Wednesday, 11 December 2024

शिवाजी विद्यापीठाचा दे’आसरा फाऊंडेशनशी सामंजस्य करार

 

शिवाजी विद्यापीठ आणि दे'आसरा फाऊंडेशन यांच्यादरम्यान सामंजस्य करार प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि डॉ. आनंद देशपांडे. सोबत (डावीकडून) डॉ. आनंद गोडसे, मनिषा तपस्वी, आशिष पंडित, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि अविनाश भाले.

(सामंजस्य करार कार्यक्रमाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ११ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाशी झालेल्या सामंजस्य करारामुळे देआसरा फाऊंडेशन आता येथील सृजनशील युवकांमध्ये उद्योजकता विकास आणि सामाजिक विकासाशी जोडली जात आहे, याचे समाधान वाटते, असे उद्गार प्रख्यात उद्योजक तथा पुण्याच्या देआसरा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद देशपांडे यांनी आज येथे काढले.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये उद्योजकता विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणाऱ्या देआसरा फाऊंडेशनसमवेत आज शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार झाला. त्यावेळी डॉ. देशपांडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. देशपांडे म्हणाले की, आता नव्या पिढीने अत्यंत सजगपणाने कौशल्ये तसेच वैविध्यपूर्ण कामे करण्याकडे कल दर्शविला पाहिजे. नोकरी, रोजगाराच्या संधी येथून पुढे कमी होत जाणार असल्याने स्वयंरोजगार हाच एक महत्त्वाचा पर्याय समोर असल्याची जाणीव या पिढीने ठेवावी. त्याचप्रमाणे व्यक्तीगत आर्थिक व्यवस्थापन, विक्री आणि विपणन या बाबतीतही काळजी घेतली पाहिजे. सातत्यपूर्ण नवनवे शिक्षण, प्रशिक्षण आणि जगाकडे नव्याने पाहण्याचा दृष्टीकोन याच बाबी आता आपले अस्तित्व निश्चित करणाऱ्या ठरतील. आंतरविद्याशाखीय उपक्रम राबविण्याकडे विद्यापीठांनी तसेच विद्यार्थ्यांनी लक्ष पुरविले पाहिजे. त्या दृष्टीने सर्वसमावेशक उपक्रम, विद्यार्थी प्रशिक्षण आणि प्रशिक्षकांना प्रशिक्षण राबविण्यासाठी देआसरा फाऊंडेशन विद्यापीठास मदत करील, असेही त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठामध्ये देआसरा फाऊंडेशनचे अनेकविध उपक्रम राबविण्यासाठी पोषक वातावरण आहे. सामाजिक समावेशन केंद्रासह दोन बँकांची अध्यासने आहेत. त्यामुळे सामंजस्य करारांतर्गत विविध उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उद्योजकतेविषयी अवगत करण्यासाठी प्रयत्न करता येतील. त्यातून अतिशय चांगल्या संधींची निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवाजी विद्यापीठाविषयी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी सादरीकरण केले, तर देआसरा फाऊंडेशनविषयी मुख्य कामकाज अधिकारी आशिष पंडित आणि मनिषा तपस्वी यांनी सादरीकरण केले. सामंजस्य करारावर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आणि आशिष पंडित यांनी स्वाक्षरी केल्या.

यावेळी विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, सामाजिक समावेशन केंद्राचे अविनाश भाले, देआसरा फाऊंडेशनचे उद्योजकता तज्ज्ञ डॉ. आनंद गोडसे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment