Saturday, 4 October 2025

रामशेठ ठाकूर यांच्याकडून लोकस्मृती वसतिगृहासाठी आणखी २५ लाख देणगी

ऑनलाईन उद्घाटन समारंभात घोषणा; विद्यापीठाच्या उपक्रमाचे केले कौतुक

शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतिगृह इमारतीच्या उद्घाटन समारंभात ऑनलाईन सहभागी झालेले माजी खासदार रामशेठ ठाकूर.


शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतिगृह इमारतीचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ऑनलाईन कोनशिला अनावरणाने करण्यात आले.

लोकस्मृती वसतिगृह पाहणीप्रसंगी अभियांत्रिकी विभागाच्या सहकाऱ्यांसमवेत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

लोकस्मृती वसतिगृह इमारतीमध्ये फीत सोडवून प्रवेश प्रसंगी भालचंद्र जोशी, विजयानंद सोनटक्के, डॉ. भारती पाटील यांच्यासमवेत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आदी.



(लोकस्मृती वसतिगृह उद्घाटन समारंभाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ४ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाने प्रचंड शैक्षणिक-सामाजिक जाणिवेच्या भावनेतून लोकस्मृती वसतिगृह योजना अंमलात आणली असून वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतीचे दर्जेदार कामही गतीने पूर्ण केले. या बांधिलकीच्या भावनेतूनच या उपक्रमाच्या पुढील टप्प्यासाठी आणखी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी आज केली.

शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन श्री. ठाकूर यांच्या हस्ते आज ऑनलाईन स्वरुपात कोनशिला अनावरणाने करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. श्री. ठाकूर यांनी यापूर्वी लोकस्मृती वसतिगृह योजनेसाठी २५ लाख रुपयांचा निधी प्रदान केला असून त्याचा विनियोगही या कामी करण्यात आला आहे.

श्री. ठाकूर म्हणाले, लोकस्मृती वसतिगृहाच्या इमारतीची ध्वनीचित्रफीत पाहूनच हे काम अतिशय दर्जेदार पद्धतीने झाल्याचे लक्षात येते. यामागे विद्यापीठाची विद्यार्थिनींप्रती मोठी उदात्त भावना आहे, याची प्रचिती येते. इमारत अतिशय सुंदर झाली असून येथे विद्यार्थिनींची उत्तम निवासव्यवस्था होईल. या पर्यावरणात त्यांचा अभ्यासही चांगला होईल. आपल्या स्नेहीजनांप्रती, त्यांच्या स्मृतींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने दात्यांना मिळाली. पुढील टप्प्याचे कामही लोकांच्या दातृत्वातून सहजपणे मार्गी लागेल. या विद्यापीठाचा माजी विद्यार्थी म्हणून या इमारतीचे उद्घाटन करण्याची संधी देऊन माझा मोठा सन्मान केला आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठात विद्यार्थिनींची संख्या लक्षणीयरित्या वाढते आहे. त्यांच्या निवासव्यवस्थेचा विस्तार करण्याच्या आवश्यकतेतून विद्यापीठाने स्वनिधीतून सुविधा विकास केला. तथापि, समाजातील दात्यांच्या माध्यमातून लोकस्मृती वसतिगृह उभारण्याचे ठरविल्यानंतर देणगीदारांचा लाभलेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. त्यामध्ये व्यक्ती, शिक्षक, संस्था यांचा सहभाग राहिला. त्यातून प्रशस्त आणि सुसज्ज दुमजली इमारत उभी राहिली. रामशेठ ठाकूर यांनीही भरीव मदत केली. अशा सहृदयी दात्यांमुळे पुढील टप्पाही यशस्वीरित्या मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते उपस्थित देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. भारती पाटील, भालचंद्र दिगंबर जोशी, डॉ. गिरीष कुलकर्णी, डॉ. गिरीजा कुलकर्णी, डॉ. चंद्रकांत लंगरे, विलो मॅथर कंपनीचे विजयानंद सोनटक्के यांचा समावेश होता. याखेरीज इमारतीचे स्ट्रक्चरल डिझाईनचे काम करणारे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रा. महेश साळुंखे, डॉ. पुनश्री फडणीस, अभियांत्रिकी विभागाचे उपकुलसचिव रणजीत यादव, रणजीत पवार, बांधकाम ठेकेदार युवराज गोजारी, बांधकाम ठेकेदार धनंजय मुळीक व विद्युत ठेकेदार अमोल इलेक्ट्रीकल्स् यांचाही सत्कार करण्यात आला. बेंगलोरचे आर्किटेक्ट कारेकर अँड असोसिएट्स यांनी या कामाचे वेगळेपण लक्षात घेता सदर इमारतीचे आर्किटेक्चरल काम पूणतः मोफत केल्याबद्दल त्यांचाही यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. अजित कोळेकर आदींसह स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे शिक्षक, अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. डॉ. वैशाली सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी लोकस्मृती वसतिगृह इमारतीस भेट देऊन पाहणी केली आणि झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी विलो मॅथर कंपनीचे श्री. सोनटक्के आणि भालचंद्र जोशी या दात्यांच्या हस्ते फीत सोडवून इमारतीत मान्यवरांनी प्रवेश केला.

