Monday, 17 January 2022

प्रा. एन. डी. पाटील यांना शिवाजी विद्यापीठाने प्रदान केलेले मानपत्र (सन २००६)

 

सन २००६मध्ये शिवाजी विद्यापीठाची सर्वोच्च मानद डी.लिट. पदवी डॉ. एन.डी. पाटील यांना प्रदान करताना तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे. सोबत (डावीकडून) तत्कालीन परीक्षा संचालक एन.व्ही. ठक्कर, दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे तथा युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे 'पद्मविभूषण' प्रा. एम.एम. शर्मा आणि कुलसचिव डॉ. एस.एन. देसाई.


ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील (वय ९३ वर्षे) यांचे आज सोमवार, दि. १७ जानेवारी २०२२ रोजी निधन झाले. दि. १४ मार्च २००६ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या ४२व्या दीक्षान्त समारंभात डॉ. एन. डी. पाटील यांना सन्मानदर्शक डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लिट.) ही पदवी तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली होती. या समारंभात डॉ. पाटील यांना प्रदान करण्यात आलेले मानपत्र पुढीलप्रमाणे-

निःस्पृह विचारवंत, शैक्षणिक जागृती करणारे निष्ठावंत आणि प्रबोधनकार यांनी महाराष्ट्र संस्कृतीची वैभवशाली परंपरा निर्माण केली आहे. असे जाणते लोक आपल्या ध्येयाच्या वाटा स्वतःच धुंडाळतात आणि समाजाला पुरोगामित्वाचे आणि आदर्श जीवनाचे क्षितिज दाखवतात. असे धीरोदात्त पुरुष त्या समाजाचे मानदंड असतात. आपल्या भूमीतील अशा प्रबोधनकारांनी केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर साऱ्या देशाची मान उंचावत ठेवली आहे. या परंपरेत आपल्या कृतशीलतेने तळपणारे खंदे विचारवंत म्हणजे नारायण ज्ञानदेव पाटील उर्फ एन. डी. पाटील हे एक होत.

प्रा. एन. डी. पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील ढवळी (ता. वाळवा) या गावी १५ जुलै, १९२९ रोजी एका गरीब व निरक्षर शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ढवळी (ता. वाळवा) येथे झाले व माध्यमिक शिक्षण तेथून आठ मैलावर असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या ष्टा येथील माध्यमिक शाळेत झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या चळवळीचे वाळवा तालुका हे मुख्य केंद्र. त्यामुळे स्वातंत्र्याचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बाळकडूनही त्यांना येथेच मिळाले. या संस्कारात त्यांचे व्यक्तिमत्व घडत गेले. या सर्व गोष्टींचा एक अटळ परिपाक असा की, हात्मा गांधींच्या 'भारत छोडो' संग्रामात नारायणाने विद्यार्थीदशेत उडी घेतली. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू छत्रपती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्या सामाजिक जीवनाची वाटचाल सुरू झाली. पुढे राजाराम महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयाची बी. ए. पदवी आणि नंतर एम.ए. व एल.एल.बी. या पदव्या त्यांनी संपादन केल्या.

रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे ते प्राध्यापक म्हणून रूजू झाले. तेव्हापासून ते रयत शिक्षण संस्थेचे अविभाज्य घटक बनले. अर्थशास्त्राचे प्राध्यापक, 'कमवा व शिका' वसतिगृहाचे प्रमुख म्हणून सुरू झालेल्या त्यांच्या जीवनकार्याचा ओघ पुढे अनेक वाटांनी संस्थेच्या प्रवाहात मिसळून गेला. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, संस्थेच्या मॅनेजिंग कॉन्सिलचे पस्तीस वर्षे सदस्य आणि १९९० पासून आजतागायत चेअरमन म्हणून ते संस्थेची धुरा वाहत आहेत. नैतिक जबाबदारी पत्करून स्वतःला झोकून देऊन विधायक व संघटनात्मक वृत्तीने कार्य करणे हा त्यांचा प्रकृतिधर्म. आपल्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीत कर्मवीर अण्णांच्या तत्त्वज्ञानाला त्यांनी कृतिशील रूप दिले आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने त्याचे उपयोजन केले. बदलत्या काळानुसार नवे तंत्रज्ञान देणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगणक प्रशिक्षण केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, स्पर्धा परीक्षा केंद्र, गुरुकुल प्रकल्प, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन आदी संस्था व प्रकल्प तर त्यांनी सुरू केले; पण, सामाजिक, सांस्कृतिक कारणांमुळे शिक्षणापासून दुरावलेल्या, परिस्थितीने मागे पडलेल्या असंख्य मुलांनाही पुढे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शिक्षणशास्त्रात ज्या समाजस्तरांचे नावही नव्हते, त्यांच्यासाठी त्यांनी शिक्षणाची दारे उघडी केली. महाराष्ट्रभूमीत हा प्रयोग प्रथम घडत होता. तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा कर्मवीरांचा मंत्र त्यातून साकारत होता. संस्थेत प्रा. एन.डी. पाटील यांनी आश्रमशाळा, साखरशाळा सुरू केल्याच, पण त्यासोबत नापासांचीही शाळा सुरू केली. परिस्थितीने मागे राहिलेल्या मुलांच्या मनातील न्यूनगंड काढून टाकून त्यांच्या मानसिक पुनर्वसनाचा हा प्रयत्न म्हणजे साक्षात जीवनाचीच आव्हाने पेलण्याचा प्रयत्न होता.

त्यांनी कर्मवीर विद्या प्रबोधिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती यासारख्या अनेक संस्थाच्या माध्यमातून संशोधनास चालना देण्यापासून बुद्धिवादी लोकमानस घडविण्यापर्यंत अनेक प्रयोग केले. समाजपरिवर्तनासाठीची त्यांची सजगता त्यातून प्रकट होते. संस्थाचालकांनी केवळ गुणवत्तेवर कटाक्ष ठेवून निरपेक्ष वृत्तीने शिक्षण संस्थांत पावित्र्य कसे राखावे, याचा वस्तुपाठ प्रा. एन. डी. पाटील यांनी घालून दिला, हे त्यांच्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीचे आणखी एक वैशिष्ट्य. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा राखीव असणारा कोटा न स्वीकारता त्या जागा गुणवत्तेवर भरल्या, हे महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेचे आगळवेगळ उदाहरण होय.

महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातही वेगवेगळी पदे विभूषित करून ते सातत्याने सक्रिय राहिले. सुमारे अठरा वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते. १९८५-१९९० या काळात महाराष्ट्र विधान सभेचे सदस्य होते. तसेच, काही काळ विरोधी पक्षनेते होते. १९७८-८० या अवधीत ते महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री होते. पण जनतेने दिलेले प्रतिनिधीत्व आणि शासकीय सत्तापदे त्यांनी सामाजिक न्यायासाठीच वापरली. सध्याचा शेतकऱ्याच्या अस्तित्वाशी निगडित असलेला ज्वलंत प्रश्न म्हणजे एकाधिकार कापूस खरेदी. महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री असताना आणि अनेक बाजूंनी विरोध असतानादेखील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या ताकदीने ही योजना त्यांनी राबविली. आजही या प्रश्नासाठी ते लढा देत आहेत. सध्या सर्वत्र जागतिकीकरणाची लाट आलेली असताना कृषिप्रधान भारतीय अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या तिच्या विपरित परिणामांची दखल घेऊन, तीस विरोध करण्याची चळवळ त्यांनी उभी केली. यामागील कष्टकरी-शोषितांविषयीची त्यांची करूणाच प्रकट होते.

सीमा प्रश्न हा उभ्या मराठी माणसाच्या मनातला धगधगता प्रश्न आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला असला, तरी आपल्या दहा लाख मराठी भाषिक बांधवांना आपण कर्नाटकात तसेच सोडून दिले, याचे शल्य त्यांच्या मनात आजही तसेच आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणारा हा अन्याय त्यांच्या संवेदनशील मनाला सतत अस्वस्थ करत आहे. प्रतिकूल परिस्थितीत तेथील बांधवांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी व अस्मिता जागृत ठेवण्यासाठी त्यांनी जे लढे दिले, त्यातून त्यांच्यातील लढाऊ, खंदा कार्यकर्ताच प्रकट होतो. या सर्व अन्यायाविरुद्धच्या आंदोलनातील त्यांची भाषणे खूपच गाजली. समाज त्यातून पेटून उठत असे. या भाषणातील प्रा. एन. डी. पाटील यांचे विचार व वक्तृत्व यांना दोन शब्द साजेसे ठरतील. एक म्हणजे 'प्रपात' आणि दुसरा म्हणजे 'घणाघात'. समकालीन प्रश्नांवर त्यांनी काही लेखनही केले. "महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरूप', 'शेवटी' शिक्षण आहे तरी कुणासाठी?, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे इ. त्यांचे लेखन समाजाला प्रेरक ठरले.

प्रा. एन. डी. पाटील यांनी केलेल्या विविध चळवळी, सत्याग्रह आंदोलने म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवी हक्क आणि राष्ट्रीय भावना या मूल्यांच्या प्रतिष्ठपनेसाठी निर्माण झालेली संग्रामगाथा आहे. अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड हे त्यांच्या जीवनाचे मूलसूत्र आहे. अनेक सत्याग्रह चळवळीत त्यांना कारावास भोगावा लागला. महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील कारागृहे या काळात त्यांची माहेरघरे होती. महाराष्ट्रात वेळोवेळी जे प्रश्न निर्माण झाले आणि मानवी मूल्यांनाच आव्हान देणारे राजकीय निर्णय होऊ लागले. तेव्हा त्यांचा झाडा घेण्यासाठी सर्वशक्तिनिशी ते रस्त्यावर आले. शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी मानून त्याच्या विचारप्रणालीशी ते एकनिष्ठ राहिले आहेत. कोणत्याही प्रलोभनाने विचलित न होता व्रतस्थ वृत्तीने पक्षाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, शेतमजूर, दलित, पीडित, उपेक्षित यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अखंड लढा दिला. आजही देत आहेत. केवळ सामाजिक परिवर्तनच नव्हे, तर शोषणमुक्त समाजनिर्मितीचा त्यांचा प्रयत्न आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, कापूस एकाधिकार खरेदी योजना, महागाई आणि उपासमारविरोधी आंदोलन, सीमा प्रश्न, धरणग्रस्तांचे आंदोलन, जागतिकीरणविरोधातील आंदोलन आणि वीज प्रश्नावरील ताजे आंदोलन अशा अनेक पर्वानी प्रा. एन. डी. पाटील यांची संग्रामगाथा भरलेली आहे.

थोरामोठ्यांचे सद्गुण आणि कर्तृत्व यातून उच्च जीवनाची ऊर्जा घेऊन त्याविषयी मनःपूर्वक आदरभाव प्रकट करणे हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा स्वभाव आहे. त्यानुसारच प्रा. एन. डी. पाटील यांच्या सर्वस्पर्शी कार्याचा भाई माधवराव बागल पुरस्कार, क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील समाजसेवा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी झालेला गौरव याची साक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद तसेच स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी प्रा. एन. डी. पाटील यांच्या समग्र शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यास डी.लिट. ही सन्मानदर्शक पदवी प्रदान करून गौरविले आहे.

शिवाजी विद्यापीठाशी असणारे एन. डी. पाटील यांचे दृढ नाते कुणाच्याही सहज लक्षात येणार नाही, इतके जुने आहे. विद्यापीठाच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र शासनाने १९६२ मध्ये जी पहिलीच सल्लागार समिती नियुक्त केली होती, तिचे प्रा. एन. डी. पाटील सदस्य होते. १९६५ मध्ये विद्यापीठाच्या अधिसभेवर ते निवडून आले होते. विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे विद्याशाखेचे ते अधिष्ठाता होते. आणि १९६५-१९७८ अशी तब्बल तेरा वर्षेते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचेही सदस्य होते. या अधिकार मंडळात राहून आपली शिक्षण विषयक भूमिका वेळोवेळी प्रकट करीत शिवाजी विद्यापीठाला त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असे शैक्षणिक व समाजाभिमुख स्वरूप प्राप्त करून देण्यात आपला वाटा उचलला. त्यांनी या विद्यापीठास दिलेली ही बहुमोल देणगी आम्ही मानतो.

अशाप्रकारे सामन्यत्वाकडून असामान्यत्वाकडे गेलेले एक समर्थ, जनहितैषी, शोषणमुक्त व मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी धडपडणारे तसेच शिक्षणाच्या मूलगामी विचाराकडे समाजाला नेणारे एक कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व प्रा. एन. डी. पाटील यांच्या रूपाने आपणास लाभले आहेत. प्रखर तत्त्वविचाराचा व बुलंद वक्तृत्वाचा आचरणशुद्ध नेता अशी त्यांची प्रतिमा मराठी माणसाने आपल्या मनात जपली आहे. दुसऱ्यासाठीच झगडण्यात त्यांच्या आयुष्याचे सुवर्णपात्र ओसंडत राहिले. कर्तव्यनिष्ठ विचारवंत अनेक लौकिक लाभालोभापलिकडे गेलेले असतात, त्यांना कीर्तीचे धागे बांधू शकत नाहीत. उलट अशा महनीय व्यक्तींचे अस्तित्व हा समाजाच्याच अभिमानाचा विषय असतो. प्रा. एन. डी. पाटील यांच्याविषयी आम्हा सर्वांची हीच भावना आहे. त्यांना डी. लिट. ही सन्मानदर्शक पदवी प्रदान केल्याने आपलाच सन्मान झाल्याचे विद्यापीठास वाटते आहे. आदरणीय प्रा. एन. डी. पाटील महोदय, सामाजिक कृतज्ञतेच्या प्रांज भावनेने डी. लिट. ही सन्मानदर्शक पदवी शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या वतीने आपणांस आज प्रदान करीत आहोत. प्रस्तुत पदवीचा आपण स्वीकार करावा, अशी विनंती आहे.

No comments:

Post a Comment