Wednesday 29 June 2022

शिवाजी विद्यापीठाकडून कानपूर विद्यापीठास राजर्षी शाहू चरित्रग्रंथ भेट

 

डॉ. जयसिंगराव पवार लिखित राजर्षी शाहू चरित्रग्रंथाचा हिंदी अनुवाद ग्रंथ कानपूरच्या छत्रपती शाहू जी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विनयकुमार पाठक यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने भेट देताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती. शेजारी (डावीकडे) शिवाजी विद्यापीठाचे प्रा. अविनाश भाले. 


नवसंबंधांची अनोखी सुरवात; शाहू जयंतीला प्रा. अविनाश भाले प्रमुख बीजभाषक

कोल्हापूर, दि. २९ जून: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने येथील शिवाजी विद्यापीठ आणि कानपूर (उत्तर प्रदेश) येथील छत्रपती शाहू जी महाराज युनिव्हर्सिटी यांच्यातील सहसंबंधांची एक अनोखी सुरवात झाली. शिवाजी विद्यापीठातील सामाजिक वंचितता व समावेशक धोरण केंद्रातील प्रा. अविनाश भाले यांना कानपूर विद्यापीठाने शाहू जयंतीच्या मुख्य कार्यक्रमात बीजभाषक म्हणून विशेष आमंत्रित केले. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कानपूर विद्यापीठास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित व हिंदी अनुवादित शाहू चरित्र ग्रंथ भेट देण्यात आला. कानपूरच्या विद्यापीठात दाखल झालेले हिंदीमधील हे पहिलेच शाहू चरित्र ठरले. त्याबद्दलची कृतज्ञता कुलगुरू प्रा. विनयकुमार पाठक यांनी जाहीररित्या व्यक्त केली.

१०२ वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराज कानपूर येथे आले असता त्यांच्या कर्तृत्वाने व वाणीने प्रभावित झालेल्या कानपूरच्या जनतेने महाराजांना राजर्षी ही उपाधी बहाल करून त्यांचा गौरव केला. त्या कानपूरमध्ये राजर्षींच्या नावे असणाऱ्या विद्यापीठाशी स्नेहबंधांचा एक नवा अध्याय आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या साक्षीने शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू होतो आहे.

कानपूर येथील छत्रपती शाहू जी महाराज विद्यापीठात स्कूल ऑफ आर्ट्स ह्युमॅनिटी आणि सोशल सायन्सेसतर्फे आयोजित शाहू जयंतीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती होते, तर प्रा. अविनाश भाले हे बीजभाषक अर्थात प्रमुख वक्ते होते. आपल्या बीजभाषणात प्रा. भाले यांनी शाहूंची राजवट स्वतंत्र भारतासाठी आदर्श ठरली आणि त्यांनी राबवलेली समावेशक धोरणे आणि योजना आजही देशास मार्गदर्शक असल्याचे सांगितले. शाहू महाराजांची सामाजिक धोरणे, आर्थिक धोरणे, शैक्षणिक धोरणे याबाबत मांडणी करता शाहू महाराजांची सामाजिक, आर्थिक शैक्षणिक क्षेत्रांतील समावेशी धोरणे ही त्यांच्या कुशल राज्यकारभाराचे मूळ आहे, अशी मांडणी त्यांनी केली. ती उपस्थितांना खूपच भावली. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कानपूर विद्यापीठास डॉ.जयसिंगराव पवार लिखित राजर्षी शाहू चरित्रग्रंथाचा हिंदी अनुवाद भेट देण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले छत्रपती शाहू महाराजांचे वंशज त्यांचे नातू व माजी राज्यसभा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी त्यांच्या ट्रस्टच्या वतीने विधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली. कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि कानपूर विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करून दोन विद्यापीठे आणि शहरे जोडण्याचा प्रस्तावही त्यांनी या प्रसंगी मांडला. या कार्यक्रमात कुलपती आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल ऑनलाइन सहभागी झाल्या. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांनी सामाजिक कुप्रथा निर्मूलनासाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.

कुलगुरू प्रा. विनयकुमार पाठक यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जातिवाद, प्रादेशिकता, धर्मवाद यावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. डॉ.पतंजली मिश्रा यांनी चर्चासत्राची रूपरेषा मांडली आणि डॉ.मानस उपाध्याय यांनी संचालन केले. कुलसचिव डॉ.अनिलकुमार यादव यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment