्वतःला कमी लेखतात. स्वतःची इतरांशी तुलना करतात. त्याचबरोबर  प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याच्या मान्यतेची वाट पाहतात. यासंदर्भात स्वामी विवेकानंद म्हणतात, "तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजाल तर तुम्ही  दुर्बल बनाल आणि तुम्ही स्वतःला सामर्थ्यवान समजाल, तर तुम्ही सामर्थ्यशाली बनाल." त्यामुळे आजच्या युवकांनी विचार करण्याची पद्धत बदलायला हवी, सकारात्मकतेने विचार करायला हवा. त्यासाठी ते म्हणतात, "स्वतंत्र होण्याचे धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत, तिथपर्यंत जाण्याचे धाडस करा आणि तुमच्या रोजच्या जगण्यातही ते आणण्याचे धाडस करा," या विचारामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळू शकते.

        आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक युवक व्यस्त आहे, त्यांना स्वतःसाठी वेळ नाही आणि तो स्वतःसाठी वेळ काढण्याचा प्रयत्नही करत नाहीत. स्वतःला मनोरंजनाच्या साधनांमध्ये गुंतवून ठेवण्यात युवक आनंद वाटून घेतो आहे; पण स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आजच्या युवकांना वेळ नाही. त्यासाठी स्वामी विवेकानंद म्हणतात "दिवसातून एकदा तरी स्वतःशी  बोला. अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल." म्हणून आजच्या युवकांनी स्वतःला वेळ देणे आणि स्वतःच्या समस्यांचे स्वतः निराकरण करणे आवश्यक आहे. विवेकानंद म्हणतात, "तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल आणि त्या कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे." त्याचबरोबर ते असेही म्हणतात, " एखाद्या दिवशी जेव्हा आपल्याला कोणतीही समस्या उद्भवत नाही, त्यावेळी आपण चुकीच्या मार्गावर जात आहोत याची खात्री असू द्या." ते युवकांना संदेश  देतात की, "तुम्ही जोखीम उचलण्याचे भय बाळगू नका. जर जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल आणि जर हरलात तर तुम्ही इतरांना मार्गदर्शन करू शकाल."

स्वामी विवेकानंदांचा एखादा जरी विचार स्वीकारून त्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करणारा युवक नक्कीच यशस्वी होऊ शकेल. समाजातील सध्याची परिस्थिती पाहता स्वामी विवेकानंदांसारख्या महान विचाराच्या युवकांची देशाला फार गरज आहे. चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे असे युवकच देशाचे भवितव्य उज्ज्वल आणि सुरक्षित करू शकतात. कारण बदल घडवण्याचे काम हे युवा पिढीच करू शकते.

-    पवन पाटील

(लेखक शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन अधिविभागाचे विद्यार्थी आहेत.)

कोविड लसीकरणाला विद्यापीठाचा प्रतिसाद; ९९ टक्क्यांहून अधिकांचे लसीकरण

 


शिवाजी विद्यापीठातर्फे जनहितार्थ प्रकाशित केलेल्या आवाहनाचे बॅनर्स


कोल्हापूर, दि. ११ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-१९विषयक लसीकरणाला शासनाने केलेल्या आवाहनानुसार जवळपास १०० टक्के सहभाग दर्शविला आहे. पहिला अगर दोन्ही डोस घेणाऱ्या शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या अनुक्रमे ९७ व ९९ टक्क्यांहून अधिक आहे. कोविड-१९ साथीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची माहिती मागविली. त्यातून ही समाधानकारक बाब समोर आल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी दिली.

डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र शासन यांनी कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना लसीकरण करून घेण्यासंदर्भात आवाहन केले. त्यानुसार शिवाजी विद्यापीठ प्रशासनानेही आपल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीकरण करवून घेण्याचे आवाहन केलेच, शिवाय कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रामध्ये वेळोवेळी लसीकरण शिबीरेही आयोजित केली. याचे चांगले परिणाम दिसून आले. सर्वांनीच या आवाहनाला प्रतिसाद देत लसीकरण करवून घेण्यास प्राधान्य दिले. विद्यापीठ प्रशासनाने लसीकरणासंदर्भातील माहिती सर्व अधिविभाग, अध्यासने, केंद्रे आणि प्रशासकीय विभागांकडून संकलित केली. या माहितीच्या विश्लेषणातून सदर बाब सामोरी आली.

विद्यापीठात कार्यरत २६० शिक्षकांपैकी २१६ जणांनी (८३.०७%) दोन्ही डोस घेतलेले आहेत, तर ३७ जणांनी (१४.२३%) पहिला डोस घेतला असून दुसऱ्या डोससाठी मुदतपूर्तीच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यापीठातील एकूण ५३४ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी ४६८ (८७.६४%) जणांनी दोन्ही डोस घेतले असून ६२ जण (११.६१%) पहिला डोस घेऊन दुसऱ्या डोससाठी मुदतपूर्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

एकही डोस न घेतलेल्या शिक्षकांची संख्या ७ तर, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या अवघी ४ आहे. यातील काही जण कोविड पॉझिटिव्ह होते, तर काहींनी वैद्यकीय कारणास्तव लस घेतलेली नाही. तथापि, वैद्यकीय सल्ल्यानंतर लसीकरणासंदर्भात निर्णय घेऊ, असे त्यांनी प्रशासनाला कळविले आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. शिंदे यांनी दिली.

...तरीही गाफील राहू नका, दक्षता घ्या: कुलगुरू डॉ. शिर्के

एक टक्क्याहून कमी असलेल्या या उर्वरित लोकांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार आपले लसीकरण करून घ्यावे. तसेच, ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांनीही सदर लाटेमध्ये गाफील न राहता मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर आदी दक्षता घेऊन स्वतःसह कुटुंबियांना व त्यायोगे समाजालाही सुरक्षित ठेवावे. अभ्यागतांनीही या दक्षतेच्या कालखंडात शक्यतो विद्यापीठ कार्यालयात प्रत्यक्ष येण्याचे टाळून ई-मेल, दूरध्वनी आदी साधनांच्या सहाय्याने विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी केले आहे.

Tuesday, 4 January 2022

गोविंदराव सासने यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरक: डॉ. जयसिंगराव पवार

 

'गोविंदराव सासने यांच्या आठवणी' या पुस्तिकेचे प्रकाशन करताना श्रीमंत शाहू महाराज. सोबत (डावीकडून) डॉ. अवनिश पाटील, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे आदी.


 

कोल्हापूर, दि. ४ जानेवारी: गोविंदराव सासने यांच्यासारख्या पुरोगामी समाजसुधारकाचे कार्य गोविंदराव सासने यांच्या आठवणी या पुस्तिकेच्या रूपाने आज पुढे येत आहे. सासने यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरक आहे, असे गौरवोद्गार डॉ. जयसिंगराव पवार यांनी काल (दि. ३) येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने महर्षी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित 'गोविंदराव सासने यांच्या आठवणी' या पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. पवार यांनी अशी चरित्रे अर्वाचीन सामाजिक इतिहासाचे साधन म्हणून महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले. तसेच इतिहास संशोधन आणि ऐतिहासिक चरित्राच्या संशोधनातील सूक्ष्म बारकावे याबद्दल मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.

गोविंदराव सासने यांच्या आठवणीया पुस्तिकेचे प्रकाशन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी शाहू महाराजांचा सुधारणेचा वारसा आणि गोविंदराव सासने यांच्या कार्याविषयी विचार मांडले.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून समारंभाची सुरवात झाली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक व पुस्तिका निर्मितीसाठी भूमिका सांगितली.

शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी पाश्चात्य ऐतिहासिक चरित्र लेखनाबाबत आपले विचार व्यक्त केले. डॉ. अवनीश पाटील यांनी कोल्हापूरच्या ऐतिहासिक स्थळांचे, प्रबोधन चळवळींची केंद्रस्थाने जतन करण्याचे तसेच कोल्हापुरातील सामाजिक चळवळी आणि दुर्लक्षित इतिहास नव्याने लोकांसमोर येण्याचे महत्व प्रतिपादन केले. प्रा. अजित सूर्यवंशी यांनी गोविंदराव सासने यांच्या आठवणी सांगितल्या.

यावेळी सासने यांच्या कुटुंबियांपैकी प्रा. अजित सूर्यवंशी, बाळासाहेब सूर्यवंशी, स्वजिता घोडके, मेघना कामत, जया कामत या उपस्थित होत्या. समारंभासाठी प्रा. प्रभंजन माने, प्रा. अरुण शिंदे, विभागातील विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला. डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले, तर सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले.