Monday, 3 January 2022

स्त्री-पुरूष समानतेची बीजे शालेय जीवनात रूजवावीत: मंत्री सतेज पाटील

 

शिवाजी विद्यापीठा श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन सांगलीच्या संग्राम संस्थेच्या वतीने सोमवारी 'जबरदस्तीत कसली मर्दानगी' या विषयावर आयोजित परिसंवादावेळी माहिती फलकाचे द्घाटन करताना पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. सोबत (डावीकडून) डॉ. भारती पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, मीना शेषू शिल्पा पाटील.



शिवाजी विद्यापीठात 'जबरदस्तीत कसली मर्दानगी?'वर परिसंवाद

कोल्हापूर, दि. ३ जानेवारी: स्त्री-पुरूष समानतेच्या विचारांची पिढी निर्माण करावयाची असेल तर त्याची बीजे ही शालेय जीवनातच मुलांमध्ये रूजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि सांगलीच्या संग्राम संस्थेच्या वतीने विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित 'जबरदस्तीत कसली मर्दानगी?' या परिसंवादाच्या द्घाटनप्रसंगी मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लोटली तरी सुद्धा महिलांच्या सुरक्षितेसाठी कायदा करावा लागतो. याचा अर्थ आपण सुसंस्कृत पिढी घडविण्यात कमी पडलो की काय, असा प्रश्न निर्माण होतो. भविष्यातील पिढी ही स्त्री-पुरूष समानतेच्या विचारांची निर्माण करायची असेल तर त्याची बीजे संस्कार शालेय जीवनात रूजविणे गरजेचे आहे. या अभियानाची सुवात छत्रपती शाहू महाराजांच्या जिल्हयातून होत आहे, ही अभिमानस्पद बाब असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, चूल आणि मूल या प्रवृत्तीमुळे भारत मागे पडला आहे. युरोपीय देशात महिलांना समान संधी दिली जाते आहे. त्यामुळे त्या देशांनी प्रगती साधली आहे. हीच बाब जाणून शरद पवार यांनी महिलांना ५० टक्के आरक्षणासाठी पुढाकार घेतला. शक्ती कायद्यामुळे राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना चाप बसेल.

प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, सज्जनाच्या मौनामुळे स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्या घडूच नयेत, याकरिता सामाजिक प्रबोधनाबरोबरच समस्त सामाजिक घटकांमध्ये समन्वय आणि समतोल साधण्याची गरज आहे.

या परिसंवादाच्या निमित्ताने आयोजित पपेट शो आणि प्रबोधनात्मक फलकाचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते झाले. श्रीमती शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी प्रास्तविक केले. संग्राम संस्थेच्या अध्यक्षा मीना शेषू यांनी परिसंवादाचा हेतू विषद केला. महिला बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांनी पोक्सो, बालविवाह, सायबर क्राइम, आदींबाबत तत्काळ संपर्क साधण्यासाठी तयार केलेल्या फलकाविषयी विस्तृत माहिती दिली.

परिसंवादा डॉ. मेघा पानसरे, धनाजी गुरव, डॉ. भारती पाटील मीना शेषू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य अजेय दळवी, प्रायार्च महादेव नरके, नेहा वाडेकर, यांच्यासह विविध अधिविभागातील प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.


स्त्री-पूरूष समानतेविषयीची मोहीम १२ जानेवारीपर्यंत

कोल्हापूर जिल्ह्यात सांगलीतील संग्राम संस्थेच्या वतीने स्त्री-पुरूष समानतेविषयी 'जबरदस्तीत कसली मर्दानगी?' ही मोहीम 12 जानेवारीपर्यंत राबविली जाणार आहे. यासाठी संस्थेच्या अध्यक्षा मीना शेषू, शशिकांत माने, शांतीलाल काळे, अनूप्रिया कदम, गौतम कांबळे, शिवाजी माळी, श्रुती मगदूम, विद्रोही महिला मंच आणि रजरिया मुस्लिम महिला मंचच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत आहे.

No comments:

Post a Comment