Monday, 9 December 2024

गार्डन क्लब पुष्प स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला

४६ पारितोषिकांसह सर्वसाधारण विजेतेपद

 

कोल्हापुरात आयोजित गार्डन क्लब पुष्प स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक क्लबच्या अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी यांच्याकडून स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक अभिजीत जाधव आणि सहकारी. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, रणजीत यादव, मयूर कुलकर्णी, योगिनी कुलकर्णी, लक्ष्मी शिरगावकर आदी.

गार्डन क्लब स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करणाऱ्या उद्यान विभागाच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह अभिजीत जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, उपकुलसचिव रणजीत यादव.


कोल्हापूर, दि. ९ डिसेंबर: येथील गार्डन क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाला चौथ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. यामध्ये १५ प्रथम, १५ द्वितीय आणि १६ तृतीय अशी एकूण ४६ पारितोषिके विद्यापीठाला मिळाली. दि. ६ ते ८ डिसेंबर २०२४ या कालावधीत ही स्पर्धा महावीर गार्डन येथे पार पडली.

या प्रदर्शन व स्पर्धेचा काल (दि. ८) सायंकाळी पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी गार्डन क्लबच्या अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यापीठाच्या उद्यान विभागाचे अधीक्षक अभिजीत जाधव, उपकुलसचिव रणजीत यादव आणि उद्यान विभागातील सहकाऱ्यांना सर्वसाधारण विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेते शरद भुथाडिया आणि प्रमुख पाहुमे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते.

मंचावर कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, गार्डन क्लबचे उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या अध्यक्ष योगिनी कुलकर्णी, सचिव लक्ष्मी शिरगावकर, लघुपट परीक्षक मयूर कुलकर्णी, अरुण मराठे आदी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागाला मिळालेल्या पारितोषिकांचा तपशील पुढीलप्रमाणे:

क्लास १: गुलाब (एकच फूल)- १. फिका गुलाब (प्रथम व तृतीय), २. गडद गुलाब (प्रथम व तृतीय), ३. नारंगी (प्रथम व द्वितीय), ४. किरमिजी (द्वितीय), ५. गडद पिवळा (प्रथम व तृतीय), ६. पट्टे असलेला (प्रथम व द्वितीय),

क्लास २: गुलाब (एकाच जातीचे)- १. एकूण ६ फुले (तृतीय), २. एकूण १२ फुले (द्वितीय व तृतीय), ३. एकूण २४ फुले (तृतीय),

क्लास ४: बटण गुच्छ- १. पॉलीएंथा (प्रथम, द्वितीय, तृतीय), २. बटन गुच्छ (प्रथम, द्वितीय, तृतीय),

क्लास ६: गुलाब ३ टप्प्यातील (प्रथम व तृतीय),

क्लास ७: फुले- १. डेलिया (प्रथम, द्वितीय, तृतीय), २. झिनिया (द्वितीय), ३. अॅस्टर (द्वितीय), ४. कर्दळ (तृतीय), ५. शेवंती (द्वितीय), ६. जरबेरा (तृतीय), ७. झेंडू (द्वितीय), ८. सुर्यफूल (प्रथम, द्वितीय), ९. डेझी (प्रथम), १०. जास्वंद (द्वितीय), ११. जिरेनियम (तृतीय),

क्लास ९: कुंड्यातील रोपे- १. गुलाब (प्रथम, द्वितीय, तृतीय), २. फर्न (तृतीय), ३. क्रोटोन (द्वितीय, तृतीय), ४. कोलीयस (प्रथम), ५. इतर झाडे (फुलाची) (प्रथम), ट्रे लँडस्केप (प्रथम).


उद्यान विभागाचे कुलगुरूंकडून अभिनंदन

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची आज उद्यान विभागाचे अधीक्षक अभिजीत जाधव यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. उद्यान विभागाचे सर्वच कर्मचारी अत्यंत मनापासून उद्यानांची देखभाल करीत असतात. त्यांच्या या श्रमाचे फलित म्हणजे त्यांना गार्डन क्लबच्या स्पर्धेत सातत्याने मिळणारी पारितोषिक रुपी दाद असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. यापुढील काळातही त्यांनी असेच उल्लेखनीय कार्य करीत राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



No comments:

Post a Comment