Friday, 17 June 2022

आंतरराष्ट्रीय संबंधांवरचा 'अस्वस्थपर्व' हा महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ

 

शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र अधिविभाग आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ 
रूरल डेव्हलपमेंटच्या वतीने 'सकाळ माध्यम समूहा'चे संपादक संचालक
श्रीराम पवार लिखित 'अस्वस्थपर्वपुस्तकावर शुक्रवारी परिचर्चा झाली. 
त्याचे द्घाटन करताना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के. सोबत (डावीकडून) निखिल पंडितराव
डॉ. अशोक चौसाळकरडॉ. रोहन चौधरीडॉ. प्रकाश पवार आणि श्रीराम पवार.

'अस्वस्थपर्व' पुस्तकावरील चर्चेत बोलताना डॉ. रोहन चौधरी.

'अस्वस्थपर्व' पुस्तकावरील चर्चेत बोलताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


परिचर्चेतील सूर; श्रीराम पवार लिखित 'अस्वस्थपर्व' पुस्तकावर विद्यापीठात मंथन

कोल्हापूर, दि. १७ जून: ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्रीराम पवार लिखित 'अस्वस्थपर्व' पुस्तक आंतरराष्ट्रीय राजकारण आणि एकूणच आंतरराष्ट्रीय संबंधांवरचा समकाळातला एक महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच तो येत्या काळात मार्गदर्शक ठरेल. कारण प्रत्येक आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडींचा सामान्य माणसाच्या जगण्यावरही परिणाम होत असतो, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात झालेल्या परिचर्चा कार्यक्रमातून उमटला.

शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र अधिविभाग आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटतर्फे आज 'सकाळ माध्यम समूहा'चे संपादक-संचालक, राजकीय विश्लेषक श्रीराम पवार लिखित 'अस्वस्थपर्व' या पुस्तकावर र्वंकष मंथन झाले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. रोहन चौधरी यांनी पुस्तकाच्या अनुषंगाने विस्तृत मांडणी केली. ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर अध्यक्षस्थानी होते, तर कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

डॉ. प्रकाश पवार म्हणाले, ''वर्चस्ववादातून सुरू असलेले लष्करी सामर्थ्य, अर्थकारण, विज्ञान-तंत्रज्ञान आणि एकूणच देशांतर्गत आंतरराष्ट्रीय राजकारण असे चार कंगोरे पुस्तकातून प्रकर्षाने मांडले आहेत. राजकारणावर अर्थकारणाचा प्रभाव आहे. लोकशाहीच्या मूल्यांचा ऱ्हास होतो आणि बहुसंख्याकवादातून विषमता वाढीस लागत असून, हे चित्र बदलण्यासाठी आपण स्वत: काय करू शकतो, असा प्रश्न विचारणारी स्पष्ट भूमिका त्यातून घेतलेली दिसते.''

डॉ. रोहन चौधरी म्हणाले, ''आंतरराष्ट्रीय संबंधांवर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक मिळत नसल्याच्या परिस्थितीत 'अस्वस्थपर्व' या पुस्तकामुळे हा विषय सामान्यांपर्यंत पोचला आहे. प्रत्येक घटना-घडामोडींवर पुस्तकातून अगदी सूक्ष्म पातळीवरची अभ्यासपूर्ण मांडणी झाली असून, येत्या काळात अधिकाधिक सामान्य लोकांपर्यंत हा विषय पोचवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत.''

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, ''श्री. पवार यांच्य पुस्तकातील प्रत्येक प्रकरण 'पीएच. डी.'च्या शोधप्रबंधाचा विषय आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणावर राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र विभागात गटचर्चा व्हायला हवी.''

अध्यक्षीय मनोगतात डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, ''शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्याशाखेतून पत्रकारितेची पदवी घेतलेल्या श्रीराम पवार यांची आज आंतरराष्ट्रीय राजकारणाचा तटस्थपणे; पण ठाम भूमिका घेऊन लिहिणारे राजकीय विश्लेषक अशी देशभरात ओळख आहे, ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद आहे. त्यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण संवादाच्या शैलीमुळे सामान्य माणसालाही ते सहज समजते. विशेष म्हणजे प्रत्येक लेखातून ते सर्वांनाच अंतर्मुख व्हायला भाग पाडतात.''

संपादक-संचालक श्रीराम पवार म्हणाले, ''गेल्या काही वर्षांतील एकूणच जागतिक घडामोडींचा वेध घेतल्यास जगाच्या इतिहासाला वेगळे वळण मिळाले आहे. लोकशाहीवादी राष्ट्रे आणि एकाधिकारशाहीला प्रोत्साहन देणारी राष्ट्रे अशी सरळ-सरळ दोन भागांत जगाची विभागणी झाली. त्यातून निर्माण झालेल्या वर्चस्ववादातून अनेक प्रकारचे ताण निर्माण होत आहेत आणि त्याचा जगभरातील सामान्य माणसाच्या जगण्यावरही परिणाम होतो. या साऱ्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे.''

'सकाळ'चे निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ''आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करण्यासारखा क्लिष्ट विषय 'अस्वस्थपर्व' पुस्तकातून अत्यंत सोप्या द्धतीने मांडला गेला आहे. मराठी भाषेतून हा वेध घेताना श्रीराम पवार यांची आता राष्ट्रीय पातळीवरील राजकीय विश्लेषक म्हणून ओळख निर्माण झाली. जगात कुठेही एखादी घटना घडली तर त्याचा सामान्य माणसावरही परिणाम होतो, याची जाणीव या पुस्तकामुळे आता प्रत्येकाला झाली आहे.''

राज्यशास्त्र अधिविभागाचे डॉ. सुखदेव उंदरे नेहा वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जयश्री कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यशवंतराव चव्हाण रूरल डेव्हलपमेंट स्कूलचे डॉ. नितीन माळी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment