Thursday, 9 October 2025

संसदीय कार्यप्रणाली अवगत होण्याच्या दृष्टीने युवा संसद महत्त्वाचा उपक्रम: डॉ. विलास शिंदे

विद्यापीठात १७ वी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा उत्साहात



(उपरोक्त २ फोटोंसाठी ओळ) शिवाजी विद्यापीठात आयोजित १७ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बोलताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रल्हाद माने, माजी खासदार ब्रतीन सेनगुप्ता, संचालक ए.बी. आचार्य, डॉ. वैशाली पवार आणि डॉ. तानाजी चौगुले



(उपरोक्त ३ फोटोंसाठी ओळ) शिवाजी विद्यापीठात आयोजित १७ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी.


(युवा संसद स्पर्धेची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. ९ ऑक्टोबर: विद्यार्थ्यांना संसदीय कार्यप्रणाली अवगत होण्याच्या दृष्टीने युवा संसद हा उपक्रम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात आज केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयातर्फे आयोजित १७ वी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा (२०२४-२५) मोठ्या उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात अध्यक्ष स्थानावरुन डॉ. शिंदे बोलत होते.

ते म्हणाले, पूर्वी आंदोलने हा संसदीय राजकारणात प्रवेश करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग होता. अलिकडे मात्र हा मार्ग आक्रसत चाललेला आहे. तथापि, संसदीय कार्यप्रणालीचे यथायोग्य आकलन असणाऱ्यांसाठी येथे मोठा अवकाश उपलब्ध आहे. त्या दृष्टीने युवा संसद हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. शिवाजी विद्यापीठाची या स्पर्धेतील  कामगिरी वर्षागणिक उंचावत चाललेली आहे. यंदाही या संघाकडून अधिक चांगली कामगिरी उंचावेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कोलकता (पश्चिम बंगाल) येथील राज्यसभेचे माजी खासदार ब्रतीन सेनगुप्ता, केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाच्या युवा संसद उपक्रमाचे संचालक ए.बी. आचार्य आणि पुणे येथील श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली पवार हे उपस्थित होते.

यावेळी विद्यापीठाच्या युवा संसद स्पर्धा उपक्रमाचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी स्वागत, प्रास्ताविक व परीक्षकांचा परिचय करून दिला. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डॉ. संतोष सुतार, डॉ. कविता वड्राळे, डॉ. सुखदेव उंदरे आणि आकाश ब्राह्मणे यांनी काम पाहिले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment