शिवाजी विद्यापीठात ‘ज्ञानेश्वरी’सह चार महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन
कोल्हापूर, दि. ५ ऑक्टोबर: साहित्याच्या माध्यमातून
समाजामध्ये मानवतेच्या जाणीवा सजग राखणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे. त्यामध्ये
शिवाजी विद्यापीठ कर्तव्यभावनेतून कार्यरत आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात संत
तुकाराम अध्यासन आणि विदेशी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ
प्रकाशन सोहळ्यामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील,
डॉ. दिलीप कुलकर्णी (कुरुंदवाड) आणि अरुण जाधव (तळाशी) प्रमुख उपस्थित होते.
संत तुकाराम
अध्यासनातर्फे निरुपणकार मारुतीराव जाधव (तळाशीकर) गुरुजी यांची ‘तुकयाबंधू कान्होबा
महाराज अभंगगाथा’ आणि प्रा. पां.ना. कुलकर्णी संपादित ‘ज्ञानेश्वरी’ची दुसरी आवृत्ती तसेच डॉ. मेघा पानसरे
संपादित ‘स्मृतिस्तंभ’ आणि ‘दि डायनॅमिक्स ऑप साऊथ एशिया’ या चार ग्रंथांचे आजच्या कार्यक्रमात कुलगुरूंसह मान्यवरांच्या हस्ते
प्रकाशन करण्यात आले.
कुलगुरू डॉ. शिर्के
म्हणाले, विज्ञान हे खरे तर वरदान ठरायला हवे, मात्र मानव स्वतःच्या स्वार्थापायी
त्याचा विपरित वापर करीत आहे. विज्ञानाचा हा शाश्वताकडून अशाश्वताकडील प्रवास
चिंताजनक आहे. अशा वेळी संतसाहित्य हे वरदायी आशेचा किरण म्हणून सामोरे येते.
साहित्य, इतिहास यांविषयीची पुस्तके प्रकाशित करून त्या माध्यमातून विद्यापीठांनी सामाजिक
जाणीवांना आवाहन करीत राहणे आवश्यक आहे. या जाणीवांमधूनच शिवाजी विद्यापीठाला
पां.ना. कुलकर्णी, तळाशीकर गुरूजींसारखे लोक भेटले. वीस-वीस वर्षे अथक, अविश्रांत
परिश्रम घेऊन ते अशा ग्रंथांच्या संपादनाचे कार्य करतात. त्यांच्या या साधनेला
विद्यापीठाने कर्तव्यभावनेतून समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम केले.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद
पाटील यावेळी म्हणाले, क्रोध, अहंकार, लोभ ही जगातील युद्धाची प्रमुख कारणे आहेत. जगाने
संतसाहित्याचा अभ्यास आणि अंगिकार केला असता, तर युद्धाचे प्रसंग ओढवलेच नसते.
शिवाजी विद्यापीठाने दर्जेदार ग्रंथवैभव वाढविण्यासाठी सदैव प्रयत्न केले आहेत.
त्याचे फलितस्वरुप आजची प्रकाशने आहेत.
यावेळी डॉ. दिलीप
कुलकर्णी यांनी आपले वडील पां.ना कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीच्या संधीप्रकाशात
त्यांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वरीचे प्रकाशन होणे ही हृद्य बाब असल्याचे
सांगितले. अरुण जाधव यांनी तळाशीकर गुरूजींनी संपादित केलेली तुकारामबोवांची गाथा
आणि कान्होबा अभंगगाथा या दोन्ही पुस्तकांच्या जनआवृत्ती काढण्यासाठी विद्यापीठाने
प्रयत्न करावेत, अशी सूचना केली.
संत तुकाराम अध्यासनाचे
समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. मेघा पानसरे
यांनी त्यांच्या संपादित पुस्तकांविषयी उपस्थितांना अवगत केले. प्रांजली क्षीरसागर
यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास वाणिज्य व
व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विद्यार्थी विकास
विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ.
विनोद ठाकूरदेसाई, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, कुलकर्णी कुटुंबीय, जाधव
कुटुंबीय, तळाशीचे ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment