Thursday, 23 June 2022

शिवाजी विद्यापीठात न्यूज अँकरिंग कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

न्यूज अँकरसाठी शुद्ध भाषेबरोबरच आकलन क्षमता महत्त्वाची: चेतन मिठारी, पल्लवी गोखले यांचे मत

शिवाजी विद्यापीठात न्यूज अँकरिंग कार्यशाळेत मार्गदर्शन करताना एस न्यूजचे प्रोग्रामिंग कॉर्डिनेटर चेतन मिठारी आणि न्यूज अँकर पल्लवी गोखले. समोर कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी. (छाया :अभिजीत गुर्जर)


शिवाजी विद्यापीठात न्यूज अँकरिंग कार्यशाळेत मार्गदर्शन करताना एस न्यूजचे प्रोग्रामिंग कॉर्डिनेटर चेतन मिठारी आणि न्यूज अँकर पल्लवी गोखले. समोर कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी. (छाया :अभिजीत गुर्जर)




कोल्हापूर, दि. २३ जून: न्यूज अँकर होण्यासाठी आवाज कमवावा लागतो. शुद्ध भाषा आणि स्पष्ट उच्चार हवेत. समयसूचकता आणि घटनांचे उत्तम आकलन असेल तर चांगला न्यूज अँकर घडू शकतो, असे मत एस न्यूजचे प्रोग्रॅम कॉर्डिनेटर चेतन मिठारी आणि न्यूज अँकर पल्लवी गोखले यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग गो.जाधव पत्रकारिता अध्यासन आणि तिटवे (ता. राधानगरी) येथील वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या एक दिवसीय न्यूज अँकर कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. अध्यासनाच्या नवीन इमारतीत झालेल्या या कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला. अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. दिग्विजय कुंभार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
चेतन मिठारी आणि पल्लवी गोखले या दोघांनीही विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. बातमी वाचायची कशी? आवाजातला चढ-उतार, प्रसंगावधान, कॅमेऱ्यासमोर नेमकं बोलायचं कसं? आदीचा डेमो त्यांनी स्वतः करून दाखवला. विविध प्रकारच्या बातम्यांचे निवेदन करत असताना वृत्त निवेदकाच्या भाव भावनांचे प्रतिबिंब निवेदकाच्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने उमटते, याविषयीचे प्रात्यक्षिक त्यांनी केले. विद्यार्थ्यांकडून त्यांनी बातम्या वाचून घेतल्या. कॅमेरासमोर बोलताना घ्यावयाची दक्षता आणि पाळावयाचे संकेत याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. वृत्त निवेदकाची आसनव्यवस्था, लाईट, कॅमेरा अँगल यासह अन्य अनेक तपशील त्यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
वृत्तवाहिन्यांवर वृत्त देण्यासाठी स्पर्धा असली तरी वृत्त निवेदकाने घाई करून चालत नाही. बातम्या सर्वसामान्य लोकांना समजतील अशा भाषेमध्ये सादर केल्या पाहिजेत. लोक व्यवहारातील प्रचलित शब्द आणि बोलीभाषेचा  वापर करत बातमी अधिक सोपी करून सांगण्याची कला वृत्तनिवेदकाने अवगत केलेली असली पाहिजे. बातम्या देत असताना व्यक्तिगत मते आणि भूमिकांना त्यामध्ये कोणतेही स्थान असत नाही.तटस्थपणे माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कौशल्य वृत्तनिवेदकाकडे असायला हवे, असे मतही यावेळी पल्लवी गोखले यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेत पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांबरोबरच अनेक पत्रकार, युट्यूबर्स तसेच डिजिटल माध्यमात काम करणारे पत्रकार उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment