Tuesday, 14 June 2022

शिवाजी विद्यापीठाच्या पूर्णवेळ अधिष्ठातापदी

डॉ. आर.के. कामत, डॉ. एस.एस. महाजन यांची निवड

 

डॉ. आर.के. कामत

डॉ. एस.एस. महाजन


कोल्हापूर, दि. १४ जून: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ नुसार शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठातापदी प्रा. (डॉ.) रजनीश कमलाकर कामत यांची आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठातापदी प्रा. (डॉ.) श्रीकृष्ण शंकर महाजन यांची आज निवड करण्यात आली. या पदांसाठी आज पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी निवड झालेले डॉ. आर. के. कामत हे मूळचे कागल येथील आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक शास्त्र अधिविभागांचे ते वरिष्ठ प्राध्यापक आणि अधिविभागप्रमुख आहेत. देशविदेशांतील नामांकित जर्नल्समध्ये त्यांचे २०० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी १६ पुस्तके लिहिली आहेत. आतापर्यंत १८ विद्यार्थ्यांना त्यांनी पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आहे. शिवाजी विद्यापीठात भारत सरकारच्या निधीतून सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक म्हणून काम करताना नॅक (बंगळूर) यांच्याकडून विद्यापीठास A++ मानांकन मिळवण्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला. गेल्या पाच वर्षांत त्यांना १० कोटी रुपयांचे संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये युरोपियन युनियनकडून मंजूर प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यांनी युरोप आणि दक्षिण पूर्व आशियातील अनेक देशांना संशोधनाच्या निमित्ताने भेटी दिल्या आहेत. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने त्यांना यंग सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानित केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसह विद्यापरिषद, अधिसभा सदस्य आहेत. इतर अनेक संस्थांचे विद्यापीठ अनुदान आयोग नामांकित सदस्य आहेत. त्यांनी महाराष्ट्रात परीक्षा सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी राजेश अग्रवाल समितीवर तसेच महाराष्ट्र सरकारच्या राज्य गुणवत्ता परिषदेवरही काम केले आहे.

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे नूतन अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्राध्यापक व अधिविभाग प्रमुख आहेत. गेली २७ वर्षे ते शिक्षक, संशोधक व शैक्षणिक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. शिवाजी विद्यापीठासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या संशोधन परीक्षण समित्यांसह पुणे विद्यापीठ व मुंबईच्या होमी भाभा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून काम केले आहे. डॉ. महाजन यांचे ४८ शोधनिबंध दर्जेदार जर्नल्समधून प्रकाशित झाले आहेत. विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांतून त्यांनी ६८ शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. तर १३ जणांनी एम.फील. पूर्ण केली आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या तीन लघु आणि युजीसी, आयसीएसएएसआर आणि इम्प्रेस यांच्या तीन मोठ्या संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. विद्यापीठाच्या प्रभारी अधिष्ठाता पदासह त्यांनी विद्यापरिषद सदस्य, अधिसभा सदस्य आणि अभ्यास मंडळ अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. इंडो-जर्मन एज्युकेशन समीट- मुंबई-२०१६, ग्लोबल एज्युकेशन समीट, बंगलोर २०१७ या परिषदांसह शिवाजी विद्यापीठातर्फेही त्यांना उत्कृष्ट शिक्षक व संशोधक म्हणून पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

दरम्यान, आज दिवसभरात विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखांसाठी पूर्णवेळ अधिष्ठाता पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या मुलाखतींसाठी पात्र आठपैकी सहा उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहिले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या मुलाखतीस पात्र चारही उमेदवार उपस्थित राहिले.

No comments:

Post a Comment