Wednesday, 29 June 2022

शिवाजी विद्यापीठाकडून कानपूर विद्यापीठास राजर्षी शाहू चरित्रग्रंथ भेट

 

डॉ. जयसिंगराव पवार लिखित राजर्षी शाहू चरित्रग्रंथाचा हिंदी अनुवाद ग्रंथ कानपूरच्या छत्रपती शाहू जी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विनयकुमार पाठक यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने भेट देताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती. शेजारी (डावीकडे) शिवाजी विद्यापीठाचे प्रा. अविनाश भाले. 


नवसंबंधांची अनोखी सुरवात; शाहू जयंतीला प्रा. अविनाश भाले प्रमुख बीजभाषक

कोल्हापूर, दि. २९ जून: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने येथील शिवाजी विद्यापीठ आणि कानपूर (उत्तर प्रदेश) येथील छत्रपती शाहू जी महाराज युनिव्हर्सिटी यांच्यातील सहसंबंधांची एक अनोखी सुरवात झाली. शिवाजी विद्यापीठातील सामाजिक वंचितता व समावेशक धोरण केंद्रातील प्रा. अविनाश भाले यांना कानपूर विद्यापीठाने शाहू जयंतीच्या मुख्य कार्यक्रमात बीजभाषक म्हणून विशेष आमंत्रित केले. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कानपूर विद्यापीठास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित व हिंदी अनुवादित शाहू चरित्र ग्रंथ भेट देण्यात आला. कानपूरच्या विद्यापीठात दाखल झालेले हिंदीमधील हे पहिलेच शाहू चरित्र ठरले. त्याबद्दलची कृतज्ञता कुलगुरू प्रा. विनयकुमार पाठक यांनी जाहीररित्या व्यक्त केली.

१०२ वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराज कानपूर येथे आले असता त्यांच्या कर्तृत्वाने व वाणीने प्रभावित झालेल्या कानपूरच्या जनतेने महाराजांना राजर्षी ही उपाधी बहाल करून त्यांचा गौरव केला. त्या कानपूरमध्ये राजर्षींच्या नावे असणाऱ्या विद्यापीठाशी स्नेहबंधांचा एक नवा अध्याय आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या साक्षीने शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू होतो आहे.

कानपूर येथील छत्रपती शाहू जी महाराज विद्यापीठात स्कूल ऑफ आर्ट्स ह्युमॅनिटी आणि सोशल सायन्सेसतर्फे आयोजित शाहू जयंतीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती होते, तर प्रा. अविनाश भाले हे बीजभाषक अर्थात प्रमुख वक्ते होते. आपल्या बीजभाषणात प्रा. भाले यांनी शाहूंची राजवट स्वतंत्र भारतासाठी आदर्श ठरली आणि त्यांनी राबवलेली समावेशक धोरणे आणि योजना आजही देशास मार्गदर्शक असल्याचे सांगितले. शाहू महाराजांची सामाजिक धोरणे, आर्थिक धोरणे, शैक्षणिक धोरणे याबाबत मांडणी करता शाहू महाराजांची सामाजिक, आर्थिक शैक्षणिक क्षेत्रांतील समावेशी धोरणे ही त्यांच्या कुशल राज्यकारभाराचे मूळ आहे, अशी मांडणी त्यांनी केली. ती उपस्थितांना खूपच भावली. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कानपूर विद्यापीठास डॉ.जयसिंगराव पवार लिखित राजर्षी शाहू चरित्रग्रंथाचा हिंदी अनुवाद भेट देण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले छत्रपती शाहू महाराजांचे वंशज त्यांचे नातू व माजी राज्यसभा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी त्यांच्या ट्रस्टच्या वतीने विधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली. कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि कानपूर विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करून दोन विद्यापीठे आणि शहरे जोडण्याचा प्रस्तावही त्यांनी या प्रसंगी मांडला. या कार्यक्रमात कुलपती आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल ऑनलाइन सहभागी झाल्या. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांनी सामाजिक कुप्रथा निर्मूलनासाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.

कुलगुरू प्रा. विनयकुमार पाठक यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जातिवाद, प्रादेशिकता, धर्मवाद यावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. डॉ.पतंजली मिश्रा यांनी चर्चासत्राची रूपरेषा मांडली आणि डॉ.मानस उपाध्याय यांनी संचालन केले. कुलसचिव डॉ.अनिलकुमार यादव यांनी आभार मानले.

Sunday, 26 June 2022

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती

शिवाजी विद्यापीठात उत्साहात

 

शिवाजी विद्यापीठात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करताना मान्यवर.

शिवाजी विद्यापीठात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करताना मान्यवर आणि उपस्थित.

कोल्हापूर, दि. २६ जून: शिवाजी विद्यापीठात आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये सकाळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार प्रमुख उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार, डॉ. भारती पाटील, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. अवनिश पाटील, डॉ. भारतभूषण माळी, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. पी.एन. वासंबेकर, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. देविकाराणी पाटील, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. सोमनाथ पवार, 'कास्ट्राईब'चे आनंद खामकर आदींसह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर मान्यवरांनी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्र येथेही महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.

Thursday, 23 June 2022

शिवाजी विद्यापीठात न्यूज अँकरिंग कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

न्यूज अँकरसाठी शुद्ध भाषेबरोबरच आकलन क्षमता महत्त्वाची: चेतन मिठारी, पल्लवी गोखले यांचे मत

शिवाजी विद्यापीठात न्यूज अँकरिंग कार्यशाळेत मार्गदर्शन करताना एस न्यूजचे प्रोग्रामिंग कॉर्डिनेटर चेतन मिठारी आणि न्यूज अँकर पल्लवी गोखले. समोर कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी. (छाया :अभिजीत गुर्जर)


शिवाजी विद्यापीठात न्यूज अँकरिंग कार्यशाळेत मार्गदर्शन करताना एस न्यूजचे प्रोग्रामिंग कॉर्डिनेटर चेतन मिठारी आणि न्यूज अँकर पल्लवी गोखले. समोर कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी. (छाया :अभिजीत गुर्जर)




कोल्हापूर, दि. २३ जून: न्यूज अँकर होण्यासाठी आवाज कमवावा लागतो. शुद्ध भाषा आणि स्पष्ट उच्चार हवेत. समयसूचकता आणि घटनांचे उत्तम आकलन असेल तर चांगला न्यूज अँकर घडू शकतो, असे मत एस न्यूजचे प्रोग्रॅम कॉर्डिनेटर चेतन मिठारी आणि न्यूज अँकर पल्लवी गोखले यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग गो.जाधव पत्रकारिता अध्यासन आणि तिटवे (ता. राधानगरी) येथील वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या एक दिवसीय न्यूज अँकर कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. अध्यासनाच्या नवीन इमारतीत झालेल्या या कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला. अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. दिग्विजय कुंभार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
चेतन मिठारी आणि पल्लवी गोखले या दोघांनीही विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. बातमी वाचायची कशी? आवाजातला चढ-उतार, प्रसंगावधान, कॅमेऱ्यासमोर नेमकं बोलायचं कसं? आदीचा डेमो त्यांनी स्वतः करून दाखवला. विविध प्रकारच्या बातम्यांचे निवेदन करत असताना वृत्त निवेदकाच्या भाव भावनांचे प्रतिबिंब निवेदकाच्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने उमटते, याविषयीचे प्रात्यक्षिक त्यांनी केले. विद्यार्थ्यांकडून त्यांनी बातम्या वाचून घेतल्या. कॅमेरासमोर बोलताना घ्यावयाची दक्षता आणि पाळावयाचे संकेत याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. वृत्त निवेदकाची आसनव्यवस्था, लाईट, कॅमेरा अँगल यासह अन्य अनेक तपशील त्यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
वृत्तवाहिन्यांवर वृत्त देण्यासाठी स्पर्धा असली तरी वृत्त निवेदकाने घाई करून चालत नाही. बातम्या सर्वसामान्य लोकांना समजतील अशा भाषेमध्ये सादर केल्या पाहिजेत. लोक व्यवहारातील प्रचलित शब्द आणि बोलीभाषेचा  वापर करत बातमी अधिक सोपी करून सांगण्याची कला वृत्तनिवेदकाने अवगत केलेली असली पाहिजे. बातम्या देत असताना व्यक्तिगत मते आणि भूमिकांना त्यामध्ये कोणतेही स्थान असत नाही.तटस्थपणे माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कौशल्य वृत्तनिवेदकाकडे असायला हवे, असे मतही यावेळी पल्लवी गोखले यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेत पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांबरोबरच अनेक पत्रकार, युट्यूबर्स तसेच डिजिटल माध्यमात काम करणारे पत्रकार उपस्थित होते. 

Tuesday, 21 June 2022

शिवाजी विद्यापीठात योग दिन उत्साहात

 

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे रोपट्यास पाणी वाहून उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग सराव करताना (उजवीकडून) शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील.
शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात सहभागी झालेले वरिष्ठ अधिकारी. 


शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात मोठ्या संख्येने सहभागी झालेले योगसाधक


शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिला योगसाधक. 

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात सहभागी झालेले ज्येष्ठ नागरिक

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात सहभागी झालेले अधिकारी

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात सहभागी झालेले विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात मोठ्या संख्येने सहभागी झालेले योगसाधक

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग सराव प्रशिक्षणात योगसाधना करताना योगसाधक 


कोल्हापूर, दि. २१ जून: शिवाजी विद्यापीठात आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कोविड-१९च्या साथीमुळे दोन वर्षे ऑनलाईन स्वरुपात साजरा करावा लागल्यानंतर यंदा योग दिन प्रत्यक्ष साजरा करण्यात येत असल्यामुळे योगसाधकांचा उत्साह ओसंडून वाहात होता.

शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि आजीवन अध्ययन व विस्तार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी ठीक ७.२० वाजता विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जधव, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये, आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचे संचालक डॉ. ए.एम. गुरव, क्रीडा संचालक डॉ. पी.टी. गायकवाड आणि योग शिक्षक सूरज पाटील यांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून योग दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आबालवृद्ध योगसाधकांनी योग दिन उपक्रमात सहभाग घेतला. प्रशिक्षक सूरज पाटील यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली.

शिवाजी विद्यापीठाने पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनापासून विद्यापीठात दररोज सकाळी योग प्रशिक्षण शिबीर चालविले आहे. हे शिबीर सर्व समाजघटकांसाठी संपूर्णतः मोफत व मुक्त आहे. यामध्ये दररोज साधारणपणे दोनशे साधक सहभागी होतात. या शिबिराचा आठवा वर्धापनदिनही आज साजरा करण्यात आला.

दरम्यान, शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित २९३ महाविद्यालयांमध्येही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

योग प्रात्यक्षिके शिव-वार्तावर!

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी योगसाधकांना आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दीर्घायुरारोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. कोविडच्या कालखंडानंतर यंदाच्या योग दिनानिमित्त एकत्र येण्याचा आनंद वेगळा असल्याचे सांगून ते म्हणाले, योगसाधकांच्या सोयीसाठी योग प्रशिक्षक सूरज पाटील यांच्या योग प्रात्यक्षिकांचे चित्रीकरण करून ते शिवाजी विद्यापीठाच्या शिव-वार्ता या युट्यूब वाहिनीवर कायमस्वरुपी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचा सर्व योगसाधकांना निश्चितपणे लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Friday, 17 June 2022

आंतरराष्ट्रीय संबंधांवरचा 'अस्वस्थपर्व' हा महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ

 

शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र अधिविभाग आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ 
रूरल डेव्हलपमेंटच्या वतीने 'सकाळ माध्यम समूहा'चे संपादक संचालक
श्रीराम पवार लिखित 'अस्वस्थपर्वपुस्तकावर शुक्रवारी परिचर्चा झाली. 
त्याचे द्घाटन करताना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के. सोबत (डावीकडून) निखिल पंडितराव
डॉ. अशोक चौसाळकरडॉ. रोहन चौधरीडॉ. प्रकाश पवार आणि श्रीराम पवार.

'अस्वस्थपर्व' पुस्तकावरील चर्चेत बोलताना डॉ. रोहन चौधरी.

'अस्वस्थपर्व' पुस्तकावरील चर्चेत बोलताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


परिचर्चेतील सूर; श्रीराम पवार लिखित 'अस्वस्थपर्व' पुस्तकावर विद्यापीठात मंथन

कोल्हापूर, दि. १७ जून: ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्रीराम पवार लिखित 'अस्वस्थपर्व' पुस्तक आंतरराष्ट्रीय राजकारण आणि एकूणच आंतरराष्ट्रीय संबंधांवरचा समकाळातला एक महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच तो येत्या काळात मार्गदर्शक ठरेल. कारण प्रत्येक आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडींचा सामान्य माणसाच्या जगण्यावरही परिणाम होत असतो, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात झालेल्या परिचर्चा कार्यक्रमातून उमटला.

शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र अधिविभाग आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटतर्फे आज 'सकाळ माध्यम समूहा'चे संपादक-संचालक, राजकीय विश्लेषक श्रीराम पवार लिखित 'अस्वस्थपर्व' या पुस्तकावर र्वंकष मंथन झाले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. रोहन चौधरी यांनी पुस्तकाच्या अनुषंगाने विस्तृत मांडणी केली. ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर अध्यक्षस्थानी होते, तर कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

डॉ. प्रकाश पवार म्हणाले, ''वर्चस्ववादातून सुरू असलेले लष्करी सामर्थ्य, अर्थकारण, विज्ञान-तंत्रज्ञान आणि एकूणच देशांतर्गत आंतरराष्ट्रीय राजकारण असे चार कंगोरे पुस्तकातून प्रकर्षाने मांडले आहेत. राजकारणावर अर्थकारणाचा प्रभाव आहे. लोकशाहीच्या मूल्यांचा ऱ्हास होतो आणि बहुसंख्याकवादातून विषमता वाढीस लागत असून, हे चित्र बदलण्यासाठी आपण स्वत: काय करू शकतो, असा प्रश्न विचारणारी स्पष्ट भूमिका त्यातून घेतलेली दिसते.''

डॉ. रोहन चौधरी म्हणाले, ''आंतरराष्ट्रीय संबंधांवर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक मिळत नसल्याच्या परिस्थितीत 'अस्वस्थपर्व' या पुस्तकामुळे हा विषय सामान्यांपर्यंत पोचला आहे. प्रत्येक घटना-घडामोडींवर पुस्तकातून अगदी सूक्ष्म पातळीवरची अभ्यासपूर्ण मांडणी झाली असून, येत्या काळात अधिकाधिक सामान्य लोकांपर्यंत हा विषय पोचवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत.''

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, ''श्री. पवार यांच्य पुस्तकातील प्रत्येक प्रकरण 'पीएच. डी.'च्या शोधप्रबंधाचा विषय आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणावर राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र विभागात गटचर्चा व्हायला हवी.''

अध्यक्षीय मनोगतात डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, ''शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्याशाखेतून पत्रकारितेची पदवी घेतलेल्या श्रीराम पवार यांची आज आंतरराष्ट्रीय राजकारणाचा तटस्थपणे; पण ठाम भूमिका घेऊन लिहिणारे राजकीय विश्लेषक अशी देशभरात ओळख आहे, ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद आहे. त्यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण संवादाच्या शैलीमुळे सामान्य माणसालाही ते सहज समजते. विशेष म्हणजे प्रत्येक लेखातून ते सर्वांनाच अंतर्मुख व्हायला भाग पाडतात.''

संपादक-संचालक श्रीराम पवार म्हणाले, ''गेल्या काही वर्षांतील एकूणच जागतिक घडामोडींचा वेध घेतल्यास जगाच्या इतिहासाला वेगळे वळण मिळाले आहे. लोकशाहीवादी राष्ट्रे आणि एकाधिकारशाहीला प्रोत्साहन देणारी राष्ट्रे अशी सरळ-सरळ दोन भागांत जगाची विभागणी झाली. त्यातून निर्माण झालेल्या वर्चस्ववादातून अनेक प्रकारचे ताण निर्माण होत आहेत आणि त्याचा जगभरातील सामान्य माणसाच्या जगण्यावरही परिणाम होतो. या साऱ्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे.''

'सकाळ'चे निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ''आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करण्यासारखा क्लिष्ट विषय 'अस्वस्थपर्व' पुस्तकातून अत्यंत सोप्या द्धतीने मांडला गेला आहे. मराठी भाषेतून हा वेध घेताना श्रीराम पवार यांची आता राष्ट्रीय पातळीवरील राजकीय विश्लेषक म्हणून ओळख निर्माण झाली. जगात कुठेही एखादी घटना घडली तर त्याचा सामान्य माणसावरही परिणाम होतो, याची जाणीव या पुस्तकामुळे आता प्रत्येकाला झाली आहे.''

राज्यशास्त्र अधिविभागाचे डॉ. सुखदेव उंदरे नेहा वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जयश्री कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यशवंतराव चव्हाण रूरल डेव्हलपमेंट स्कूलचे डॉ. नितीन माळी यांनी आभार मानले.