Wednesday, 31 January 2024

स्त्रियांच्या राजकीय सहभागाविषयी चर्चासत्र; पोस्टर स्पर्धा

 





कोल्हापूर, दि.31 जानेवारी - भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (दि.25 जानेवारी) शिवाजी विद्यापीठात 'भारतीय गणराज्य आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग' या विषयावर चर्चासत्र पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

सदर उपक्रम कै. श्रीमती शारदाबाझ्र गोविंदराव पवार अध्यासन, राज्यशास्त्र विभाग, गांधी अभ्यास केंद्र नेहरू अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला गेला. चर्चासत्राचे बीजभाषण आलोचना संस्था, पुणे यांच्या संचालक मेधा कोतवाल लेले यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते. सुरूवातीला राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत केले. डॉ. भारती पाटील, समन्वयक कै. श्रीमती शारदाबाझ्र गोविंदराव पवार अध्यासन यानी चर्चासत्रामागील भुमिका स्पष्ट केली. डॉ. प्रल्हाद माने, समन्वयक, नेहरू अभ्यास केंद्र यांनी आभार मानले.

आपल्या बीजभाषणात मेधा कोतवाल लेले यांनी भारतातील स्त्री चळवळीमुळे, स्त्री संघटनांमुळे गेल्या 75 वर्षात स्त्रियांच्यासाठी कसे कायदे होत गेले याचा आढावा घेतला, मथुरा बलात्काराच्या घटनेनंतर स्त्री चळवळीने बलात्कारासंबंधी कायदे बदलण्यास भाग पाडले, तीच बाब लैंगिक छळाची किंवा कौंटुंबिक अत्याचाराची होती, असे त्या म्हणाल्या. स्त्रियांचे राजकारण म्हणजे केवळ निवडणूकीचे राजकारण नव्हे तर स्त्रीजीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे राजकारण होय असे त्या म्हणाल्या.

दुसऱ्या सत्रात डॉ. जयश्री कांबळे यांनी पंचातींमधील स्त्री नेतृत्व याविषयावर तर डॉ. वैशाली पवार यांनी महाराष्ट्र विधान सभेद्वारे स्त्रियांचा राजकीय सहभाग या विषयावर मांडणी केली. स्त्री चळवळीच्या जेष्ठ कार्यकर्त्या छायाराजे यांनी या सत्राचे अध्यक्षस्थान भुषविले. डॉ. नेहा वाडेकर यांनी लोकसभेतील स्त्रियांचा सहभाग या विषयावर तर प्रा. डॉ. भारती पाटील यांनी 'स्त्रियांच्या आरक्षणाची वाटचाल' या विषयावर मांडणी केली. या सत्रात डॉ. रविंद्र भणगे यांनी अध्यक्षस्थान भुषविले. चर्चासत्रात अंदाजे 250 प्रतिनिधी सहभागी झाले.

या चर्चासत्राला जोडून याच विषयावर पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात 95 विद्यार्थी सहभागी झाले. सदर पोस्टर्सचे परिक्षण डॉ. प्रतिमा पवार, डॉ. सुभाष कोंबडे डॉ. कविता वड्राळे यांनी केले. सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-


प्रथम क्रमांक :- लक्ष्मी धनपाल कोळी

द्वितीय क्रमांक :- वरूण सुहास अमृते

तृतिय क्रमांक :- पुनम प्रकाश सुर्यवंशी,

                          गायत्री प्रकाश सुर्यवंशी,  प्राजक्ता आदिकराव सुर्यवंशी

उत्तेजनार्थ :- 1) रजनीगंधा राजाराम नायकवडी

उत्तेजनार्थ :- 2) मानसी भरत पोळ


Tuesday, 30 January 2024

महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’चे विद्यापीठात प्रात्यक्षिकांसह दर्शन

 ज्येष्ठ गांधीवादी एस.के.एच. स्वामी यांच्या व्याख्यानाने भारावले प्रेक्षक

शिवाजी विद्यापीठात चरख्यावर सूतकताईच्या प्रात्यक्षिकांसह व्याख्यान देताना ज्येष्ठ गांधीवादी एस.के.एच. स्वामी.

शिवाजी विद्यापीठात चरख्यावर सूतकताईच्या प्रात्यक्षिकांसह व्याख्यान देताना ज्येष्ठ गांधीवादी एस.के.एच. स्वामी.

शिवाजी विद्यापीठात 'नई तालीम'विषयी प्रात्यक्षिकांसह व्याख्यान देताना ज्येष्ठ गांधीवादी एस.के.एच. स्वामी.

शिवाजी विद्यापीठात 'नई तालीम'विषयी प्रात्यक्षिकांसह व्याख्यान देताना ज्येष्ठ गांधीवादी एस.के.एच. स्वामी. समोर मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठात 'नई तालीम'विषयी प्रात्यक्षिकांसह व्याख्यान देताना ज्येष्ठ गांधीवादी एस.के.एच. स्वामी.

(श्री. एस.के.एच. स्वामी यांच्या व्याख्यानाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. ३० जानेवारी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचा जागर घालत असताना आजची सकाळ ही ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत एस.के.एच. स्वामी यांनी नई तालीममय करून सोडली. महात्मा गांधी यांच्या नई तालीमविषयक विचारांचा वेध घेत असताना स्वामी यांनी आपल्या वक्तव्याला दिलेली प्रात्यक्षिकांची जोड ही उपस्थित प्रत्येक प्रेक्षकाला भारावून टाकणारी ठरली.

शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, नेहरू अभ्यास केंद्र, समाजकार्य विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधीवादी विचारवंत एस.के.एच. स्वामी यांचे नई तालीम: भारतीय शिक्षणाचा प्रयोग या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. स्वामी यांनी महात्मा गांधी यांचे नई तालीमच्या अनुषंगाने असणारे विचार केवळ मौखिक पातळीवर न सांगता या उपक्रमामागील गांधीजींचे हेतू विषद करून सांगितले. आपल्या व्याख्यानास त्यांनी विविध प्रात्यक्षिकांची जोड दिल्याने ते प्रभावीपणे पोहोचले. यामध्ये चरख्यावर सूतकताई कशी करतात, इथंपासून ते घरातल्या प्रत्येक टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार कशी करावी, इथेपर्यंतच्या बाबींचा समावेश होता. एकीकडे पैशाची बचत करणे आणि दुसरीकडे बचत हेच संवर्धन हा मूलमंत्रही देणे, अशा दुहेरी पातळीवर श्री. स्वामी यांनी संवाद साधला. गांधीजींना अभिप्रेत स्वच्छता संस्कार, खादीचे, स्वदेशी बनावटीच्या वस्तूंचे महत्त्व, स्वयंपूर्णता व स्वावलंबन, पर्यावरणस्नेही व मानवकेंद्री समाजाच्या अपेक्षा यांविषयीही त्यांनी विवेचन केले.

श्री. स्वामी म्हणाले, महात्मा गांधी शरीररुपाने हयात नसले, तरी त्यांचे सिद्धांत, शिकवण ही अमरच राहील. अभ्यासायला एक आयुष्य पुरणार नाही, इतके समग्र लेखन त्यांनी केलेले आहे. चरख्याकडे ते स्वावलंबनाचे प्रतीक म्हणून पाहात. हे कौशल्य अवघ्या दोन मिनिटांत आत्मसात करता येते. प्रत्येक घरात खादी वापरली गेली पाहिजे. त्यातून पाश्चात्य कपड्यांवर होणारा अनाठायी खर्च वाचून बचत होईल. रुपयाची कदर करून जितकी बचत कराल, तितके आयुष्य समाधानी बनेल. कारण बचत हेच संवर्धन आहे. झाडूला अर्थात स्वच्छतेला आदर देणे गांधीजींना अभिप्रेत होते. या देशातील प्रत्येक मनुष्याने घरातील व समाजातील वर्तन व वाचा एकसारखी ठेवली, तर देशाचे कल्याण होईल. आपल्या आरोग्य रक्षणाच्या सर्व सुविधा घराच्या स्वयंपाकघरातच असताना आपण मात्र बाजाराच्या रेट्याला बळी पडतो आणि बाजार आपले शोषण करतो. म्हणून गांधीजी स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. देशातल्या आणि जगातल्या गोरगरीबांच्या गरजांचा विचार करून उच्चशिक्षण क्षेत्राने त्या गरजांच्या पूर्तीसाठी संशोधनकार्य करणे गांधींना अपेक्षित असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी डॉ. अशोक चौसाळकर यांनी महात्मा गांधींच्या उच्चशिक्षण क्षेत्राकडून असलेल्या अपेक्षांविषयी विवेचन केले. ते म्हणाले, महात्मा गांधी यांच्या प्राथमिक व प्राध्यमिक शिक्षणाच्या विचारांचा जितका अभ्यास झाला, तितका उच्चशिक्षणाच्या अनुषंगाने झाला नाही. गांधींच्या मागणीमुळेच देशात गुजरात, काशी आणि टिळक विद्यापीठे स्थापन झाली. त्यांमधील अभ्यासक्रमाचे स्वरुप कसे असावे, हेही त्यांनी सांगितले होते. उच्चशिक्षणाच्या बाबतीत भारताने पाश्चात्यांचे अंधानुकरण थांबवावे. भारतीय व्यवस्था व येथील मूल्यांवर आधारित शिक्षण असावे. सर्व विषयांचे शिक्षण विद्यापीठामध्ये असावे. शेतीचे शिक्षण देत असताना प्रयोगांना प्रोत्साहन द्यावे. शिक्षण व शेती यांच्यात एकात्मता असावी. भारतीयांसाठी उपयुक्त अशा संशोधनाला चालना देण्यात यावी. शिक्षकांना योग्य वेतन द्यावे, पण लठ्ठ पगार देऊ नयेत, त्यामुळे विद्यापीठांची स्वायत्तता धोक्यात येण्याची शक्यता असते, अशी भूमिका गांधीजींनी मांडलेली आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिक्षणाचा समग्र विचार न करता आपण केवळ अभ्यासक्रम म्हणून त्याकडे पाहतो, ही फार मोठी गफलत आहे. व्यवहारकुशलता हा शिक्षणाचा मूळ गाभा बनायला हवा. गांधींनी आपल्याला पर्यावरणकेंद्री जीवनमूल्ये शिकविली. प्रत्यक्षात आपली वाटचाल त्याउलट सुरू आहे. कार्यानुभव हा आपल्या विषयपत्रिकेवरील सर्वोच्च प्राधान्याचा विषय असायला हवा. गरज आणि हव्यास यामधील सीमारेषाच आपण पुसून टाकल्याने आजच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. गांधीविचारांना अनुसरले तर संतुलन साधणे शक्य आहे. त्यांचा विचार हा समन्वयाचा आणि आजच्या परिभाषेत वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचा आहे. श्री. स्वामी यांच्या व्याख्यानातून त्यांच्या कृतीशील गांधीवादी आचरणाचे दर्शन घडल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सकाळी ठीक ११ वाजता दोन मिनिटे मौन पाळून स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नेहरू अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपकुलसचिव डॉ. संजय कुबल यांनी आभार मानले.