Friday, 31 October 2025

शिवाजी विद्यापीठामध्ये सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन

  

कोल्हापूर, दि.31 ऑक्टोबर - भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन या निमित्ताने या महान नेत्यांच्या स्मृतींना आज शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासीय इमारतीमध्ये आज सकाळी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.तद्नंतर, सर्व उपस्थितांना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एकता सद्भावना यांची शपथ देण्यात आली.

यावेळी वित्त लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, वाणिज्य व्यवस्थापन अधिविभागप्रमुख डॉ.श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँंड टेक्नॉलॉजीचे प्र.संचालक डॉ.किरण कुमार शर्मा, डॉ.क्रांतीवीर मोरे, डॉ.राहूल माने, डॉ.सुभाष कोंबडे, उपकुलसचिव डॉ.प्रमोद पांडव, श्रीमती संध्या अडसुळ, डॉ.प्रमोद पाटील, डॉ.तुकाराम डोंगळे, डॉ.मुकेश पाडवी, डॉ.किरण पवार, डॉ.सुनिलकुमार निर्मळे, डॉ.योजना पाटील, डॉ.तेजस्वीनी भट, डॉ.सुर्यबाला सावंत, डॉ.मेघा देसाई, डॉ.कृष्णा पवार, डॉ.अखिलेश पाटील यांच्यासह अधिविभागाचे शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

-----

Thursday, 30 October 2025

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.ज्योती जाधव




कोल्हापूर, दि.30 ऑक्टोबर - शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख प्रा.डॉ.ज्योती जाधव यांची विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली.प्रभारी कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी यांनी प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ.जाधव यांची नियुक्ती केली. दरम्यान, प्रभारी प्र-कुलगुरू पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस आज (गुरूवारी) झालेल्या व्यवस्थापन परिषदेत केली.व्यवस्थापन परिषदेनेही त्यास संमती दिली.प्रभारी कुलगुरू प्रा.गोसावी यांनी आज सायंकाळी डॉ.जाधव यांना प्रभारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती केल्याविषयी पत्र दिले.तसेच, विद्यापीठ प्रशासनाकडून याबाबत मा.कुलपती कार्यालयाला कळविण्यात आले. प्रा.डॉ.ज्योती जाधव यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

डॉ.जाधव हया जागतिक आघाडीच्या शास्त्रज्ञांमध्ये समाविष्ट असलेल्या ज्येष्ठ संशोधक आहेत.त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले आहे.शिवाजी विद्यापीठात नियमित प्र-कुलगुरू नियुक्त होईपर्यंत त्यांचा प्रभारी प्र-कुलगुरूपदाचा कार्यकाल राहणार आहे.

दरम्यान, आज सायंकाळी प्रभारी कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ.ज्योती जाधव यांचे अभिनंदन स्वागत केले.

------


Tuesday, 28 October 2025

माझे गांव, माझे राज्य, माझा देश ही भावना प्रत्येकाने जोपासणे आवश्यक - कर्नल अमरसिंह सावंत

 

 

कोल्हापूर, दि.28 ऑक्टोबर - माझे गांव, माझे राज्य, माझा देश ही भावना प्रत्येकाने आपल्या मनामध्ये जोपासणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कर्नल अमरसिंह सावंत यांनी केले.

शिवाजी विद्यापीठ, विनायक दळवी चॅरिटेबल फौंडेशन, एस. एस. डी. ट्रस्ट आणि ब्रह्मकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील निलांबरी सभागृहामध्ये 'वीर नारी दिपावली स्नेहसंमेलनाचे' आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.वीर पत्नी शोभाताई पाटील आणि वीर नारी सविताताई बिरांजे उपस्थित होते, तर कुलसचिव डॉ.विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते.

अभिमानास्पद सैनिकी परंपरा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शहिदांच्या पत्नी व मातांचा हृद्य सत्कार करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.स्नेहसंमेलनाला उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.

कर्नल अमरसिंह सावंत पुढे बोलताना म्हणाले, देशाला सर्व बाजुने शत्रुराष्ट्रांचा वेढा आहे. देशाच्या रक्षणार्थ शत्रुंची घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर सैनिक आपल्या जीवाची परवा करता सदैव तत्पर असतात. त्यांचा नेहमी आदर केला पाहिजे. सेवानिवृत्त झालेले सैनिक समाजामध्ये सतर्क राहून लोकांना शिक्षित करून शिस्तिचे धडे देवून देशसेवा करू शकतात. कचरा निर्मुलन स्वच्छतेचे धडे देणे या माध्यमातूनही माजी सैनिकांनी सामाजिक कार्य करणे गरजेचे आहे.

प्रजापिता ब्रम्हकुमारी अलका दिदी म्हणाल्या, देशाच्या सीमेवर देश रक्षणासाठी उभे असलेल्या शूर सैनिकांमुळे आपण सर्वजण आनंदी आणि सुरक्षित जीवन जगत आहोत.आपल्यामधील विकृत गोष्टींचा त्याग करून एकमेकांप्रती आदरभाव, एकोपा निर्माण करणे गरजेचे आहे.

आरोग्य विद्यापीठ, नाशिकचे प्रभारी कुलगुरू डॉ.अजय चंदनवाले यांनी व्हीडीओ संदेशद्वारे संबोधित करताना सैनिकांच्या वीर कुटुंबियांना शासनाने दिलेल्या वैद्यकीय सुविधे बाबत माहिती दिली.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ.विलास शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठामध्ये शहीद जवानांच्या स्मृतीप्रीत्यार्थ क्रांतीवनाची निर्मिती केली आहे. क्रांतीवन हे अतिशय देखणे वन आहे. विद्यापीठाने शहिदांच्या पाल्यांना शिक्षणामध्ये भरीव सवलत दिलेली आहे.  तसेच, शिष्यवृत्ती योजनेचा लाभही दिला जातो.

याप्रसंगी व्ही.डी.सी.एफ.चे अध्यक्ष प्रा. विनायक दळवी यांनी सैनिकांच्या पराक्रमावर आधारित लिहिलेली 'फौजी की दिवाली' कविता  सादर केली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते कीर्तीचक्र प्राप्त शहिद हवालदार शिवाजी कृष्णा पाटील यांच्या वीर पत्नी शोभाताई आणि बीएसएफ राष्ट्रपती मेडल प्राप्त शहिद अशोक बिरांजे यांच्या वीर पत्नी सविताताई यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.यावेळी शहीद हवालदार शिवाजी पाटील यांचे वीर पुत्र ज्योतिबा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी गंभीर यांनी केले. विद्यापीठाच्या इंक्युबेशन, इनोव्हेशन लिंकेजेसचे संचालक डॉ.सागर डेळेकर यांनी स्वागत केले. वीर पत्नी सविताताई बिरांजे यांनी आभार मानले. एस. एस. डी. ट्रस्ट चिपळूणचे अध्यक्ष डॉ. गुलाबराव राजे यांनी ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व कारगील योद्धा ऑनररी कॅप्टन सुभाष डोंगरे यांच्या तसेच पाकिस्तानचे शेवटचे बंकर उध्वस्त करून भारताला विजय प्राप्त करून दिलेल्या कॅप्टन जग्गी आणि कॅप्टन कॉरी यांच्या टीमच्या तेजस्वी पराक्रमाची गाथा मांडली.  

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कारगील योद्धा ऑनररी कॅप्टन सुभाष डोंगरे यांनी मोठे योगदान दिले. कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक सैनिक, वीर नारी, जेष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते आबा कांबळे, चिपळूण येथून आलेले माजी सैनिक आणि एस.एस.डी.ट्रस्ट चे कार्यकर्ते, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

-----