डॉ. गजानन राशीनकर, डॉ. प्रज्ञा पाटील यांच्या संशोधनाला भारतीय आणि युके पेटंट
डॉ. गजानन राशीनकर |
डॉ. प्रज्ञा पाटील |
(कर्करोग पेशीचे प्रतिकात्मक छायाचित्र) |
कोल्हापूर, दि. ७ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील
संशोधक प्राध्यापक डॉ. गजानन राशीनकर आणि डॉ. प्रज्ञा पाटील यांनी स्तनाच्या
कर्करोगावरील हाइपरथर्मिया (Hyperthermia) या महत्त्वाच्या उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या
चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. त्यांच्या या संशोधनाला
भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय युके पेटंटही प्राप्त झाले आहे.
डॉ. राशीनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅनो-मॅग्नेटाइटच्या
अतिसूक्ष्म रेणूवर विविध रासायनिक अभिक्रिया करून त्यावर एन-हेटेरोसायक्लिक
कार्बिनचे (एन.एच.सी.) आवरण चढविण्यात येते आणि त्याची सोने या
धातूसोबत प्रक्रिया करून या चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे.
हे चुंबकीय नॅनो कण कर्करोगावरील हाइपरथर्मिया या उपचार पद्धतीमध्ये अतिशय प्रभावीपणे
वापरले जाऊ शकतात.
चुंबकीय नॅनो कणांच्या विशिष्ट संरचनेमुळे ते स्तनाच्या कर्करोगकारक
पेशींना जोडले जातात. अशा जोडल्या गेलेल्या नॅनो कणांवर जेव्हा चुंबकीय बल टाकले जाते,
तेव्हा सतत बदलत जाणाऱ्या चुंबकीय लहरींच्या प्रभावामुळे हे कण उष्णता उत्सर्जित
करतात. या प्रक्रियेदरम्यान साधारणपणे ४० ते ४८ अंश सेंटीग्रेड इतके तापमान
निर्माण होते. यामुळे कर्करोगांच्या पेशींची अंतर्गत रचना ढासळते आणि त्या नष्ट
होतात. विशेष बाब म्हणजे हे नॅनोकण कर्करोगाच्या गाठीला रक्तपुरवठा करणाऱ्या विविध
रक्तवाहिन्यांची वाढ थांबवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. या प्रक्रियेदरम्यान
सर्वसाधारण पेशींना फार मोठ्या प्रमाणावर अपाय न करता केवळ स्तनाच्या
कर्करोगांच्या पेशी नष्ट करण्याकरिता या
नॅनो कणांचा प्रभावी उपयोग होतो. हे संशोधन एन-हेटेरोसायक्लिक कार्बिन आणि
मूलभूत धातूंपासून नवनवीन नॅनो कणांची निर्मिती करणाऱ्या संशोधन क्षेत्राला दिशादर्शक
स्वरुपाचे ठरणार आहे, असेही डॉ. राशीनकर यांनी सांगितले.
या संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. पद्मा दांडगे, डी.वाय. पाटील
विद्यापीठाचे डॉ. विश्वजीत खोत आणि डॉ. अर्पिता तिवारी यांनीही मोलाचे योगदान
दिले. सदर संशोधनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास
शिंदे, रसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. कैलास सोनवणे
यांचे मार्गदर्शन लाभले.
‘समाजोपयोगी संशोधनाचा वसा’
शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी अलीकडील काळात केलेले संशोधन आणि
त्यांना प्राप्त झालेले पेटंट यांची क्षेत्रे पाहता ती विद्यापीठाचा समाजोपयोगी संशोधनाचा वसा
आणि वारसा सिद्ध करणारी आहेत. डॉ. राशीनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे संशोधनही
याच स्वरुपाचे आहे. कर्करोगावरील संशोधनाच्या क्षेत्रामधील मूलभूत संशोधनाला
तसेच भावी संशोधनालाही त्यातून चालना मिळेल, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment