कोल्हापूर, दि. २७
जानेवारी: कोणत्याही लेखनाच्या केंद्रस्थानी माणूस असावा आणि
त्या दृष्टीने भूमिका घेऊन लेखन केले जावे, अशी अपेक्षा पुरस्कारप्राप्त लेखकांशी
संवादातून आज व्यक्त झाली.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि महाराष्ट्र शासन, कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखक संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य अकादमी
पुरस्कारप्राप्त लेखक किरण गुरव, सोनाली नवांगुळ,
संजय वाघ आणि प्रणव सखदेव या लेखकांनी प्रस्तुत
कार्यक्रमात सहभाग घेतला.
आपल्या साहित्यनिर्मिती प्रक्रियेच्या अनुषंगाने पुरस्कारप्राप्त लेखकांनी
उपस्थितांबरोबर संवाद साधला. यावेळी कादंबरीकार
किरण गुरव म्हणाले, जगणे आणि लिहीणे आपण
वेगळं मानू शकत नाही. लेखक, त्याची भाषा आणि
त्याची साहित्यकृती ही नेहमी एकजीव असते. भाषा म्हणजे मन. ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या कादंबरीत
खेडयातील जगणं व शहरातील जगणं याचं विश्लेषण आहे. मी जी गोष्ट लिहीतो, कादंबरी लिहीतो, त्यामध्ये मला
माणूस आणि त्याची गोष्ट खूप महत्वाची वाटते. लिहीण्यात माणूस असला पाहिजे आणि
त्याची गोष्टही असली पाहिजे. ‘जुगाड’ कादंबरीत कामगाराचा जीवनप्रवास मांडला आहे.
मंदीचा कालखंड व तेजीचा कालखंड याचे वर्णन केले आहे. मात्र तिथेही आजचा माणूस आणि
त्याचं जगणंच मध्यवर्ती आहे.
सोनाली नवांगुळ यांनी पुरस्कारप्राप्त साहित्यकृतीच्या अनुवाद प्रक्रियेचा
प्रवास उपस्थितांसमोर उलघडून दाखवला. त्या म्हणाल्या, प्रत्येकाची निश्चित दिशा असते. वाट बघणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
त्यासाठी संयम महत्वाचा आहे. ‘मध्यरात्रीनंतरचे तास' ही सलमाची कादंबरी आहे. ५८७ पानांची इंग्रजी कादंबरी अनुवादासाठी कविता महाजन
यांनी माझयाकडे दिली. या अनुवादित कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळणे हा
माझ्या आयुष्यातील उत्सव आहे. मी सलमा आणि माझ्यातलं साम्य शोधत होते. आमचे संघर्ष
खूप वेगळे होते. ती धर्माच्या, पुरूषसत्ताक जगाच्या एका विशिष्ट चौकटीत
अडकलेल्या बायकांची गोष्ट लिहीत होती. मी शारिरीक अपंगत्वामुळे एका चौकटीत अडकले
होते. यात ४०-५० बायकांची चित्रं आहेत. बाई आणि तिचं जगणं या अनुषंगाने या
कादंबरीशी जोडले गेले. त्यातून हा अनुवाद साकारला.
प्रणव सखदेव यांनी ‘काळे करडे
स्ट्रोक’ कादंबरीची निर्मितीप्रक्रियेचा
वेध घेतला. वाचक हा लेखकास मोठा करत असतो, ऊर्जा देत असतो, असे सांगून सखदेव म्हणाले, ‘काळेकरडे स्ट्रोक्स' ही मुळात एक प्रेमकथा आहे. ही कथा लिहीण्याचे कारण मला माझ्या पिढीचे म्हणणे मांडायचे होते. या पिढीला नातेसंबंधांबद्दल काय वाटत, हे मला या कथेच्या माध्यमातून मांडायचं होतं. २००० सालानंतर आपले सर्वांचेच जगणे हे खूप तुटक, विखंडित झाले आहे. त्याला भिडण्याचा हा एक प्रयत्न आहे.
संजय वाघ यांनी आपल्या जडणघडणीतून साहित्यिक म्हणून आपण कसे घडलो, याबाबत उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, लहानपणापासून कविता आणि
पुढे पत्रकारिता या माध्यमातून अभिव्यक्त होत राहिलो, माझ्यातला लेखक जगवत राहिलो. २००८ साली
मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याने मला नाशिकपासून मुंबईला ओढून नेले. १८ लोकांचा जन्म
ते बलिदान असा प्रवास मांडला. हे माझे पहिले पुस्तक. २०१७ मध्ये ‘जोकर बनला किंगमेकर' ही किशोर कादंबरी
लिहीली. या कादंबरीत एकत्र कुटुंब व विभक्त कुटुंब यामधील फरक, माणसापासून दुरावलेली माणसं आणि आत्मविश्वास
हरवलेली आताची पिढी यांच्यासाठी सव्वादोन फूट उंचीचा जोकर उभा केला. हा संपूर्ण
गाव बदलू शकतो, तर आपण का बदलू शकत नाही, असा दिलासा, विश्वास
पेरण्याचा हा प्रयत्न आहे.
कार्यक्रमात प्रारंभी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कामगार कल्याण विभागाचे अधिकारी विजय शिंगाडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे यांनी केले तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. आभासी माध्यमाद्वारे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, रसिक साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
No comments:
Post a Comment