डॉ. सागर डेळेकर |
''अँटीमायक्रोबियल रंग करिता नॅनो संमिश्रे'' या संदर्भात केले संशोधन
कोल्हापूर, दि.19 जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील प्रा. एस. डी. डेळेकर व त्यांचे संशोधक विद्यार्थी डॉ. शामकुमार देशमुख यांना ''अँटीमायक्रोबियल रंग करिता नॅनो संमिश्रे'' या संशोधनाकरीता भारतीय पेटंट मिळाले आहे.
मानवाच्या दैनंदिन जीवनात बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी इ. सूक्ष्मजीवजंतू सर्वत्र आढळतात. पोषक वातावरणात हे सूक्ष्मजीवजंतू त्वरित पुनरुत्पादित होतात. त्यामुळे वातावरणात दुर्गंधी, अस्वच्छता पसरते. तसेच हे सूक्ष्म जीवजंतू मानवी शरीरामध्ये प्रवेश करुन अनेक संसर्गजन्य आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. त्याचसोबत या सूक्ष्म जीवजंतूच्या संसर्गामुळे अनेकदा दवाखान्यामध्ये दाखल व्हावे लागते. काही वेळा जीवही गमवावा लागतो. किंबहुना मधुमेही, रक्तदाबाच्या (बीपी) रुग्णांना अशा सूक्ष्म जीवजंतूचा संसर्ग लवकर होवून त्यांची प्रतिकार क्षमता दिवसेंदिवस खालावत जाते. कोरोना विषाणूमुळे होणारे विविध संसर्गजन्य आजाराची प्रचिती सारे जग अनुभवत आहे. म्हणूनच या सूक्ष्म जीवजंतूचा पृष्ठभागावरील होणारा प्रसार व पुनरुत्पादन रोखण्याठी प्रा. डेळेकर यांनी अविरत परिश्रम करून साकारलेल्या संशोधनातून अँटीमायक्रोबियल रंग (पेंट) करिता आवश्यक नॅनो संमिश्रे तयार केली आहेत. अशा रंगाचे आवरण घरातील व दवाखान्यातील विविध वस्तूंना दिल्यास त्या वस्तूंच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म जीवजंतू नष्ट होवून त्यांचा प्रसारही होत नाही. त्यामुळेच विविध संसर्गजन्य आजारांचा अटकाव होऊ शकतो. सदरचा रंग (पेंट) हा घरातील, कार्यालयातील, दवाखान्यातील विविध उपकरणे, कॉट, दरवाजे, कपाटे, टेबल, खुर्ची इ. साठी वापरु शकतो. तसेच वाहनांच्या विविध पार्ट्सना सदरच्या रंगाचे आवरण दिल्यास ते पृष्ठभागही जंतूविरहित होऊ शकतात. डॉ. डेळेकर यांनी संशोधित केलेले नॅनो संमिश्रे ही दीर्घकालीन अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेले पदार्थ असून ते पूर्ण सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहेत.
या संशोधनाचे श्रेय त्यांनी शिवाजी विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांना दिले आहे.
No comments:
Post a Comment