Tuesday, 25 January 2022

शिवाजी विद्यापीठात

राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात


 

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञा घेताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये, डॉ. प्रल्हाद माने आदी.

कोल्हापूर, दि. २५ जानेवारी: प्रत्येक प्रौढ विद्यार्थी-विद्यार्थिनीने मतदार यादीत आपले नाव नोंदविले पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या समवयस्कांना त्यासाठी प्रोत्साहितही केले पाहिजे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात आजादी का अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत आज १२व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणुका हा उपक्रम उत्साहाच्या वातावरणात आयोजित करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित निवडणूक साक्षरता मंडळाच्या सदस्य विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, केवळ मतदार यादी नाव नोंदविण्याने काम भागत नाही, तर निवडणुकांमध्ये मतदान करण्यासही युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. लोकशाहीचे पवित्र कर्तव्य म्हणून देशाचा विकास, लोकशाहीचे संवर्धन यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकाने कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करायला हवे. कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये, ही राज्य निवडणूक आयोगाची देखील भूमिका आहे. त्यासाठी आयोगाने मोठ्या प्रमाणात जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून युवकांनी मतदार नोंदणी मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नोडल अधिकारी डॉ. प्रल्हाद माने यांनी उपस्थितांना मतदार दिवस प्रतिज्ञा दिली. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासह निवडणूक साक्षरता मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment