Saturday, 30 April 2016

अपयशाबरोबर यशाचेही विश्लेषण करणे महत्त्वाचे: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे



शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती पुरस्कारांचे जत येथे वितरण

विज्ञान विद्याशाखेमधून ग्रामीण भागासाठीचा शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती पुरस्कार कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते स्वीकारताना जत येथील राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.वाय. होनगेकर.

कोल्हापूर, दि. ३० एप्रिल: अपयशाचे विश्लेषण करणे हे ठीकच आहे, पण यशाचेही विश्लेषण करण्याची सवय लावल्यास खऱ्या अर्थाने प्रगतीकडे वाटचाल करता येते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल जत (जि. सांगली) येथे केले. जत येथील राजे रामराव महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे होते.
विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळविण्यात बाजी मारल्याबद्दल विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे अभिनंदन करून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, आपण यशस्वी झाला आहात, त्या यशाचे विश्लेषण करणे अधिक महत्त्वाचे आहे. यश हे सावलीसारखे आहे. आपण काम करीत राहा, यश आपोआप तुमच्या मागे येत राहील. तुम्ही यशाच्या मागे धावू लागलात, तर मात्र ते केवळ तुमची दमछाक करते. या यशरुपी सावलीला नित्य आपल्या पाठीशी राखण्यासाठी नेहमी प्रकाशाच्या दिशेने चालत राहा; प्रकाशयात्री व्हा. यश आणि विवेक यांचा थेट संबंध असल्याने विवेक कधीही सोडू नका, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अभयकुमार साळुंखे म्हणाले, समाज सुसंस्कृत व सुजाण करण्याच्या सकारात्मक भावनेतून कार्यरत राहणे खूप महत्त्वाचे आहे. सामाजिक दायित्वाची भावना त्यातूनच प्रबळ होत असते. शिवाजी विद्यापीठाचा चारा व धान्य वाटपाचा उपक्रम हे त्याचेच द्योतक आहे. अशी बांधिलकी विद्यार्थ्यांत विकसित करण्याची जबाबदारी शिक्षकांसह प्रत्येक जबाबदार घटकावर आहे.
या प्रसंगी बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कारप्राप्त महाविद्यालयांच्या वतीने प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील, प्राचार्य डॉ. विक्रम पाटील, प्राचार्य डॉ. प्रकाश हेरेकर यांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली.
यावेळी राजे रामराव महाविद्यालयाच्या 'राम-विजय' या वार्षिकांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. एस.वाय. होनगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
दरम्यान, कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते सन २०१५-१६च्या शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी शहरी, निमशहरी व ग्रामीण महाविद्यालये या गटांतून विद्याशाखानिहाय गुणानुक्रमे प्रथम आलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. हे पुरस्कार विजेते विद्याशाखानिहाय आणि अनुक्रमे शहरी, निमशहरी व ग्रामीण या क्रमाने (कंसात प्राचार्य) पुढीलप्रमाणे-
कला विद्याशाखा- द न्यू कॉलेज, कोल्हापूर (प्राचार्य डॉ.एन.व्ही. नलवडे), शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स ॲन्ड कॉमर्स ॲन्ड डी.एस. कदम सायन्स कॉलेज, गडहिंग्लज (प्राचार्य डॉ. एस.आर. कोतमिरे), श्रीपतराव चौगुले आर्ट्स ॲन्ड कॉमर्स कॉलेज, माळवाडी-कोतोली, ता. पन्हाळा (प्राचार्य डॉ. महाजन).
वाणिज्य विद्याशाखा- विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर (प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील), श्री व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी (डॉ. बी.ए. खोत), देवचंद कॉलेज, अर्जुननगर, ता. कागल (प्राचार्य डॉ. प्रकाश हेरेकर).
विज्ञान विद्याशाखा- यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा (प्राचार्य डॉ. के.जी. कानडे), डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज (प्राचार्य डॉ. एम.आर. पाटील), राजे रामराव महाविद्यालय, जत (प्राचार्य डॉ. एस.वाय. होनगेकर).
अभियांत्रिकी विद्याशाखा- कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सातारा (प्राचार्य डॉ. विक्रम पाटील), डीकेटीईज् टेक्स्टाईल ॲन्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, सांगली (प्राचार्य डॉ. पी.व्ही. कडोले), कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूर (प्राचार्य डॉ. व्ही.व्ही. कार्जिनी).
शिक्षणशास्त्र विद्याशाखा- महावीर महाविद्यालय, कोल्हापूर (प्राचार्य डॉ. आर.पी. लोखंडे), कर्मवीर हिरे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ॲन्ड एज्युकेशन महाविद्यालय, गारगोटी (प्राचार्य डॉ. आर.एस. कांबळे).
विधी विद्याशाखा- शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर (प्राचार्य डॉ. आर. नारायणा).

शिवाजी विद्यापीठाकडून दुष्काळग्रस्तांना ५७ क्विंटल धान्य, तीन ट्रक चारा






कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडून चार गावांत प्रत्यक्ष मदत वाटप

कोल्हापूर, दि. ३० एप्रिल: शिवाजी विद्यापीठाने आपल्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती देताना विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि त्यांच्या जनावरांसाठी सुमारे ५७ क्विंटल धान्य आणि तीन ट्रक चाऱ्याचे वितरण काल केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल दिवसभर आपल्या प्रशासकीय सहकाऱ्यांसह सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त आटपाडी आणि जत तालुक्यांची पाहणी करण्याबरोबरच चार गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मदतीचे वाटप केले.
कोणत्याही संकटाच्या वा आणीबाणीच्या प्रसंगी शिवाजी विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपला खारीचा वाटा उचलण्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. यंदाही दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यापीठाने विद्यार्थी कल्याण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून संलग्नित महाविद्यालयांना मदतीसाठी आवाहन केले होते. तसेच, विद्यापीठ परिसरातही गवत व चारा संकलन केले होते. या माध्यमातून गहू, तांदूळ इत्यादी सुमारे ५७ क्विंटल धान्य गोळा झाले. तसेच, सुमारे तीन ट्रक चाराही जमा झाला. या सर्व मदतीचे काल, शुक्रवारी (दि. २९ एप्रिल) कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते चार गावांमध्ये प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड होते. जत येथे शिवाजी विद्यापीठाकडून आलेल्या चाऱ्यांच्या ट्रकचे स्वागत विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते तडवळे (ता. आटपाडी) येथील ४५० कुटुंबांना सुमारे २२ क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले. माडगुळे (ता. आटपाडी) येथील १०० कुटुंबे आणि त्यांची जनावरे यांच्यासाठी १० क्विंटल धान्य व १० क्विंटल सरकी पेंड देण्यात आली. वज्रवाड (ता. जत) येथील १०० कुटुंबे व त्यांच्या जनावरांसाठी १० क्विंटल धान्य व २ ट्रक चारा-गवत देण्यात आले. खिलारवाडी (ता. जत) येथील ५० कुटुंबे व त्यांच्या जनावरांसाठी ५ क्विंटल धान्यासह १ ट्रक चारा देण्यात आला.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. एस.आर. कारंडे, प्राचार्य डॉ. बी.एन. पवार, राष्ट्रीय सेवा योजना सांगली जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. सदाशिव मोरे, राजे रामराव महाविद्यालय, जत येथील कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र लवटे, डॉ. संगीता पाटील तसेच संबंधित तडवळे, माडगुळे, वज्रवाड, खिलारवाडी येथील सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न: कुलगुरू डॉ. शिंदे
दुष्काळग्रस्त भागातील बांधवांना थोडा दिलासा देण्याचा शिवाजी विद्यापीठाचा हा प्रयत्न आहे. समाजाचे ऋण फेडण्याची भावना त्यामागे आहे. या कठीण प्रसंगी शिवाजी विद्यापीठ, संलग्नित महाविद्यालये हा सारा परिवार त्यांच्यासोबत असल्याची भावना वृद्धिंगत करण्याबरोबरच सामाजिक नाळ घट्ट करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे, अशी भावना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली. या उपक्रमासाठी सक्रिय योगदान देणाऱ्या महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध समाजघटकांचेही कुलगुरूंनी आभार मानले.

Wednesday, 27 April 2016

समाजाभिमुख दृष्टीकोन विकसित करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे मोलाचे योगदान: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे



शिवाजी विद्यापीठाच्या सन २०१५-१६ उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन एकक तथा कार्यक्रम अधिकारीम्हणून कोल्हापूर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारताना डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा, कोल्हापूर या महाविद्यालयाचे प्रा. प्रमोद डी. चौगुले व मान्यवर.
कोल्हापूर, दि. २७ एप्रिल: विद्यार्थ्यांत समाजाभिमुख दृष्टीकोन विकसित करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन.एस.एस.) मोठे योगदान असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीत एन.एस.एस.ने अधिक सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे सन २०१५-१६मधील विद्यापीठस्तरीय पुरस्कार वितरण व सन २०१६-१७ची कार्यनियोजन बैठक असा संयुक्त कार्यक्रम विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. 

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, केंद्र सरकार व राज्य शासन यांनी व्यापक सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातून अनेक अभिनव आणि महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये मतदार जागृती व नोंदणी, जन-धन योजना, डिजीटल इंडिया, जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत, व्यसनमुक्ती अभियान आदींचा समावेश आहे. त्यांच्यासंदर्भात समाजात जागृती करणे, त्यांना सदर उपक्रम राबविण्यासाठी प्रेरित करणे अशी कामे एनएसएसच्या माध्यमातून अधिक उत्तम प्रकारे करता येतील. त्यासाठी शिक्षक, विद्यार्थी यांनी एनएसएसच्या माध्यमातून काम करणे अपेक्षित आहे.
छोट्या-छोट्या गोष्टींतून देशसेवा शक्य आहे, हे एनएसएससारख्या उपक्रमांतून सिद्ध झाले आहे. या सर्व उपक्रमांकडे सकारात्मकपणे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाच्या सर्व स्तरांत निर्माण होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या श्रमशक्तीच्या बळावर या जगात अशक्य असे काहीही नाही, याची प्रचिती एनएसएसच्या उपक्रमांतून येते; तसेच, भरीव कार्याची उभारणी या माध्यमातून होते, असे गौरवोद्गार काढले.
या प्रसंगी केआयटी महाविद्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ एनएसएस संकेतस्थळाचे कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हे संकेतस्थळ निर्माण करणाऱ्या टीमचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठ स्तरीय तसेच कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा स्तरीय एनएसएस महाविद्यालयीन एकक, कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक व स्वयंसेविका यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट असे सत्काराचे स्वरुप होते.
एनएसएसचे कार्यक्रम समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सह-समन्वयक डॉ. सुरेश शिखरे यांनी आभार मानले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्यासह एनएसएसचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. डी.जी. चिघळीकर, सांगली जिल्हा समन्वयक डॉ. सदाशिव मोरे, सातारा जिल्हा समन्वयक डॉ. एस.एन. जाधव आणि महाविद्यालयांचे प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त मान्यवर व महाविद्यालयांची यादी पुढीलप्रमाणे-