लोकस्मृती वसतिगृहाबद्दल थोडक्यात...

लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृह इमारतीचे क्षेत्रफळ ९९८० चौ. फुट इतके असून सदर इमारतीच्या पहिल्या टप्प्यात तळमजला व पहिला मजला अशा एकूण २६ निवासी कक्षांचे बांधकाम करण्यात आले आहे. येथे १०० विद्यार्थिनींची निवास व्यवस्था होऊ शकेल. स्वच्छतागृहांसह सर्व आवश्यक सुविधा येथे उपलब्ध आहेत. इमारतीच्या बांधकामासाठी समाजातील दानशूर व्यक्तींकडून १ कोटी १६ लाख ४७ हजार २८२ रुपये इतका निधी प्राप्त झाला. दुमजली बांधकामासाठी १ कोटी ९६ लाख ८३ हजार १०६ रुपये इतका खर्च आला. उर्वरीत ८० लाख ३५ हजार ८२४ रुपयांची रक्कम विद्यापीठाने स्वनिधीतून उपलब्ध करून दिली. सध्या नियोजित प्रकल्पाच्या ४० टक्के इतके काम पूर्ण झाले असून भविष्यात निधी उपलब्धतेनुसार विस्तार बांधकाम हाती घेण्याचे नियोजन आहे.

सुहृदांच्या आठवणींचा गहिवर

लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहाची संकल्पना ही कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची. या उपक्रमासाठी निधी प्रदानाची सुरवातही त्यांनी स्वतःपासून केली. आपल्या आई शारदा यांच्या नावे त्यांनी देणगी दिली. आज वसतिगृहाला भेट दिल्यानंतर पहिल्या क्रमांकाच्या कक्षाला आईचे नाव दिल्याचे दिसून आल्यानंतर त्यांच्या आठवणींचा गहिवर कुलगुरूंच्या मनी दाटून आला. या कक्षाची पाहणी करताना त्यांनी आईंच्या आठवणींना उजाळा दिला. या क्षणाची स्मृती म्हणून या कक्षासमवेत त्यांनी छायाचित्रही काढले. डॉ. भारती पाटील यांचीही अवस्था वेगळी नव्हती. त्यांनीही आपल्या आई विमल यांच्या स्मृत्यर्थ देणगी दिली आहे. आईंविषयी बोलताना त्यांचाही कंठ दाटून आला. भालचंद्र जोशी यांनी तर आपली पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्या नावे आपली सर्व जमापुंजी दान केली आहे. आपल्या कुटुंबियांच्या स्मृती आता कायमस्वरुपी विद्यापीठात जपल्या जातील, याचे समाधानाचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते.



No comments:

Post a Comment