प्रा. वेरा जबोत्किना |
प्रा. रोमिला थापर |
प्रा. रोमिला थापर |
डॉ. गणेश देवी |
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के |
शिवाजी विद्यापीठात तीन दिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
कोल्हापूर, दि.
२९ जानेवारी: बहुविधतेमधील सुंदरता हे दक्षिण आशियाई क्षेत्रातील देशांचे वैशिष्ट्य
ऐतिहासिक कालखंडापासून पारंपरिकरित्या विकसित होत गेलेले आहे. हे सौंदर्य व
सौहार्द जपण्याची जबाबदारी आधुनिक काळातील धोरणकर्त्यांनी स्वीकारायला हवी, असे
प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ प्रा. रोमिला थापर यांनी आज येथे केले.
शिवाजी
विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग व मराठी अधिविभाग आणि द इंटरनॅशनल सेंटर फॉर साउथ
एशियन स्टडीज, रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज, मॉस्को, रशिया (RSUH) यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय ऑनलाईन
परिसंवादाच्या उद्घाटन समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
होते.
‘दक्षिण आशिया:
‘अज्ञात’ अवकाशांचा शोध’ (“Open Pages in South Asian Studies - IV”, Kolhapur, India) या शृंखलेतील ‘दक्षिण आशिया: समकालीन गतिमान वास्तव – २०२२’ (The Contemporary Dynamics of South Asia – 2022) या मध्यवर्ती विषयावर आयोजित
करण्यात आलेल्या या ऑनलाईन परिसंवादाचे उद्घाटन आज सकाळी देशविदेशांतील
मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
प्रा. थापर म्हणाल्या, बहुसांस्कृतिकता, बहुविधता हे दक्षिण
आशियाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य राहिले आहे. भारताने या क्षेत्राचे इतिहास
काळापासून नेतृत्व केले आहे. इतिहासात या परिक्षेत्रात जसा संघर्ष झडला, तसाच
सह-अधिवासही निर्माण झाला. येथे प्रत्येक बाबतीत सहिष्णुता होती, असे नव्हते; तसेच, प्रत्येक वेळी, प्रत्येक
बाबतीत हिंसेचा मार्ग अवलंबला गेला, असेही घडले नाही. सामाजिक, सांस्कृतिक,
धार्मिक आणि राजकीय आदानप्रदानातून येथील इतिहास, भूगोल घडला आणि आकाराला आला.
अगदी हिंदू-मुस्लीमांच्या देवाणघेवाणीतूनही या इतिहासाला सांस्कृतिक विकासाचे आयाम
प्रदान केले आहेत. एकूणातच सौहार्द व साहचर्याने राहण्याचा इतिहास या विभागाला
आहे. आधुनिक समकाळात सर्वांना समान संधीचे धोरण स्वीकारून सहिष्णु आणि अहिंसा
तत्त्वांच्या अंगिकारातून येथील नागरिकत्वाच्या जाणीवा अधिक जागतिक करण्याची
आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी
बीजभाषण केले. वसाहतवादाचा सिद्धांत आणि पाश्चात्य राजकीय विचारवंत,
विश्लेषकांच्या प्रभावातून बाहेर पडून दक्षिण आशियाई विभागाचा फेरविचार करण्याची
गरज डॉ. देवी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, दक्षिण आशिया विभागात जगाच्या एकूण
८०० कोटी लोकसंख्येपैकी साधारण ११९ कोटी लोक राहतात. याचा अर्थ जगाच्या अवघ्या
साडेतीन टक्के इतक्या अल्प भूभागावर जगाची २५ टक्के लोकसंख्या राहते आहे. या
लोकसंख्येचा येथील अधिवासाचा इतिहास सुमारे १२ हजार वर्षांपासूनचा आहे. मात्र,
अमेरिकन, पाश्चिमात्य युरोपियन अशासारखी दक्षिण आशियाई अशी त्यांची स्वतंत्र जागतिक
ओळख मात्र प्रस्थापित झालेली नाही. व्यामिश्र संस्कृती, व्यामिश्र भाषा आणि जातीभेद
अशा वैविध्यतेने व्याप्त असलेल्या या विभागातील नागरिकांचा किमान राहणीमान दर्जा
राखण्याची फार मोठी जबाबदारी धोरणकर्त्यांवर आहे. मानवी स्वातंत्र्याच्या
निर्देशांकात दहाच्या पट्टीवर येथील देशांतील निर्देशांक ५ ते ६.५ या दरम्यानच
आहेत. त्यातही भारत आणि नेपाळ हे दोनच देश लोकशाहीची बूज राखणारे आहेत, अशी
निरीक्षणे आहेत. लैंगिक समानता व आरोग्य या बाबतीत या देशांची जागतिक क्रमवारी ९०
ते १२५ या दरम्यान म्हणजे अतिशय खालची आहे. विकासाचा मुद्दा लक्षात घेता भारत कार्बन
उत्सर्जन करणाऱ्या देशांत जागतिक तिसऱ्या क्रमांकाचा आहे. पर्यावरणीय ऱ्हास म्हणजे
विकास नव्हे, हे अद्याप या नैसर्गिक साधनसंपत्ती, संसाधनांनी समृद्ध विभागातील
देशांच्या धोरणकर्त्यांनी लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.
डॉ. देवी यांनी दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या भाषिक
व्यवहाराच्या अनुषंगानेही सविस्तर विश्लेषण केले. ते म्हणाले, जगात सध्या सुमारे
७००० भाषा आहेत, त्यातील २५ टक्के येत्या ३० वर्षांत अस्तंगत होतील. दक्षिण आशियाई
देशांनी मात्र भाषा जगविण्याची कामगिरी केली आहे. या विभागात भाषा अस्तंगत
होण्याचे प्रमाण अल्प आहे. तथापि, यामध्ये धोरणकर्त्यांचे कमी आणि नागरिकांचे
योगदान मोलाचे आहे. उदाहरणादाखल, भारतात ५२ कोटी लोक हिंदी भाषिक दाखविले आहेत.
त्यात पहाडी, भोजपुरी यांच्यासह विविध ठळक स्थानिक भाषांचे वेगळे अस्तित्व न
दाखविता हिंदीमध्येच दाखविले आहे. अशी खेदजनक परिस्थिती सर्वच दक्षिण आशियाई
देशांमध्ये आहे. ती बदलण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्नांची आवश्यकता त्यांनी व्यक्त
केली.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले,
शिवाजी विद्यापीठाचे रशियन विद्यापीठांशी गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ शैक्षणिक,
संशोधकीय व सांस्कृतिक सौहार्दाचे संबंध आहेत. सदरचा परिसंवाद हा उभय देशांमधील हे
शैक्षणिक, भाषिक तसेच सांस्कृतिक सहसंबंध अधिक दृढ व प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने
अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उद्घाटन समारंभात मॉक्सो येथील रशियन स्टेट युनिव्हर्सिटी
फॉर ह्युमॅनिटीजच्या इंटरनॅशनल अफेअर्सच्या प्र-कुलगुरू प्रा. वेरा जबोत्किना आणि संचालक, रशियन हाऊस इन मुंबईच्या डॉ. इलेना
रेमीजवा, प्रा. अलेक्झांद्र स्तल्यारव यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाजी
विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी स्वागत केले,
तर इंदिरा गजीयेवा (रशिया) यांनी
प्रास्ताविक केले. डॉ. अरुंधती पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास रशियाचे
भारतातील राजदूत निकोलाय कुदाशेव, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही.एन.
शिंदे, मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. शरद नावरे
आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment