Wednesday, 13 August 2025

एकात्म मानवदर्शनात मानवाच्या समग्र अभ्युदयाचा विचार: डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

शिवाजी विद्यापीठात 'एकात्म मानवदर्शन' या विशेष व्याख्यान प्रसंगी उद्घाटन करताना डॉ. विनय सहस्त्रबुद्धे. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. राजाराम गुरव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठात 'एकात्म मानवदर्शन' या विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. विनय सहस्त्रबुद्धे. मंचावर (डावीकडून) डॉ. राजाराम गुरव, डॉ. तानाजी चौगुले, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठात 'एकात्म मानवदर्शन' या विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. विनय सहस्त्रबुद्धे.


कोल्हापूर, दि. १३ ऑगस्ट: पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानवदर्शनामध्ये मानवाच्या समग्र अभ्युदयाचा विचार आहे, असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज येथे केले.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानवदर्शन हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित एकात्म मानवदर्शन या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी एकात्म मानवदर्शन या तत्त्वज्ञानामध्ये भौतिक सुखाच्या पलिकडे मानवाच्या सर्वंकष सौख्याचा विचार मांडलेला आहे. शरीर, बुद्धी, मन आणि आत्मा या सर्वांचा विचार एकाच वेळी येथे करण्यात येतो. या सर्वांच्या केंद्रस्थानी माणूस आहे. संसाधनांना प्राधान्य देणारी भांडवलवादी व्यवस्था आणि भांडवलापेक्षा माणसाच्या आर्थिक गरजांना प्राधान्य देणारी साम्यवादी व्यवस्था या दोहोंकडेही न झुकता मानवाच्या व्यापक हिताची सर्वंकष आणि मध्यममार्गी भूमिका उपाध्याय घेतात. ही भूमिका महात्मा गांधी यांच्या अंत्योदयाच्या विचाराशी जवळचे नाते सांगणारी आहे. व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांचे भान त्यात आहे. व्यक्तीगततेच्या बरोबरीनेच समाजाप्रती कर्तव्य पार पाडण्याचा आग्रहही त्यामध्ये आहे. एकूणच व्यक्ती आणि समाजाचे सक्षमीकरण त्यात अभिप्रेत आहे.

डॉ. सहस्त्रबुद्धे पुढे म्हणाले, जगा आणि जगू द्या तसेच साहचर्य हे मानवकल्याणाचे भारतीय चिंतन आहे. त्यामध्ये समाजातल्या वंचित, उपेक्षितांचे चिंतन आहे, तसेच चराचरांविषयी कृतज्ञता आहे. भारताची विविधता हे त्याचे सौंदर्य आणि ताकद आहे. ही विविधता विघटनाचे कारण न बनता एकात्मतेचे बळ बनली पाहिजे. त्या विविधतेला सामाजिक न्याय आणि स्त्री-पुरूष समानतेच्या सूत्रात गुंफले पाहिजे. प्राचीन विज्ञान व परंपरा पुढे नेत असताना या विचारांची मांडणी योग्य पद्धतीने करता आली पाहिजे. प्रामाणिकता, निष्ठा आणि परिश्रम या मूल्यांची जोड असणेही महत्त्वाची आहे. संपूर्ण जग सांस्कृतिकदृष्ट्या सपाट होत असताना आणि लोकही संकीर्णतेमध्ये अडकले असतानाच्या कालखंडात स्वत्व टिकवून ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर ठाकले आहे. विविधतेमधील एकात्मता हेच त्याला भारतीय उत्तर असू शकते, असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आद्य स्वातंत्र्यसेनानी

छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे, शूरवीर तर होतेच; पण, त्याही पलिकडे जाऊन ते एक दूरदर्शी राजे होते. या देशामध्ये स्वराज्याची प्रेरणा चेतविणारे आद्य स्वातंत्र्यसेनानी होते. त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहायला हवे. स्वदेशी, स्वभूषा आणि स्वभाषा या माध्यमातून या देशाला विकासाची स्वदृष्टी प्रदान करणारे ते महान छत्रपती होते. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी सांगितल्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधी सन १६२८मध्ये मराठीचा लोकवापर अवघा १४ टक्के होता. महाराजांच्या काळात सन १६७४मध्ये तो ६२ टक्क्यांवर गेला आणि त्यानंतरच्या कालखंडात सरकारी वापरात ९३ टक्के इतका झाला. अशा तऱ्हेने छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषासमृद्धीचा पाया घातल्याचेही डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, एकात्म मानवदर्शन या व्यापक संकल्पनेविषयी अनभिज्ञता आहे. त्या संदर्भातील योग्य प्रशिक्षण देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन सदर व्याख्यानाची एक महिन्याच्या आत पुस्तिका तयार करण्यात येईल. तसेच या अनुषंगाने निबंध स्पर्धांसह विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येईल. डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्याकडे एकात्म विचार करण्याची विशिष्ट पद्धती असून त्याचा विद्यापीठाने वेळोवेळी अनुभव घेतला आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कालखंडात विद्यापीठात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांशी त्यांनी साधलेला संवाद अविस्मरणीय स्वरुपाचा होता. ज्यांच्यापर्यंत अद्याप कोणीही पोहोचलेले नाही, अशा समाजघटकांपर्यंत, अशा देशांतील विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचले पाहिजे, हा त्यांचा संदेश अत्यंत मूलभूत स्वरुपाचा ठरला.

यावेळी डॉ. राजाराम गुरव यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, आजीवन अध्ययन विभागाचे डॉ. रामचंद्र पवार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. सुखदेव उंदरे, व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, संजय परमणे, मनोज पाटील, विनिता तेलंग, रतन कांबळे यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Friday, 8 August 2025

स्वातंत्र्यसैनिकांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे विद्यापीठात प्रदर्शन सुरू

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त उपक्रम

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वातंत्र्यसैनिकांच्या माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. अवनीश पाटील, डॉ. केशव राजपुरे, चंद्रकांत शहासने, डॉ. दत्ता मचाले, उमाकांत हत्तीकट आदी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्वातंत्र्यसैनिकांच्या माहिती प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. अवनीश पाटील, डॉ. केशव राजपुरे, चंद्रकांत शहासने आदींसोबत विद्यार्थी-विद्यार्थिनी.


कोल्हापूर, दि. ८ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती असणाऱ्या सुमारे २००० दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनास आज सकाळी प्रारंभ करण्यात आला. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात उद्यापर्यंत (दि. ९) हे प्रदर्शन सुरू राहील.

आज सकाळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे येथील जयहिंद फौंडेशन आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे संकल्पक चंद्रकांत शहासने यांनी अथक परिश्रमातून संकलित व संग्रहित केलेल्या माहितीमधून संपूर्ण भारतातील क्रांतिकारकांची शौर्यगाथा या प्रदर्शनाद्वारे उलगडणार आहे. विशेषतः महाराष्ट्रातील आदिवासी क्रांतिकारकांसह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा विस्तृत आढावा या अंतर्गत घेण्यात आला आहे. या माध्यमातून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांनी केलेला त्याग, दिलेले बलिदान, दाखवलेले धैर्य आणि चिकाटी याचे एक प्रेरचित्र या प्रदर्शनात मांडलेल्या माहितीफलकांमधून सामोरे येते. कोल्हापूर आणि परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनीही या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. शहासने आणि इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी केले आहे.

Thursday, 7 August 2025

सॉफ्टबॉलमध्ये राष्ट्रीय सुवर्णविजेत्या महिला संघाचे विद्यापीठात स्वागत

शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय विजेता महिला सॉफ्टबॉल संघ


कोल्हापूर, दि. ७ ऑगस्ट: अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून परतलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या महिला संघाचे काल (दि. ६) विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.

विक्रम सिंहापुरी विद्यापीठ, नेल्लूर (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ महिला सॉफ्टबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या महिला संघाने अंतिम सामन्यात पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीविरुद्ध अत्यंत चुरशीच्या खेळीचे प्रदर्शन करीत २-१ होमरन्सच्या फरकाने सामना जिंकून सुवर्णपदक प्राप्त केले.

विद्यापीठाच्या या महिला सॉफ्टबॉल संघाने सलग दहा सामने जिंकून हे विजेतेपद पटकावले. महिला सॉफ्टबॉलच्या इतिहासात विद्यापीठाला प्रथमच सुवर्णपदक मिळाले आहे. या यशाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांचा विद्यापीठात सत्कार करण्यात आला.

संघ प्रशिक्षक म्हणून प्रा. विनायक जाधव, संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. राम पवार यांनी काम पाहिले. विजयी संघ असा- (कर्णधार) स्वप्नाली चंद्रकांत वायदंडे, ऐश्वर्या रमेश पुरी, करिष्मा राजू कुडचे, अंजली उमेश पवार, साक्षी दीपक येताळे, मृणाली विजय जाधव, वैष्णवी महादेव हुळहुळे, सृष्टी संतोष शिंदे, सौशज्ञ रवींद्र माने, सागरीका अरुण म्हातो, सलोनी सुरेश नलवडे, सृष्टी निरंजन कदम, अनुजा विष्णू पाटील, श्रावणी विनोद चौगुले, निलोफर सय्यद गोस, सृष्टी संदीप देशमुख.

संघाच्या सत्कार प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा अधिविभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, माजी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड उपस्थित होते.

 

Wednesday, 6 August 2025

स्वयंअध्ययन साहित्य लेखन परंपरा सर्वोत्तम: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

राज्यशास्त्राच्या स्वयंअध्ययन साहित्याचे प्रकाशन

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या बी.ए. भाग-२च्या स्वयंअध्ययन साहित्याचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, लेखक आदी.

(स्वयंअध्ययन प्रकाशन कार्यक्रमाचा व्हिडिओ)



कोल्हापूर, दि. ६ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमधील स्वयं अध्ययन साहित्य लेखनाची परंपरा सर्वोत्तम असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुधारित झालेल्या अभ्यासक्रमांप्रमाणे बी.ए.-भाग २ राज्यशास्त्र स्वयं अध्ययन साहित्याचा प्रकाशन सोहळा व्यवस्थापन परिषद सभागृहात काल (दि. ५) झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, मानवशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.ज्योती जाधव, राज्यशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. रवींद्र भणगे, राज्यशास्त्र विषयाचे घटक लेखक. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर, डॉ. सचिन भोसले, योगेश पवार, विकास पाटील उपस्थित होते.  

कुलगुरू डॉ.शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांना वेळेत स्वयं अध्ययन साहित्य देण्याने दूरशिक्षण हे नजीकचे शिक्षण होत आहे. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने तयार करण्यात आलेले स्वयंअध्ययन साहित्य सर्वच विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणारे आहे. हे स्वयंअध्ययन साहित्य इतर विद्यापीठे स्वीकारत असल्याने आपले लेखन महाराष्ट्रभर चालले आहे. त्याचा  फायदा राज्यातील  हजारो विद्यार्थ्यांना होत आहे. शिक्षकांनी आता विद्यापीठासह विद्यार्थ्यांना देण्यासाठी व्यावसायिक पुस्तके तयार करावीत.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पाटील, कुलसचिव डॉ. शिंदे, अधिष्ठाता डॉ. देशमुख, डॉ. भणगे, डॉ. सेलुकर यांनी मनोगते व्यक्त केली.

प्रकाशित स्वयंअध्ययन साहित्यामध्ये बी.ए. भाग-२ च्या सत्र ३ व ४ साठीच्या भारतीय राजकीय विचारवंत(संपादक डॉ. शार्दुल शेलुकर, डॉ. विजय देठे), महाराष्ट्र शासन व महाराष्ट्रातील राजकीय प्रक्रिया (संपादक अनिल मोहिते, डॉ. संतोष खडसे), निवडणूक व्यवस्थापन व माध्यमे आणि राजकारण (संपादक डॉ. राहुल मांडणीकर, डॉ. रवींद्र भणगे) आणि भारतीय लोकशाहीचा इतिहास (संपादक डॉ. रवींद्र भणगे) यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमात केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर उपकुलसचिव व्ही.बी.शिंदे यांनी आभार मानले.

दूरशिक्षण केंद्राद्वारे उच्चशिक्षण घेऊन कालवा निरीक्षक बनल्या ऐश्वर्या बल्लाळ

कालवा निरीक्षक ऐश्वर्या बल्लाळ यांचा सत्कार करताना अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी. सोबत डॉ. कृष्णा पाटील, डॉ. मच्छिंद्र गोफणे, व्ही.बी. शिंदे, दिलीप मोहाडीकर, डॉ. चांगदेव बंडगर, डॉ. मुफिद मुजावर, डॉ. नितीन रणदिवे आदी.


 

कोल्हापूर, दि. ६ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रातील विद्यार्थिनी ऐश्वर्या नामदेव बल्लाळ यांची महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक (Canal Inspector) पदावर नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

ऐश्वर्या बल्लाळ यांनी एम.ए. (इतिहास) पदव्युत्तर शिक्षण दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या माध्यमातून पूर्ण केले आहे. अभ्यासक्रमादरम्यान त्यांनी राज्य पात्रता परीक्षा (SET) तसेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) उत्तीर्ण केली असून JRF (Junior Research Fellowship) प्राप्त केली आहे. सध्या त्या शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागात डॉ. अवनीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "१८८५ ते १९८४ पर्यंतचा संविधानात्मक विकास आणि महिला" या विषयावर पीएच.डी. संशोधन करत आहेत.

या आधीही त्यांची स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी तसेच महसूल सहायक या पदांवर निवड झाली आहे. सध्या त्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

यावेळी ऐश्वर्या बल्लाळ म्हणाल्या, "बी.एस्सी. संख्याशास्त्र विषयातून पदवी घेतल्यानंतर मी शिक्षण थांबवले होते. परंतु स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासादरम्यान हे लक्षात आले की, दूरशिक्षणाच्या माध्यमातून अपूर्ण शिक्षण पूर्ण करता येते आणि स्पर्धा परीक्षेस उपयुक्त असणारे विषयही निवडता येतात. म्हणून मी इतिहास विषयातून एम.ए. पूर्ण केले आणि याच शिक्षणामुळे मला SET, NET आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता आले. या यशात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचा मोलाचा वाटा आहे."

डॉ. मेघा गुळवणी म्हणाल्या, "दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र हे केवळ शिक्षणाचे माध्यम नाही, तर शिक्षणात खंड पडलेल्यांना मुख्य प्रवाहात पुन्हा आणून त्यांना कौशल्याधारित शिक्षण, मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रभावी साधन आहे. श्रीमती बल्लाळ यांचा यशस्वी प्रवास हे त्याचे उत्तम उदाहरण आहे."

कार्यक्रमास केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील, गणित अधिविभाग प्रमुख डॉ. मच्छिंद्र गोफणे, उपकुलसचिव व्ही.बी. शिंदे, सहायक कुलसचिव दिलीप मोहाडीकर, समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर, सहायक प्राध्यापक डॉ. मुफिद मुजावर, डॉ. नितीन रणदिवे, डॉ. सुशांत माने, विशाल हिलगे उपस्थित होते.

 


Tuesday, 5 August 2025

भूगोल अधिविभागाच्या विस्तार इमारतीचे विद्यार्थिनींच्या हस्ते उद्घाटन


शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाच्या विस्तार इमारतीचे उद्घाटन करताना विद्यार्थिनी. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी.


शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाच्या विस्तार इमारतीमध्ये फीत सोडवून प्रवेश करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सचिन पन्हाळकर आदी.


(उद्घाटन कार्यक्रमाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. ५ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाच्या विस्तार इमारतीचे आज उद्घाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागाच्या विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले.

भूगोल अधिविभागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिओइन्फॉर्मेटिक्स अभ्यासक्रमांसाठी जागेची आवश्यकता लक्षात घेऊन गतवर्षी ऑक्टोबरमध्ये नूतन विस्तार इमारतीच्या कामास प्रारंभ करण्यात आला. एक वर्ष पूर्ण होण्याच्या आत इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे. ४०७७ चौरस फूट (३७८.९६ चौ. मीटर) इतके तळमजल्याचे बांधकाम झाले आहे. जेनेसिस डिझाईनर्स प्रा. लि. हे आर्किटेक्ट आहेत.

आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते कोनशिला अनावरण नियोजित होते. तथापि, जिओइन्फॉर्मेटिक्स विषयाच्या सायली यादव आणि निकिता जाधव या विद्यार्थिनींना बोलावून कुलगुरूंनी त्यांच्या हस्ते कोनशिला अनावरण केले. त्यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी इमारतीमध्ये फीत सोडवून प्रवेश केला. यावेळी सिव्हील कंत्राटदार उदय घोरपडे, अनिरुद्ध घोरपडे आणि विद्युत ठेकेदार श्रीकांत गुजर यांचा कुलगुरूंच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागामध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांच्या बरोबरीने सन २००८ पासून जिओ-इन्फॉर्मेटिक्स या विषयामध्ये पीजी-डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू आहे. सन २०२२ पासून वाढती मागणी लक्षात घेऊन एम.एस्सी.- जिओइन्फॉर्मेटिक्स हा अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला. शासनाची सर्व धोरणे आता जिओइन्फॉर्मेटिक्सशी निगडित आखली जाऊ लागली आहेत. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्प, महापूर व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, नगर विकास व भूमापन, भूमी अभिलेख, महसूल इत्यादी अनेक शासकीय क्षेत्रांमध्ये याचा वापर वाढला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्यांना रोजगार संधीही मुबलक उपलब्ध होत आहेत. उपरोक्त दोन्ही अभ्यासक्रमांना मिळून ७० विद्यार्थी प्रवेशित आहेत. भूगोल अधिविभागाच्या मूळ इमारतीमध्ये त्यांचे वर्ग आणि प्रयोगशाळा यासाठी जागेची कमतरता भासत असल्यामुळे नव्या विस्तार इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये वर्गखोल्यांबरोबरच थ्री-डी व्हिज्युअलायझेशन, ड्रोन टेक्नॉलॉजी यांसह जिओइन्फॉर्मेटिक्सशी निगडित प्रयोगशाळाही असणार आहेत. येथे विविध क्षेत्रांतील शासकीय अधिकाऱ्यांसाठी आवश्यकतेनुसार व मागणीनुसार प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचाही विद्यापीठाचा मानस आहे.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी जाधव, डॉ. गिरीष कुलकर्णी, उपकुलसचिव रणजीत यादव, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. संभाजी शिंदे, डॉ. धनश्री शिंदे, डॉ. मीना पोतदार, डॉ. विद्या चौगुले, डॉ. प्रशांत पाटील, विद्युत अभियंता अमित कांबळे, विजय पोवार, शिवकुमार ध्याडे, वैभव आरडेकर, जी.बी. मस्ती यांच्यासह भूगोल अधिविभागातील शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 


अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राचे समाजशास्त्र खऱ्या अर्थाने समजलेले साहित्यिक: डॉ. राजन गवस

शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय परिसंवाद

शिवाजी विद्यापीठात अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित परिसंवादात बीजभाषण करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रभंजन माने, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. रणधीर शिंदे, सचिन साठे आणि डॉ. अक्षय सरवदे.

शिवाजी विद्यापीठात अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित परिसंवादात बीजभाषण करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस. 


(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. ५ ऑगस्ट: महाराष्ट्राचे समाजशास्त्र खऱ्या अर्थाने समजलेले साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त अण्णा भाऊ साठे आणि मानवतावाद या विषयावरील एकदिवसीय परिसंवाद मानव्यशास्त्र सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी उद्घाटक व बीजभाषक म्हणून डॉ. गवस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

डॉ. गवस म्हणाले, महाराष्ट्राचे समाजशास्त्र हे देशातील अन्य राज्यांपेक्षा खूप वेगळे आहे. येथील समाजांतर्गत असणारी जातीय उतरंड आणि ती निर्माण होण्यामागील कारणमीमांसा कठोरपणे समजून घेतल्याखेरीज ते समजणार नाही. अण्णा भाऊंना हे समाजशास्त्र नेमकेपणाने समजलेले होते. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यामध्ये जागोजागी उमटलेले दिसते. त्यातून त्यांच्या आस्थेचा परीघ विस्तारलेला होता. शोषित वर्गाकडे नायक म्हणून पाहण्याची त्यांची दृष्टी त्यातूनच विकसित झालेली होती. एका अर्थाने अण्णा भाऊ हे सांगणारे नव्हे, तर रचणारे लेखक होते. त्यांच्या साहित्यकृती मिथकांचे पुनरावलोकन करणाऱ्या आहेत.. केवळ आत्मकथनात्मक न लिहीता रचनात्मक लेखनावर त्यांनी भर दिला. हे रचलेले सारेच त्यांचे आत्मचरित्र ठरावे. लोकसाहित्य, लोकपरंपरा या अंगाने त्यांनी लेखन केले. त्यामुळे लोकपरंपरेच्या मूल्यांतून अण्णा भाऊंच्या साहित्याच्या मूल्यमापनाची नवी निकष व्यवस्था निर्माण करावी लागेल. त्यासाठीच निव्वळ पर्यायी सौंदर्यशास्त्राची मांडणी करावी लागेल. अभ्यासक, संशोधकांनी या नव्या सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीकोनातून अण्णा भाऊंच्या साहित्याचे नव्याने संशोधन आणि मांडणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मार्क्स आणि अण्णा भाऊ त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ यांना एकमेकांना समांतर ठेवून वाचण्याची, अभ्यासण्याची गरज डॉ. गवस यांनी व्यक्त केली. बाबासाहेबांनी त्यांच्या संशोधनपर वैचारिक लेखनातून येथील व्यवस्थेचे जे सखोल चिंतन प्रकट केले, त्याच चिंतनाचे अण्णा भाऊंनी आपल्या कल्पित व्यूहातून अधोरेखन केल्याचे दिसते. यातून वैचारिक भूमिकेच्या बाबतीत त्यांचे बाबासाहेबांशी असणारे साम्य ढळढळीतपणे सामोरे येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे म्हणाले, अण्णा भाऊंना काल्पनिकता कधीच भावली नाही. वास्तविकता आणि प्रामाणिकता हे त्यांच्या समग्र साहित्याचे वैशिष्ट्य आहे.

ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, अण्णा भाऊ यांच्या साहित्यामधील मानवतावादी सूत्रे ही प्रेरक स्वरुपाची आहेत. महाराष्ट्राच्या उभारणीची सुधारणावादी दृष्टी त्यांनी आपले साहित्य व कार्यातून दिली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी अण्णा भाऊ साठे यांची चरित्रपुस्तिका अध्यासनामार्फत तयार करण्यात यावी. तसेच, त्यांच्या साहित्यावर निर्माण झालेल्या चित्रपटांचे संकलनाचे कामही हाती घ्यावे, असे आवाहन यावेळी केले.

अध्यासनाचे समन्वयक डॉ. अक्षय सरवदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रभंजन माने यांनी आभार मानले.

शोषितांचे महाकाव्य लिहीणारा महान मानवतावादी

अण्णा भाऊ साठे हे शोषित, उपेक्षित, वंचितांच्या रक्त, अश्रू व घाम यांवर महाकाव्य लिहीणारे महान मानवतावादी साहित्यिक होते, असे ज्येष्ठ विचारवंत डॉ. शरद गायकवाड म्हणाले. उद्घाटन सत्रानंतर झालेल्या परिसंवादामध्ये ते बोलत होते. गायकवाड म्हणाले, भय, भूक, दारिद्र्य, अज्ञान आणि गुलामी या सर्व प्रकारे शोषण करणाऱ्यांचे अण्णा भाऊ कर्दनकाळ होते. देहूच्या तुकारामांनी सोळाव्या शतकात एक तुकाराम गाथा लिहीली, तर कुसाबाहेरच्या या आधुनिक तुकारामाने बारा बलुतेदारांची, भटक्या-विमुक्तांची बहुजन गाथा लिहीली. यावेळी सचिन साठे यांनी अण्णा भाऊंनी गोरगरीबांच्या बाजूने लेखन केले, असे सांगितले. डॉ. धनाजी साठे यांनी अण्णा भाऊंचे साहित्य माणसाला दिशा देणारे ठरले, असे सांगितले, तर डॉ. उत्तम सकट यांनी अण्णा भाऊंनी आपल्या समग्र साहित्यामध्ये बहुजन समाजाला सामावून घेतल्याचे सांगितले.