Tuesday, 26 April 2016

लोकशाहीच्या प्रगल्भतेमध्ये मतदारांची कळीची भूमिका: प्रा. परिमल




 
शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना एम.आय.टी.चे आशिष लाल. व्यासपीठावर प्रा.डॉ.वासंती रासम, प्रा.डॉ.प्रकाश पवार, प्रा.परिमल माया सुधाकर, मनिष केळकर प्रा. कल्पना दीक्षित.

कोल्हापूर, दि. २६ एप्रिल: भारतीय निवडणूक प्रक्रियेत मतदार हे सातत्याने कळीची भूमिका बजावतात. त्यांच्या जागरुकतेमुळेच निवडणुकांचा कौल दरवेळी वेगळा असला तरी लोकशाही प्रगल्भ बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन प्रा. परिमल माया सुधाकर यांनी आज येथे केले.
एम.आय.टी. पुणे, शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र आधिविभाग तसेच श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'भारतातील सद्य:राजकीय परिस्थिती आणि उदयोन्मुख संधी' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आज पार पडली. या परिषदेत ते बोलत होते.
'भारतातील निवडणूक, राजकारणाचे बदलते स्वरुप' या विषयावर बोलताना प्रा. परिमल म्हणाले, भारतातील निवडणुकांमध्ये सातत्य, स्थिरता नसून ती सातत्याने मतदाराच्या कौलावर अवलंबून असतात. केंद्रीय पातळीवरील निवडणका प्रादेशिक पातळीवरील निवडणुकांचा कौल वेगवेगळा असतो. याचा अर्थ मतदारांत संभ्रम आहे, असा नाही; तर, प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या परिस्थितीची आणि त्याठिकाणी आवश्यक असणाऱ्या नेतृत्वाबद्दल त्याच्या अपेक्षांची, आशाआकांक्षांची त्यांना जाणीव आहे. हेच यातून अधोरेखित होते. त्यामुळेच भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही मानले जाते. मतदार जागरुक असून वेळोवेळी योग्य त्या पक्षाला त्यांनी पाठिंबा दिल्याचे दिसून येते.
प्रा. वासंती रासम म्हणाल्या, भारताच्या राजकारणाचे स्वरुप झपाटयाने बदलत असल्यामुळे हिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांची संख्या वाढत आहे. तसेच निवडणुकांमध्ये समाज माध्यमाचा वापर मोठया प्रमाणात होत असून निवडणूक प्रक्रिया व्यावसायिकांकडून हाताळली जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामाजिकशास्त्र, विधी, व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांना या निवडणूक प्रक्रियांमध्ये होणाऱ्या बदलांचा उपयोग आपल्या करिअरसाठी हो शकतो.
दुसऱ्या सत्रामध्ये राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. प्रकाश पवार यांनी पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, पाँडिचेरी या चार राज्यांतील निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय सामाजीकरण, इतिहास, संस्कृती, आणि बदलत्या राजकीय वातावरणासंदर्भात विश्लेषण केले. दक्षिण राज्यांमध्ये भाजप हिंदुत्ववादावर नव्हे, तर आर्थिक विकासावर भर देत असल्यामुळे बहुमत नाही मिळाले, तरी मताची टक्केवारी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्ती केली.
प्रा. मनिष केळकर यांच्या मते, निवडणुकांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे राज्यशास्त्र सामाजिक शास्त्रांतील विद्यार्थ्यांना या निवडणुकींच्या बदलत्या स्वरुपामुळे अनेक रोजगार संधी उपलब्ध होतील. राजकीय नेतृत्व, राजकीय विश्लेषक, राजकीय सल्लागार, प्रचार सभा संयोजक, निवडणूक कार्यक्रम आयोजक, वैयक्तिक सल्लागार, निवडणुकीचे व्हेंट मॅनेजमें शा अनेक संधी उदयोन्मुख युवकांना उपलब्ध असल्याचे सांगितले.
या कार्यशाळेच्या सुरवातीला एम.आय.टी.च्या आशिष लाल यांनी स्वागत केले. डॉ. रविंद्र भणगे यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठ परिसरातील सामाजिकशास्त्र, वाणिज्य व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.