ब्राझील येथे झालेल्या डिफ ऑलिंपिकमध्ये जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी शिवाजी विद्यापीठाची विद्यार्थिनी सुबिया मुल्लाणी हिला स्मृतिचिन्ह व मदतनिधी प्रदान करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. |
राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या महिला फुटबॉल संघाचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत डॉ. पी.टी. गायकवाड, मृणाल खोत, प्रकाश कावले, नीळकंठ कांबळे आदी. |
विद्यापीठातर्फे ५० हजारांचा
मदतनिधी सुपूर्द;
महिला फुटबॉलपटूंचाही गौरव
कोल्हापूर, दि. १७
जून: शिवाजी विद्यापीठाची जलतरणपटू सुबिया मुल्लाणी हिने
ब्राझील येथे झालेल्या डिफ ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले, ही बाब विद्यापीठ
परिवारासाठी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज
येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागात आज विद्यापीठाची ऑलिंपिकपटू सुबिया
मुल्लाणी हिच्यासह कोटा येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत द्वितिय
क्रमांक प्राप्त करून तमिळनाडूतील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला
फुटबॉल संघातील क्रीडापटूंचा सत्कार करण्यात आला.
विद्यापीठाची जलतरणपटू सुबिया मुल्लाणी हिने ब्राझील येथे झालेल्या डिफ
ऑलिंपिकमध्ये २०० मीटर बटरफ्लाय, १०० मीटर फ्रीस्टाईल या जलतरण स्पर्धांत सहभाग
घेतला. डिफ ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती विद्यापीठाची पहिली
क्रीडापटू ठरली आहे. या यशाबद्दल तिला ५० हजार रुपयांचा मदतनिधी प्रदान करून
विद्यापीठामार्फत तिचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत
होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत
उंचावणाऱ्या सुबियाला यापुढील काळातही मदत करण्याचे धोरण विद्यापीठाचे राहील. त्याचप्रमाणे
विद्यापीठाचे सर्वच क्रीडापटू सातत्याने सरावात कसे राहतील, त्यांची कार्यक्षमता
कशी वाढेल, या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत. खेळाडूंनीही त्यांचा आहार,
प्रवास, स्थानिक तसेच स्पर्धास्थळावरील सोयीसुविधा आदींविषयी त्यांचे अनुभव
विद्यापीठाला खुलेपणाने कळवावेत, जेणे करून त्यावर योग्य कार्यवाही करता येईल. त्यानंतर
या संदर्भातील धोरण सुनिश्चित करणे शक्य होईल.
या प्रसंगी क्रीडा संचालक डॉ. पी.टी. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले, तर
प्रशिक्षक प्रकाश कावले यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास विशेष प्रशिक्षक मृणाल खोत, व्यवस्थापक नीळकंठ कांबळे
यांच्यासह फुलबॉल संघातील अर्पिता पवार, सोनाली सुतार, निशा पाटील, सानिका चौगुले,
जुलेखा बिजली, सोनाली साळवी, तेजस्विनी पाटील, यशश्री देशमुख, प्रियांका मोरे,
ज्योती ढेरे, प्रेरणा गराडे, पूनम मिठारी, प्रतीक्षा मिठारी, प्रणाली चव्हाण,
भाग्यश्री कदम, शासिया पठाण या क्रीडापटू उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment