(बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि त्या निमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने विशेष लेख...)
आम्हा मुलांना मोबाईल म्हणजे जीव की प्राण आहे. ती आता काळाची गरजही बनली आहे. पण याच मोबाईलने आमची एकाग्रता एवढी बोथट बनवली आहे की पुस्तकाचं एक पान वाचतानाही जीवावर येते. मोबाइलला बनवलंच असं आहे की, तो सतत मन विचलित करत राहतो. पण जेव्हा विवेकानंदांकडे पाहतो तेव्हा समजते, ते तर दिवसात मोठमोठाले खंड वाचून संपवत असत. यासाठी एकाग्र मन, ब्रह्मचर्याचे पालन आणि वर्षानुवर्षांची साधना किंवा प्रयत्न कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या तीन गोष्टी विद्यार्थी वयात सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
ज्ञानेश्वरीत
म्हटलंय, "म्हणोन जाणतेन गुरू भजिजे| तेणे कृतकार्य होईजे।"
ज्याला जाणण्याची इच्छा आहे, त्याला गुरुच्या सोबतीने
कार्यात यशस्वी होता येते. विवेकानंदही तरुण असतानाच त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची
उत्तरे शोधण्यासाठी गुरूच्या शोधात निघाले होते. रामकृष्ण परमहंस यांच्या रूपाने
ते भेटले देखील. पण आजच्या युवकांना मुळातच प्रश्न पडतात का? आज-काल बरेचसे ध्येयहीन युवक निरर्थक गोष्टींमध्ये अडकून पडल्याचे दिसते.
गुरूंची भेट देखील ऑनलाइन झाली आहे. या ऑनलाईन सहवासातून मुलांच्या कितपत
प्रश्नांची उत्तरे मिळतात?
हरिदास
देसाई यांना १८९२ला लिहिलेल्या
पत्रातून विवेकानंदांनी म्हटलं आहे की, "सिद्धांतांवर
विश्वास ठेवू नका कारण ते तुम्हाला पिढ्यानपिढ्या सुपूर्द केले गेले आहेत; कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका कारण ते अनेक लोक आंधळेपणे पाळतात;
काही वृद्ध ऋषी विधान करतात म्हणून विश्वास ठेवू नका; तुमच्याकडे असलेल्या सत्यांवर विश्वास ठेवू नका. सवयीने संलग्न व्हा;
केवळ तुमच्या शिक्षकांच्या आणि वडीलधाऱ्यांच्या अधिकारावर विश्वास
ठेवू नका. विचारपूर्वक विश्लेषण करा आणि जेव्हा निकाल तर्काशी सहमत असेल आणि
सर्वांच्या भल्यासाठी अनुकूल असेल तेव्हा ते स्वीकारा आणि त्याप्रमाणे जगा." (खंड
४, व्याख्याने आणि प्रवचने, द क्लेम्स
ऑफ रिलिजन) यातून विवेकानंदांचा विज्ञानवादी आणि तर्कवादी दृष्टिकोन आपल्याला
समजतो. हल्ली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ज्ञानवंत होत असलेल्या
युवकांनी याचा विचार करणे गरजेचे आहे. विविध राजकीय आणि धार्मिक विखारी प्रचाराला
तो बळी पडतो आहे. यातूनच १८-२१ वर्षांची मुले कट्टरपंथाकडे वळत असल्याचे बुली ॲपसारख्या घटनांमधून समोर
येते आहे.
स्वामी
विवेकानंदांनी आदर्श युवक कसा असावा, याबद्दल सांगितले आहे. आजच्या युवकांनी
विवेकानंदांकडून प्रेरणा घेऊन त्यांना अभिप्रेत आदर्श युवक बनण्याचा प्रयत्न केला
पाहिजे.
-
प्रथमेश पाटील
(लेखक शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन अधिविभागाचे
विद्यार्थी आहेत.)
No comments:
Post a Comment