शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. शिवाजी जाधव |
कोल्हापूर, दि. ६
जून: वाढते पर्यटन आणि
आधुनिकीकरणाच्या नादात पन्हाळगडाचे ऐतिहासिक महत्त्व नजरेआड होणे क्लेशकारक आहे,
असे प्रतिपादन येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील इतिहासाचे अभ्यासक डॉ.
शिवाजी जाधव यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या वतीने शिवस्वराज्य दिनाच्या
निमित्ताने डॉ. जाधव यांचे ‘पन्हाळगडाचा
इतिहास’ या विषयावर विशेष
व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व
प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. शिवाजी जाधव यांनी आपल्या व्याख्यानात पन्हाळगडाचा साद्यंत इतिहास
उपस्थितांना सांगितला. पन्हाळगडाच्या इतिहासाचे अनेक नवे पैलू त्याद्वारे सामोरे
आले. संरक्षणासह राजकीय तसेच प्रशासकीय दृष्ट्या पन्हाळगड हा इतिहासात नेहमीच
महत्त्वाचा ठरल्याचे सांगून ते म्हणाले, इसवी सन १७३५मधील ‘करवीरमहात्म्या’त पन्नगालय या नावाने पन्हाळ्याची
नोंद आढळते. त्यापुढील कालखंडात राष्ट्रकुट, मुस्लीम राजवट, औरंगजेब आदींनी तेथे
राज्य केले. दुसरा भोज या शिलाहार राजाने आपली राजधानी म्हणून पन्हाळगडास निवडले
आणि पन्हाळ्यास मोठे महत्त्व तेव्हापासून प्राप्त झाले. कोल्हापूर विभागात
अणुस्कुरा, आंबा, आंबोली आदी घाट येऊन मिळतात. त्याद्वारे कोकणशी आणि तेथून बाहेर
असा व्यापार चाले. या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या व्यवहार व केंद्रांवर नजर
ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य पन्हाळा करीत होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी
महाराजांनाही आदिलशाहीच्या कोकणमार्गे सुरू असलेल्या व्यापारावर नियंत्रण प्राप्त
करण्यासाठी रांगणा, पन्हाळा, विशाळगड हे किल्ले महत्त्वाचे वाटले आणि त्यांनी ते
आपल्या ताब्यात घेतले. पन्हाळ्यास तर मराठ्यांच्या दक्षिणेकडील राजधानीचा दर्जा
प्राप्त झाला. छत्रपती संभाजी महाराज यांचाही बराचसा अधिवास हा पन्हाळ्यावर झाला.
त्याचप्रमाणे त्यांनी संगमेश्वराकडील अखेरचा प्रवास पन्हाळ्यापासूनच सुरू केल्याने
त्यांच्या जीवनचरित्रातही पन्हाळ्याचे मोठे महत्त्व आहे.
मोंगल-मराठा संघर्षातही पन्हाळगडच केंद्रस्थानी असल्याचे सांगून डॉ. जाधव
म्हणाले, महाराणी ताराराणी यांच्या राजधानीचे ठिकाण म्हणून या कालखंडात पन्हाळ्यास
मोठे महत्त्व आले. ते त्यांनी कोल्हापुरास राजधानी हलवेपर्यंत कायम राहिले. १८४४मध्ये
गडकऱ्यांचे बंड या विभागात घडून आले. या बंडाने भारतीय जनतेला ब्रिटीशांविरुद्ध
लढण्याची प्रेरणा दिली. मात्र, या बंडात पन्हाळ्यासह परिसरातील किल्ल्यांची
ब्रिटीशांनी मोठी नासधूस केली. या विभागातील किल्ल्यांचे महत्त्व लक्षात घेऊनच
ब्रिटीशांनी त्यांच्याकडे आपली वक्रदृष्टी वळविलेली होती. राजर्षी छत्रपती शाहू
महाराजांनी या परिसरात चहाच्या लागवडीचा प्रयोग केला. तो पुढे फारसा टिकला नसला
तरी त्या काळात ‘पन्हाळा
चहा-४’ हा इंग्लंडच्या राणीचा
आवडता होता. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचीही पसंती त्याला लाभली होती.
पन्हाळ्याची अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत, जी आपण जपण्यास प्राधान्य द्यायला हवे.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी डॉ. जाधव यांच्या सप्रमाण विषय
मांडणीचे कौतुक केले. ते म्हणाले, एखाद्या किल्ल्याची अतिशय साद्यंत माहिती कशी
सादर करावी, याचा वस्तुपाठ डॉ. जाधव यांनी दिला आहे. अत्यंत अभ्यासपूर्ण स्वरुपाचे
विवेचन त्यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यात चौदा किल्ले आहेत. इतिहास अधिविभागाने
त्यांच्या माहितीचे संकलन करावे आणि त्यांच्याविषयी छोटे-छोटे माहितीपटही तयार
करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी केले, तर दत्तात्रय मचाले यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment